नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'लोकनाथ' या ध्वनिचित्रफितीचे अनावरण आज होणार.
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.८ ठाणे : राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने संपूर्ण राज्यासह ठाणे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे आणि कोरोनापासून महापुरापर्यंत प्रत्येक संकटाच्या वेळी सर्वात प्रथम धावून जाणारे लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या ‘लोकनाथ’ या गीताचे, अर्थात ध्वनिचित्रफितीचे अनावरण आज मंगळवार ८ फेब्रुवारी रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होत आहे. एससीआर कम्युनिकेअर, साहील मोशन आर्ट्स, सुमन एन्टरमेंट आणि सप्तसूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे गाणे तयार करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी लिहिलेल्या गीताला प्रसिद्ध संगीतकार चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर आणि अवधूत गुप्ते यांनी या गीताला स्वरसाज चढवला असून निमंत्रितांच्या साक्षीने सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते या गीताचे अनावरण होणार आहे.
या कार्यक्रमाला महापौर नरेश म्हस्के, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महेश पाठक, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त जयजीत सिंग, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, नवी मुंबई महापालिकेचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले आदींसह शिवसेनेसह इतर राजकीय पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गेल्या वर्षी ‘अनाथांचा नाथ एकनाथ’ या गाण्याचे अनावरण केले होते
एससीआर कम्युनिकेअरच्या वतीने गेल्या वर्षी ‘अनाथांचा नाथ एकनाथ’ या गाण्याचे अनावरण करण्यात आले होते. या गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली होती. राजकारणापेक्षाही समाजकारणावर भर देणारे एकनाथ शिंदे यांनी कधीही प्रसिद्धीचा सोस बाळगला नाही. त्यामुळेच सोशल मीडियाचा विस्फोट झालेल्या या काळातही ते कधीही अनावश्यक प्रसिद्धीच्या झोतात दिसत नाहीत. अशावेळी त्यांच्या कामाचा सर्वांगीण आलेख लोकांसमोर येण्यासाठी गतवर्षीप्रमाणेच यंदाही गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
stay connected