मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार....?
ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा शॉक बसणार....!
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.१० मुंबई/ठाणे ; देशातील टेलिकॉम कंपन्यांची भूक भागणार नसल्याचे स्पष्ट संकेत टेलिकॉम कंपन्यांनी दिले आहेत. ग्राहकांकडून अवाच्या सवा वसुलीसाठी कंपन्यांनी येत्या दोन वर्षांचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. एका ग्राहकाकडून कमीत कमी ३०० रुपये वसुलीचे उद्दिष्ट टेलिकॉम कंपन्यांनी ठेवले आहे. सध्या या योजनेवर भारती एअरटेल कंपनी काम करत आहे. सध्या या कंपन्यांची मनमानी सुरुच आहे. तीन महिन्यांपूर्वी प्रचंड दरवाढ केल्यानंतर नफा कमविण्याच्या लालसेत या कंपन्या देशातील करोडो युजर्सना पुन्हा महागाईचा शॉक देण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वीच रिचार्ज प्लॅन्समध्ये वाढ करणा-या कंपन्यांनी पुन्हा एकदा दरवाढीचे संकेत दिले आहे. सध्याचे दोन-चार महिने ही झळ बसणार नसली तरी याच वर्षात रिचार्ज करणे सर्वसामान्यांना अवघड होणार आहे. आता या दरवाढीचा फायदा कंपन्याना होतो की वापरकर्ते यातून आयडीयाची कल्पना लढवितात हे लवकरच स्पष्ट होईल. २०२२ साली मोबाईल कॉल आणि सेवांच्या किंमतीही वाढण्याचे संकेत देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने दिले आहेत.
दरवाढीच्या या स्पर्धेत एअरटेल पुढे जाण्यास कचरणार नाही, असे कंपनीच्या उच्चपदस्थ अधिका-याने स्पष्ट केले. प्रति ग्राहक सरासरी महसुल २०० रुपयांपर्यंत आणण्याचा कंपनीचा मानस आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एअरटेलने सर्वप्रथम मोबाइल आणि इतर सेवांच्या किमती १८ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत वाढवल्या होत्या. एअरटेलपाठोपाठ रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडियानेही आपापले कॉल दर आणि इतर सेवा महाग केल्या होत्या.
याच वर्षात टॅरिफ दर वाढण्याचे संकेत भारती एअरटेलचे भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल यांनी दिले. मात्र तुर्तास चार महिने हा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या नेटवर्क सक्षमता आणि वेग वाढीवर भर देऊन वापरकर्त्यांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यानंतर याच वर्षात दरवाढ करण्यात येणार आहे. प्रतिस्पर्धी तोपर्यंत काय भूमिका घेणार याकडे एअरटेलचे लक्ष असेल. मात्र त्यांनी काही हालचाल केली नाही तरी भारती एअरटेल दरवाढ करण्यात मागचापुढचा विचार करणार नसल्याचे विठ्ठल यांनी स्पष्ट केले.
कंपनीच्या निव्वळ नफ्यात घट
कंपनीचे तिमाही निकाल जाहीर करताना विश्लेषकांच्या प्रश्नावर विठ्ठल यांनी ही माहिती दिली. भारती एअरटेलचा डिसेंबर तिमाहीतील एकत्रित निव्वळ नफा २.८ टक्क्यांनी घटून ८३० कोटी रुपयांवर आला आहे. या तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्न १२.६ टक्क्यांनी वाढून २९.८६७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.सध्या प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPQ) २०० रुपयांपर्यंत आणण्याचा कंपनीचा मानस आहे, त्यानंतर तो पुढील वर्षांत ३०० रुपयांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे सीईओ विठ्ठल म्हणाले.
4जी ग्राहकांच्या संख्येत १८.१% वाढ
डिसेंबर २०२१ च्या तिमाहीत एअरटेलच्या 4जी ग्राहकांची संख्या वर्षागणिक १८.१ टक्क्यांनी वाढून १९.५ कोटींवर पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत ही संख्या १६.५६ कोटी होती. एअरटेलच्या नेटवर्कवरील प्रति ग्राहक डेटाचा वापर १६.३७ गिगाबिट्स (जीबी) वरून ११.७ टक्क्यांनी वाढून 18.28 जीबी झाला आहे. कंपनी उपकरणांचे अपडेट, नेटवर्क आणि क्लाउड बिझनेसवर ३०० मिलियन डॉलर (२,२५० कोटी रुपये) खर्च करणार असल्याचे गोपाल विठ्ठल यांनी सांगितले.
stay connected