ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवरून अखेर "भावी मुख्यमंत्री" हटवलं,
उलट सुलट चर्चेमुळे शिवसैनिकांनी उचललं पाऊल...!
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.८ ठाणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आणि मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होतं. आता एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात भावी मुख्यमंत्री लिहिलेले बॅनर लावले आहेत. शिंदे यांचा वाढदिवस 9 फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात वागळे इस्टेटमधील चेकनाका येथे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावर शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, आता या बॅनरवरुन भावी मुख्यमंत्री असा उल्लेख काढण्यात आला आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचा मोठं स्थान आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र, शिंदे यांनी कार्यकर्त्यांना फोन करुन तो उल्लेख काढायला लावला आहे. शिंदे यांच्यावरील प्रेमापोटीच आपण हा बॅनर लावला असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आल्यामुळे उलट सुलट चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, आम्ही शिस्तबद्ध शिवसैनिक आहोत. एकनाथ शिंदे यांच्या बद्दल असलेली भावना बॅनरमधून व्यक्त करण्यात आली होती. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख काढण्यात आल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं.
येत्या 9 फेब्रुवारीला म्हणजे उद्या एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. तर 4 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस झाला. दोघा पितापुत्रांना शुभेच्छा देणाऱ्या ठाण्यातील पोस्टर्सही सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री, अशा आशयाचे पोस्टर्स लावले आहेत. संध्याकाळपर्यंत यावर एकनाथ शिंदे यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. त्यामुळे बराच वेळ या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख पाहायला मिळत होता.
एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
एकनाथ शिंदे हे सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहे. आपल्या मतदारसंघात त्यांची लोकप्रियता मोठी आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी मुख्यमंत्री कोण होणार, अशी जेव्हा चर्चा सुरु झाली होती, तेव्हा एकनाथ शिंदे यांचं नावही स्पर्धेत घेतलं जातं होतं. आता चक्क त्यांच्या नावाखाली भावी मुख्यमंत्री असं लिहीत कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्यानं नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलं होतं.
stay connected