डोंबिवलीत २४ कोटींचा बनावट चेक प्रकरणी मोठी टोळी गजाआड,
आत्तापर्यंत घातला दहा कोटींचा गंडा...?
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.५ डोंबिवली(ठाणे) : डोंबिवलीतील बनावट चेक प्रकरणी पोलिससांनी आज मुख्य सूत्रधारासह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने आतापर्यंत १० कोटींचा गंडा घातला आहे. याआधी १ ऑक्टोबर २०२१ रोजी डोंबिवली पूर्व भागातील एचडीएफसी बँकेच्या शाखेत तीन जण एक बनावट चेक घेऊन गेले होते. यातील एकाने आपण सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष असून आपल्या संस्थेला इंडोस टॉवर लिमिटेड या मोबाईल टॉवर कंपनीकडून २४ कोटी रुपये देणगी मिळाली आहे असे सांगितले. यानंतर बँकेतील क्लर्कने बँक मॅनेजरला या चेकची माहिती दिली. मॅनेजरने सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता या तिघांच्या संशयास्पद वाटल्या. मॅनेजरने डोंबिवली मानपाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर मानपाडा पोलिसांनी तात्काळ बँकेत हजर होत या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता ही फसवणुकीची घटना समोर आली.
आतापर्यंत १० कोटींचा गंडा घातला
बनावट चेक तयार करुन आतापर्यंत देशभरात १० कोटीचा गंडा घालणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करीत त्यांच्या म्होरक्याला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुजरातहून बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीमध्ये अजून किती लोक आहेत याचा पोलीस तपास करीत आहेत. आतापर्यंत एकूण नऊ लोकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बँकेत आलेल्या तिघांपैकी एक जण हरिचंद्र कडवे याने आपण वांगणीतील संत रोहिदास सेवा संस्थेचा अध्यक्ष असल्याची बतावणी केली होती. मात्र मॅनेजरला संशय आल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी अन्य पाच जणांना अटक केली.
ढोलकिया सांगण्यावरुन बनावट चेक बनवला होता
अटक केलेल्या आठ जणांना समोरासमोर बसवून पोलिसांनी चौकशी केली असता बनावट चेक कसा मिळवला याची माहिती पोलिसांनी मिळाली. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सचिन साळसकर नामक कॉम्प्युटर मॅकेनिक आहे. या टोळीचा म्होरक्या भावेश ढोलकिया याच्या सांगण्यावरुन साळसकर कोणत्याही बँकेचा बनावट चेक तयार करीत होता. असाच २४ कोटीचा चेक त्याने इंडोस कंपनीच्या चेक व्यवहार बघणाऱ्या व्यक्तीच्या स्वाक्षरीचा बनवला होता. टोळीचा म्होरक्या भावेश ढोलकिया हा याआधीही अशाच एका प्रकरणात जेलमध्ये होता. या टोळीने तामिळनाडू, गुजरात कर्नाटक महाराष्ट्र यासह अन्य राज्यातही अशी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सखोल तपास सुरु यचआहे, असे डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांनी सांगितले. मानपाडा पोलीस सखोल तपास करीत आहेत.
stay connected