मृत जिल्हा प्रशासनावर अंत्यसंस्कार करून *तारामतीचे आंदोलन स्थगीत; परंतु ‘भुतां’सोबतचा संघर्ष सुरुच राहणार* - दहा दिवस स्मशानात केलं होतं आंदोलन

 - मृत जिल्हा प्रशासनावर अंत्यसंस्कार करून

*तारामतीचे आंदोलन स्थगीत; परंतु ‘भुतां’सोबतचा संघर्ष सुरुच राहणार*

- दहा दिवस स्मशानात केलं होतं आंदोलन

- राज्यभरात बीड प्रशासन आणि राजकीय नेत्यांची छीऽथूऽऽ

प्रतिनिधी । बीड





दि.4 : पाटबंधारे विभागाने बिंदुसरा प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमीनीचा मावेजा द्यावा, किंवा माझी जमीन मला परत द्यावी, या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून पाली येथील स्मशानभुमीत आंदोलनाला बसलेल्या तारामती अर्जुन साळुंके या महिलेचं आंदोलन आज तुर्त स्थगीत करण्यात आले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांचे स्वीय सहायक ओमप्रकाश शेटे यांनी आज आंदोलनकर्त्या महिलेची स्मशानभुमीत जाऊन भेट घेतली. तिचा संपूर्ण प्रश्न समजून घेत जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कानावर प्रश्न घालून मंत्रालयात दोन ते तीन दिवसात बैठक लावून प्रश्न निकाली काढू असे अश्वासन त्यांनी दिले. तर राज्य महिला आयोगाच्या सदस्य अ‍ॅड.संगिता चव्हाण यांनीही आंदोलक महिलेची समजूत काढत आपण आजीसोबतही संघर्ष केला आता तुमच्याही सोबत मी असेल. आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि तुमची जी हेळसांड झाली त्याबाबत महिला आयोगाची सदस्य म्हणून मी प्रशासनावर कारवाई करण्याची शिफारस करते असे अश्वासन दिले. त्यानंतर तारामती साळुंके यांनी हे आंदोलन तुर्त स्थगित केले आहे. तत्पुर्वी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली पाली ते स्मशानभुमी अशी मृत प्रशासनाची अंत्ययात्रा काढून सकाळी ११:३० वाजता जिल्हा प्रशासनावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तारामती यांच्या जमीनीचं मूळ प्रकरण १९५६ सालापासून सुरु होते. त्यावेळी पाटबंधारे खात्याने त्यांच्या हिश्श्याच्या जमीनीचा प्रत्यक्ष ताबा घेतला होता. मात्र रेकॉर्डला ही जमीन संपादीतच केलेली नव्हती. त्यामुळे तारामती यांच्या सासु राधाबाई साळुंके यांनी २०१० पासून पाटबंधारे खात्याकडे अर्ज, विनंत्या करीत आमची जमीन आम्हाला परत तरी द्या किंवा त्या जमीनीचा मावेजा तरी द्या म्हणून प्रशासनाचे उंबरे झिजवले. मात्र प्रत्येकवेळी त्यांच्या पदरी निराशा पडली. एकदा त्यांनी मंत्रालयात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांची फाईल वेगाने फिरली. मंत्रालयीन लढाईत त्यांच्या बाजुने निकालही लागली. मात्र त्याचवेळी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण त्यांचा मुलगा अर्जुन साळुंके यांनी हाती घेतले. मात्र पाटबंधारे खात्याचे अधिकारी पुन्हा प्रत्येक ठिकाणी टोलवा टोलवी करू लागल्याने अर्जुन यांनीही बीड येथील पाटबंधारे खात्याच्या कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन केले. यात त्यांचा जीवही गेला. आता हीच अर्धवट लढाई अर्जुन यांची पत्नी तारामती लढत आहेत. त्यांनी अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणं केली मात्र त्याचं आंदोलन बेकायदेशीर असल्याचे शेरे खालच्या अधिकार्‍यांनी मारले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनीही त्यांचे आंदोलन बेकायदेशीर म्हणत त्यांच्यावर सतत अन्याय केला. आणि गुन्हे दाखल करण्याचीही नोटीस त्यांना बजावण्यात आली. त्यामुळे तारामती यांनी थेट आपल्या पतीचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्याच ठिकाणी स्मशानभुमीत २६ जानेवारी २०२२ पासून आंदोलन सुरु केले. मात्र दहा दिवस झाले तरी एकही प्रशासकीय अधिकारी त्यांच्या आंदोलनाकडे फिरकत नसल्याने त्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला. गुरुवारी त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडे आपण जीवच देणार, जगून तरी काय उपयोग असे म्हणत आपल्या पतीच्या मार्गाने जाण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी समयसुचकता दाखवत त्यांना विविध प्रकारे धीर देण्याचा प्रयत्न केला. आज अखेर त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार हे आंदोलन महिला दिनाच्या पुर्वसंध्येपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत आपल्या प्रश्नावर प्रशासनाने तोडगा न काढल्यास आपण महिला दिनापासून पुन्हा इथेच उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, भाजपा नेते बाळासाहेब मोरे, उपाध्यक्ष मराठवाडा ऑल इंडीया पॅथर नितिन सोनावणे, काॅग्रेस नेते गणेश बजगुडे,आपचे अशोक येडे, ज्ञानेश्वर राऊत ,रामधन जमाले,विश्व सेवाभावी संस्था अध्यक्ष किस्कींदा पांचाळ, बाळसिंह परदेशी, पालीचे सरपंच दशरथ राऊत ,संतोष राऊत, शिवबा संघटना जिल्हाध्यक्ष हनुमान मुळीक, कोळवाडी उपसरपंच तुलसीदास महाराज शिंदे, आदि सहभागी होते 


