लघुपट समाज जागृतीचे मोठे माध्यम - दिग्दर्शक भैय्यासाहेब बॉक्सर

 लघुपट समाज जागृतीचे मोठे माध्यम - दिग्दर्शक भैय्यासाहेब बॉक्सर



शहरात रंगला सामाजिक विषयांवर शॉर्ट फिल्म फेस्टिवल


 लघुपट समाज जागृतीचे मोठे माध्यम आहे. युवक-युवतींनी समाज जागृतीसाठी लघुपटाच्या माध्यमातून घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. लघुपटातून समाजातील अनेक ज्वलंत प्रश्‍नांना वाचा फोडली जाते. फिल्म फेस्टिवल मधील सर्व विषय समाज मनाला आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारे असल्याचे प्रतिपादन चित्रपट निर्माते व दिग्दर्शक भैय्यासाहेब बॉक्सर यांनी केले. 

हेल्पिंग हँण्डस युथ फाऊंडेशन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व बी.बी. फिल्म प्रोडक्शन हाऊसच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक विषयांवर आयोजित करण्यात आलेल्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनाप्रसंगी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक भैय्यासाहेब बॉक्सर बोलत होते. यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, समाज कल्याण सहा. आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवाजी साबळे, किरण बोरुडे, करिश्मा शेख, हिना शेख आदी उपस्थित होते.  

प्रास्ताविकात पप्पू इनामदार यांनी कोरोनामुळे कलाकारांचे सर्व काम बंद होते. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन व चालना देण्यासाठी समाजातील ज्वलंत प्रश्‍न अधोरेखित करुन त्यांविषयी जनजागृती होण्यासाठी या शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी चित्रपटांचा समाजावर मोठा परिणाम घडतो. सोशल मिडियामुळे फिल्मचे जग विस्तारले असून, अशा कार्यक्रमांनी कलाकारांना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. समाज कल्याण सहा. आयुक्त राधाकिसन देवढे यांनी कलाकार समाजाचे प्रतिबिंब आपल्या कलेतून उमटवत असतात. तर समाजातील प्रश्‍न मांडून ते सोडविण्यास हातभार लावतात. अशा कलाकारांमुळे समाजात बदल घडण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुभाष गुंदेचा यांनी दिव्यांगापासून ते तृतीयपंथीयाचे प्रश्‍न शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून मांडण्यात आले. ते प्रश्‍न मांडण्याबरोबर त्यामध्ये बदल घडविण्याचा महत्त्वाचा संदेश देखील कलाकारांनी दिला असल्याचे सांगितले.  

रेल्वे स्टेशन रोड येथील यश ग्रॅण्ड हॉटेलमध्ये झालेल्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये शिक्षण, युवा व महिला सक्षमीकरण, तृतीयपंथीयांच्या समस्या, दिव्यांगांचे प्रश्‍न, ग्रामीण विकास, आरोग्य जनजागृती, वाहतूक कोंडी व अपघात आदी विषयांवर फिल्म दाखविण्यात आल्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून दिडशेपेक्षा जास्त शॉर्ट फिल्म आल्या होत्या. यामधील निवडक शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग करुन त्यांना पारितोषिक देण्यात आली. सोशल फिल्म ऑफ द ईयर प्रथम- नात धर्मापलीकडच (सर्व धर्म समभाव) सुमित श्रीगोंदेकर (अहमदनगर), द्वितीय- जरुरत है (बेघरांच्या वेदना) विशाल पाटील (नाशिक), गैराट एक परिवर्तन (व्यसन मुक्ती) गोकुळ रहाणे (संगमनेर), उत्कृष्ट दिग्दर्शक- विशाल पाटील (सिग्नल रेड, नाशिक), उत्कृष्ट निर्माता- बबलू सय्यद (लालसा, धानोरा आष्टी), उत्कृष्ट अभिनेता- राजू वावधने (पोस्टमन, नाशिक), उत्कृष्ट अभिनेत्री- व्हायरस मधील महिला कलाकार, उत्कृष्ट व्हिडिओ एडीटर- वेदांत सैंदानकर (स्ट्रेन्जर्स, नाशिक), उत्कृष्ट संगीत- ऑनलाईन, उत्कृष्ट लेखन- विजय जाधव (क्षण, नाशिक), उत्कृष्ट छायाचित्रण- आनंद बोठे (वांच्छित, अहमदनगर), उत्कृष्ट वेशभुषा व मेकअप- स्वाती घोडके (अस्तित्व, पुणे) यांनी बक्षिसे पटकाविली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या कलाकारांना बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण हनिफ शेख, विनायक कसबेकर, अस्लम शेख, दीपक गायकवाड, इमरान शेख यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.