अन्नतंत्र महाविद्यालयात "राष्ट्रीय मतदार दिन" साजरा
आष्टी प्रतिनिधी
आनंद चॅरिटेबल संस्था संचलित अन्नतंत्र महाविद्यालय, आष्टी येथे ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी भारतामध्ये २५ जानेवारीला "राष्ट्रीय मतदार दिवस" साजरा केला जातो.25 जानेवारी 2011 पासून देशात मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी ‘राष्ट्रीय मतदार दिवसाला’ शुभारंभ केला. लोकशाहीत मताला स्वतःचे महत्त्व आहे. कोणत्याही लोकशाही देशात सरकार बनवण्यात सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची सर्वात मोठी भूमिका असते. मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे.
२५ जानेवारी १९५० रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारतात दरवर्षी निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोग दरवर्षी १८ वर्षांच्या तरुणांना ओळखपत्रे देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करते. दरवर्षी मतदार दिनाला एक थीम ठेवली जाते. यंदाची थीम 'निवडणुका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागी बनवणे' ही आहे.
या अनुषंगाने अन्नतंत्र महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन व निबंध स्पर्धा यांचा समावेश होता तसेच शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खेमगर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदवला.
stay connected