*बोंबा मारत प्रशासनावर अंत्यसंस्कार*

जिल्हा प्रशासनाची या प्रकरणातील बोटचेपेपणाची भुमिका पाहून सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हा प्रशासनाचे अंत्यसंस्कार करण्याचे आंदोलन हाती घेतले होते. सकाळी 11 वाजता पाली येथून अंत्ययात्रा काढत ती स्मशानभुमीत आणण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या नावे बोंबा ठोकून त्यांचा निषेध नोंदवत रितीरिवाजाप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच उद्यापासून तरी प्रशासन आता जिवंत माणसाप्रमाणे वागेल अशी अपेक्षाही सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रध्दांजलीपर मनोगतात व्यक्त केली.


*शेवटपर्यंत तारामती यांना कुत्र्याची सोबत*

तारामती यांनी स्मशानात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी जिल्ह्यात प्रचंड थंडी पडलेली होती. या ठिकाणी पोलीसांनी कसलाच बंदोबस्त पोलिसांनी दिलेला नव्हता. तारामती यांना रात्रीच्यावेळी इथे भिती वाटत नाही का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे प्रशासनाला चपराक होती. त्या म्हणाल्या, मला खरी भिती प्रशासनातील लोकांची आहे. इथं भुतं नसून प्रशासनात भुतं बसलेली आहेत. माझ्या सुरक्षेसाठी आमचं बाळू नावाचं कुत्रं रात्रंदिवस माझ्यासोबत होतं, असे तारामती यांनी सांगितले.


*ओमप्रकाश शेटे यांची माणुसकी*

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांचे स्वीय सहायक ओमप्रकाश शेटे यांनी ‘कार्यारंभ’ची बातमी वाचल्यानंतर त्यांच्या संवेदनशील मनाला प्रचंड वेदना झाल्या. त्यांनी कार्यारंभला फोन करीत मला त्या महिलेला प्रशासन म्हणून नाहीता माणुसकी म्हणून भेटायचं असे सांगितले. त्यांनी तातडीने औरंगाबादहून पाली गाठत महिलेची विचारपूस केली. तिच्या कागदपत्रांची पाहणी करती राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करीत या महिलेला न्याय देण्यासाठी मध्यस्थी भुमिका केली. शिवाय स्मशानात नको तर आता प्रशासकीय पातळीवर आपण आंदोलन करून न्याय पदरात पाडून घेऊ, तुम्हाला प्रत्येक मदत मी करतो असे म्हणत तिची समजूत काढली. जिल्हा प्रशासन स्मशानात येत नसेल तर त्यांना नक्कीच मुंबईला यावं लागेल असे म्हणत येत्या 8 किंवा 9 तारखेला मुंबईत याच प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे बच्चूभाऊंच्या दरबारात तरी या महिलेला न्याय मिळेल अशी अशा आहे.


*अ‍ॅड.संगिता चव्हाण प्रशासनाला जाब विचारणार*

राज्य महिला आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. संगिताताई चव्हाण यांनी देखील या महिलेची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याचे अश्वासन दिले. शिवाय एका महिलेला स्मशानभुमीत आंदोलन करायला लावणार्‍या प्रशासनाला देखील आपण याचा जाब विचारू, असे सांगितले. शिवाय जिल्हा प्रशासनाला मोबाईलद्वारे संपर्क करून दोन दिवसात लेखी अहवाल महिला आयोगाला द्यावा असे आदेशीत केले आहे. अ‍ॅड.संगिता चव्हाण जेव्हा शिवसेनेच्या पदाधिकारी होत्या त्यावेळी त्यांनी तारामती यांच्या सासुबाईंसोबत मुंबईपर्यंत आंदोलने केलेली आहेत. त्यामुळे या प्रश्नाची व्याप्ती आणि गंभीरता त्यांना अधिक माहिती आहे. 

----------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.