चोरट्यांच्या मारहाणीत माय लेक जखमी, रोकड,दागिन्यांची चोरी करून चोरटे पसार....! कल्याणमधील धक्कादायक घटना...!

 चोरट्यांच्या मारहाणीत माय लेक जखमी,

रोकड,दागिन्यांची चोरी करून चोरटे पसार....!

कल्याणमधील धक्कादायक घटना...!



प्रतिनिधी : संजय पंडित


दि.७ कल्याण(ठाणे) : दोन महिलांना बेदम मारहाण करुन घरातील ऐवज लुटून अज्ञात चोरटे फरार झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. दोन्ही महिलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून खडकपाडा पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. कल्याण डोंबिवलीत घरफोडी, वाहन चोरी, चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली आहे. पोलीस अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांच्याकडून चोरीस गेलेले साहित्य हस्तगत केलेले आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना सुरुच आहेत. कल्याणनजीक आटाळी मानी येथे रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. 

आई आणि मुलीला मारहाण करुन ऐवज लुटून नेला

आटाळी मानी या गावात राहणाऱ्या वत्सला चिकणे यांच्या शेजाऱ्याने माघी गणेशाची स्थापना केली होती. वत्सला यांची विवाहीत मुलगी सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत वत्सला यांच्या घरी माघी गणपतीला आली होती. काल रात्री गणेश विसजर्नानांतर आई आणि मुलगी, दोन मुलांसह घरी झोपल्या होत्या. मध्यरात्री आईला जाग आली तेव्हा तिने पाहिले की दोन लोक घरात शिरले आहेत. तिने आरडाओरड सुरु करण्याआधीच तिच्या डोक्यावर चोरट्यांनी मारहाण केली. या आवाजाने मुलगी सारिकाही जागी झाली. सारिकाने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी या दोघींना मारहाण करुन घरातील 13 तोळे दागिने आणि काही रोकड घेऊन पसार झाले. खडकपाडा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. खडकपाडा पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे. मात्र घरात घुसून दोन महिलांना जखमी करुन लुटमारीच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.