मध्यरेल्वेचा पुन्हा ७२ तासांचा मेगा ब्लॉक लोकलसह अनेक एक्स्प्रेस गाड्या होणार रद्द...?

 मध्यरेल्वेचा पुन्हा ७२ तासांचा मेगा ब्लॉक

लोकलसह अनेक एक्स्प्रेस गाड्या होणार रद्द...?






 प्रतिनिधी : संजय पंडित


दि.२ ठाणे : मध्य रेल्वेवर पुन्हा एकदा ७२ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सध्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठीच हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिनांक ५ , ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी हा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान, शंभर पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ३५० लोकल ट्रेन देखील या मेगा ब्लॉकदरम्यान धावणार नाहीत. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान ५ व्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि ६ व्या लाईनवर हा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या ३ दिवस बंद राहणार आहेत. प्रवाशांनी याकाळात सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या दिनांक पाच, सहा आणि सात फेब्रुवारी रोजी बंद राहणार आहेत. याबरोबरच डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच दिवा-वसईदरम्यान धावणाऱ्या मेमु ट्रेन देखील या काळात बंद राहणार आहेत. तर सर्व फास्ट गाड्या स्लो मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल

ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी आतापर्यंत अनेक मेगा ब्लॉक घेण्यात आले असून, आता पुन्हा एकदा पाच फेब्रुवारी ते सात फेब्रुवारीदरम्यान एक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक तब्बल ७२ तासांचा असणार आहे. मध्यरेल्वेकडून वारंवार घेण्यात येत असलेल्या या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत असून, वाहतूकीची देखील समस्या निर्माण होते, मात्र ही समस्या सोडवण्यासाठी मागील ब्लॉकच्या वेळी महापालिका आणि रेल्वे विभागाच्या वतीने जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.