"आष्टी,पाटोदा,शिरूर नगरपंचायत निवडणुक"
*****************************
1992-93 साली झालेल्या 74 व्या घटना दुरुस्तीमुळे नगरपंचायतला घटनात्मक दर्जा प्राप्त होऊन भारतीय संविधानाच्या कलम 243 मध्ये तशी तरतूद करण्यात आली नगरपंचायती अशा ठिकाणी केल्या की जो भाग पूर्णपणे ग्रामीण व पूर्णपणे शहरीही नाही.अशा भागासाठी नगरपंचायती स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो महाराष्ट्रात 1995 साली आलेल्या युती सरकारच्या काळात तुलनेने मोठी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला महाराष्ट्रात पहिली नगरपंचायत कोकणातील दापोली या ठिकाणी स्थापन करण्यात आली.स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग असलेल्या या नगरपंचायतीच्या
निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष अजेंड्याला फारसे महत्व नसते तर महत्व असते त्या नगरपंचायत भागातील आमदार किंवा त्यांच्या विरोधी पक्षाचा एक प्रमुख नेता,की ज्यांनी त्या गावात मातब्बर राजकीय नेत्यांची दुसरी फळी निर्माण केलेली असते या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये या नेत्यांकडून बळ दिले जाते व निवडणूक माध्यमातून या नगरपंचायत मध्ये आपल्या विचारांची सत्ता यावी यासाठी प्रयत्न केला जातो या निवडणूक निमित्ताने पक्षाचे व प्रमुख नेत्याचे काम घरा घरापर्यंत पोहचवले जाते मुळातच नगरपंचायत प्रभागातील मतदार संख्या कमी असल्यामुळे उभा राहणारा उमेदवार व त्याचे नेतृत्व करणारा त्याचा नेता याकडे पाहूनच लोक मतदान करतात हे प्रामुख्याने या नगरपंचायतीच्या राजकारणात दिसून येते.
नुकत्याच बीड जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा व शिरूर या तालुका ठिकाण असलेल्या नगरपंचायत निवडणुका पार पडल्या त्याचा निकालही घोषित झाला.सुरुवातीला या तीनही ठिकाणी मोठी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत अस्तित्वात होत्या नंतर त्यांचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यात आले. या तीनही ठिकाणी सातत्याने गेली वीस ते पंचवीस वर्षांपासून विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांचे प्राबल्य आहे.आजच्या या 2021-22 मध्ये झालेल्या निवडणूकामधे तीनही शहरातील मतदारांनी परत एकदा आमदार धस यांच्या पॅनलला भरगोस मतांनी निवडून दिले.राजकारण हे केवळ मनगटाच्या ताकदीवर नाहीतर बुद्धीच्या कसरतीवरही करावे लागते हे सिद्ध करणारी आमदार धस यांची वाटचाल याही निवडणुकीत परत दिसून आली.या तीनही शहरात सक्रिय कार्यकर्त्यांची एक मोठी फळी धस यांनी तयार केलेली आहे हे कार्यकर्ते धस साहेबांनी घेतलेला प्रत्येक राजकीय अजेंड्याचा निर्णय मोठ्या कसोशीने मतदारपर्यंत पोहचवतात किंबहुना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जसे काम करतात तसेच काम धस यांचे कार्यकर्ते करताना दिसून येतात.या कार्यकर्त्यांना तसे कुठल्याही पक्षाचे फारसे देणंघेणं नाही त्यांना फक्त "आण्णा पार्टी" एवढाच पक्ष कळतो म्हणूनच गेल्या अनेक निवडणुकीत वेगवेगळ्या पक्ष चिन्हवर निवडणूक लढवून फक्त धस यांना मानणारेच नगरसेवक वा ग्रामपंचायत सदस्य इथे निवडून आलेले आहेत .राजकारण करत असताना निवडणूक व्यवस्थापन कौशल्य वापरून निवडणुका कशा लढायच्या हे आ.धस यांच्या कडून अन्य राजकीय नेत्यांनी शिकण्यासारखे आहे निवडणूकची तयारी ते साधारण एक वर्षांपूर्वीपासून सुरू करतात आजच्या आधुनिक राजकारणात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक राजकीय आयुधांचा ते खुबीने वापर करतात शेवटी राजकारणात जय पराजय यावरच नेत्याचे राजकीय मोजमाप केले जाते.मागील पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारच्या माध्यमातून नगरपंचायत मध्ये मोठा विकास निधी त्यांनी मंजूर करून आणला त्याद्वारे शहरातील रस्ते व त्याचे रुंदीकरण, पाण्याची सोय,लाईटचे दिवे,आधुनिक समशान भूमी,बोद्धविहार व सर्व जातीय समाज मंदीर सभामंडप, अत्याधुनिक खळाडूंसाठी तालीम,घनकचरा व्यवस्थापन व गरिबांना मोठ्या संख्येने केंद्राच्या घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला.आष्टी शहरात रस्ता रुंदीकरण साठी अनेक रस्त्यावर असलेली अतिक्रमण त्यांना काढावी लागली आष्टी हे शहर तसे अठरा पगड जाती व बारा बलुतेदार असणाऱ्यांचे आहे येथील अतिक्रमण केवळ धस यांच्या मुळेच निघाले नाहीतर दुसरे कोणाचे लोकांनी ऐकले असते असे वाटत नाही.रस्ता रुंदीकरणमुळे पुढील पंचवीस वर्षाचा रहदारीचा प्रश्न मात्र कायमचा मिटला आहे हे मात्र तितकंच खरं आहे म्हणूनच या सर्व कामांची पावती मतदारांनी आ.धस यांना दिली आहे.
