कल्याणमध्ये जगन्नाथ मंदिरात अखंड ज्योतीने आग,
मंदिरातील साहित्य जळून खाक..!
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.७ कल्याण(ठाणे) : कल्याण पूर्व भागातील अमरदीप कॉलनी परिसरात जगन्नाथ मंदिरात अखंड ज्योत तेवत असताना दुपारी मंदिरातील कापड्याला आग(Fire) लागली. बघता बघता या आगीने भीषण रुप धारण केले. या आगीत मंदिरातील ज्वलनशील साहित्य जळून खाक झाले आहे. देवाची लाकडी मूर्ती जळाली आहे. मंदिर जळाल्याने परिसरातील महिलांना दुख अनावर झाले. महिलांचा धायमोकलून रडतानाचा व्हीडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आग लागताच मंदिरातील सिलेंडर तात्काळ बाहेर काढण्यात आला. यामुळे मोठी दुर्घटना टळली. दोन वर्षापूर्वीच या मंदिराचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते पूजन झाले होते. आगीत मंदिराचे झालेले नुकसान भरुन दिले जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले आहे
ज्योतीच्या संपर्कात आल्याने कपड्याने पेट घेतला आणि आग लागली
जगन्नाथ मंदिरात कायम अखंड ज्योत तेवत ठेवण्यात येते. यावेळी ज्योत असलेल्या ठिकाणी असलेला कपडा या ज्योतीच्या संपर्कात आल्याने कपड्याने पेट घेतला. मंदिरातून धूर येऊ लागला. मंदिरात आग लागल्याचे कळताच नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. मात्र अग्नीशमन दल घटनास्थळी पोहचेपर्यंत आग वाढत गेली. यावेळी मंदिरात गॅस सिलेंडर सुद्धा असल्याचे लक्षात आल्याने एका तरुणाने प्रसंगावधान राखत मंदिरात प्रवेश करत सिलेंडर बाहेर काढला. अन्यथा सिलेंडरचाही स्फोट झाला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती. तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत मंदिरातील सर्व गोष्टी जळून खाक झाल्या आहेत. इतकेच नाही तर मंदिरातील देवाच्या लाकडी मूर्त्याही जळल्या आहेत.
मंदिराचे नुकसान भरुन देण्याचे कुणाल पाटील यांचे आश्वासन
मंदिराची देखभाल करणारे जती महाराज यांनी या घटनेची माहिती माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांना दिली. घटनेची माहिती मिळताच पाटील यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू अनिल पाटील हे देखील उपस्थित होते. पाटील यांनी आगीची माहिती घेतली. तसेच जती महाराजांसोबत चर्चा केली. मंदिराचे पूजन दोन वर्षापूर्वी पाटील यांच्या हस्ते झाले होते. आता आगीत मंदिराचे नुकसान झाल्याने मंदिराचा जिर्णोद्धार आणि झालेले नुकसान भरुन दिले जाईल असे आश्वासन पाटील यांनी दिली आहे. मंदिर जळाल्याने परिसरातील महिलांना दु:ख अनावर झाले.
stay connected