या तीनही शहरातील निवडणुकीत आ.धस यांच्या विरोधात विधानसभचे आमदार बाळासाहेब आजबे हे प्रथमच नगरपंचायतच्या या निवडणूकीला सामोरे गेले त्यामुळे आ.आजबे यांचा या तीन गावात कार्यकर्त्यांचा संच व प्रभावही तसा कमीच होता परंतु आ.आजबे यांनी स्वतः आक्रमकतेने भविष्यातील सर्वांगीन विकासाच्या मुद्य्यावर या निवडूनकीत उतरण्याचा निर्णय घेतला महाविकासघाडीच्या माध्यमातून मोट बांधून पॅनल उभे केले त्यांनी उमेदवारांना सर्व प्रकारचे बळ देऊन त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले या नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आ.आजबे यांचा या शहरातील राजकारणात प्रवेश झाला असें म्हणले तरी ते वावगं ठरणार नाही त्यांचे उमेदवार कमी निवडून आले पण मतदान त्यांनी चांगले घेतले,निवडणूक निमित्ताने कार्यकर्त्यांचा चांगला संच त्यांनी तयार केला आहे. येणाऱ्या पुढील काळात आता नगरपंचायत राजकारणांत घेतलेली भूमिका त्यांनी कायम ठेवली व शहरातील मतदारांशी कायम संपर्क ठेवला तर पुढच्या नगरपंचायत निवडणूकीत चांगले आव्हान ते निर्माण करू शकतात. शिरूर शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सुद्धा आ.आजबे च्या साथीने निवडणूकीत जोर लावला त्यात त्यांनाही काही प्रमाणात यशही मिळाले आहे.
या तीन शहरात स्वतःचे हक्काचे मतदान असणारा एक वर्ग माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याकडे आहे सातत्याने त्यांनी या शहरात निवडणूका लढवल्या आहेत परंतु आ.धस यांच्याबरोबर जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्यामुळे त्यांनी या निवडणुकीतुन माघार घेतली व पक्ष आदेश मानून धस यांच्या उमेदवारांच्या मागे आपली ताकत उभा केली पण इथे एक बाब मुद्दाम अधोरेखित करण्यासारखी आहे की या नगरपंचायत निवडणुका आपल्याकडे असणाऱ्या लहान कार्यकर्त्याना लढवण्यासाठी त्यांना बळ देण्यासाठी असतात कारण शेवटी आपला कार्यकर्ता टिकला तरच नेत्याच्या नेतृत्वाचीही धार कायम राहते धोंडे साहेब दूरदृष्टीचे नेते आहेत आगामी काळात याचा विचार ते नक्कीच करतील.
निवडणूका संपल्या,निकालही स्पष्ट झाला आता खरी जबाबदारी आहे निवडून आलेल्या सर्व पक्षीय पदाधिकारी व त्यांच्या नेतृत्वाची,या सर्वांनीच राजकीय विभिनवेष बाजूला ठेवून या तीनही शहराच्या विकासासाठी दोन्ही आमदारांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी सरकारकडून आणला पाहिजे या तीनही शहरात मागील अनेक दिवसापासून खूप मोठे सार्वजनिक प्रश्न प्रलंबीत आहेत ते सोडवणे यालाच प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.आष्टी,पाटोदा व शिरूर या तीनही शहरांचा कायापालट करून अजून सुदंर विकसित शहरे ही तयार झाली पाहिजेत हीच शहरातील सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे...!!
लेखक-
प्रा.महेश कुंडलिक चौरे,
आष्टी.
मो.9423471324
stay connected