रमजानुल मुबारक - 2023* ✒️सलीमखान पठाण* श्रीरामपूर

 रमजानुलमुबारक -१

*पवित्र रमजान महिना*

*✒️सलीमखान पठाण*
       श्रीरामपूर.
*9226408082.*

सालाबाद प्रमाणे यावर्षीच्या रमजान महिन्याला आजपासून प्रारंभ होत आहे. या महिन्याची सर्व मुस्लीम बांधव आतुरतेने वाट पहात असतात.रमजान महिन्यासाठी सर्व भाविक मानसिक व शारीरिक दृष्ट्या तयार झालेले आहेत. जगभरातील सर्व मुस्लिम बांधव रमजानचे पालन करण्यासाठी सिद्ध झाले असून दररोज सुमारे साडे चौदा ते पंधरा तासांचा उपवास,त्याचबरोबर पाच वेळा नमाज व रात्रीची विशेष तरावीहची नमाज आदा करण्यासाठी तयार झाले आहेत.दिवसभरात वेळ मिळेल तसा आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून कुरआन पठण करून भक्तिभावाने या महिन्याचे पालन करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो.
रमजान महिना म्हणजे उम्मते मोहम्मदीला मिळालेली एक ईश्वरीय देणगी आहे.या महिन्याचे पालन करीत असताना आपल्यातील सर्व अवगुण दूर करून सद्गुणांचा स्वीकार करण्यासाठी या महिन्याचे पालन सर्वार्थाने केले जाते.पाच वेळा नमाज पठण, रात्री तराविहची नमाज, दिवसभराचा रोजा हे सर्व पालन करताना चुकीच्या गोष्टी करायला कोणाला वेळच मिळत नाही.म्हणूनच रमजान महिना हा इबादत अर्थात प्रार्थनेचा महिना म्हणून ओळखला जातो. याबाबत प्रेषित हजरत पैगंबरांनी म्हटले आहे कि - शाबान हा माझा महिना असून रमजान हा अल्लाहचा महिना आहे.या महिन्यातील सर्व पुण्य कार्याचे परिणाम अल्लाह देणार आहे. म्हणजेच आपण जे काही सत्कर्म करणार आहोत त्याचे पुण्य किती द्यायचे ते अल्लाहच्या मर्जीवर अवलंबून आहे.
रमजान महिन्यांमध्ये प्रत्येकाच्या दिनचर्येमध्ये आमूलाग्र बदल झालेला असतो.दररोज सकाळी कधीही वेळेवर न उठणारा माणूस या महिन्यात पहाटे काळजीपूर्वक जागा होतो.नमाज अदा करतो व आपल्या दैनंदिन कामकाजासाठी तयार होतो.या महिन्यांमध्ये प्रत्येक चांगल्या कार्याचे पुण्य सत्तरपट दिले जाते.दया,करुणा,भक्ती या सर्व गोष्टींचा महापूर या महिन्यांमध्ये आलेला दिसून येतो. जास्तीत जास्त सत्कर्म करून आपल्या खात्यामध्ये पुण्य जमा करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो.आपल्या वर्तनामध्ये आमुलाग्र बदल घडवीत असतो.परंतु हा बदल केवळ रमजान महिन्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण आयुष्यभर राहिला पाहिजे तरच रमजानचे सार्थक होईल.
रमजान महिन्यामध्ये प्रत्येक कार्य अल्लाहच्या मर्जीसाठी केले जाते. तहान लागलेली असताना पाण्याला शिवण्याची सुद्धा इच्छा होत नाही.यामध्ये अल्लाहचा आदेश मोडेल ही भीती मनात असते.म्हणूनच आपण सर्वजण अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी सर्व सहन करतो.हे सर्व सहन करण्याची ताकद कुठून मिळते ? तर मनाचा निश्चय आपल्याला मिळवून देतो. सूर्यास्तानंतरच आपल्याला जेवायचे आहे किंवा पाणी प्यायचे आहे,ही श्रद्धा मनामध्ये निश्चय निर्माण करते. आपण करीत असलेल्या या वर्तनाने अल्लाह प्रसन्न होईल ही भावना त्यामागे असते.म्हणूनच अतिशय भक्तिभावाने आपण रमजानचे पालन करीत असतो.
या वर्षी उन्हाळा तीव्र असल्याने निश्चित त्याचा परिणाम  होणार आहे. परंतु वृध्द माणसे, आजारी रुग्ण, लहान मुले आदींना या मध्ये सूट दिलेली आहे. खूपच जास्त उष्णता असल्यास रमजानचे रोजे तहकूब करता येतात. 
अल्लाहतआला सर्वांना रमजान महिन्याचे पूर्ण पालन करण्याची शक्ती देवो.आमीन.
(क्रमश:)
**********************

रमजानुलमुबारक - २

*रमजान - निश्चयाचा काळ*

*सलीमखान पठाण*
.     श्रीरामपूर
*9226408082.*

रमजान महिन्यामध्ये प्रत्येक कार्य अल्लाहच्या मर्जीसाठी केले जाते. तहान लागलेली असताना पाण्याला शिवण्याची सुद्धा इच्छा होत नाही. यामध्ये अल्लाहचा आदेश मोडेल ही भीती मनात असते.म्हणूनच आपण सर्वजण अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी सर्व सहन करतो.हे सर्व सहन करण्याची ताकद कुठून मिळते ? तर मनाचा निश्चय आपल्याला ती मिळवून देतो. सूर्यास्तानंतरच आपल्याला जेवायचे आहे किंवा पाणी प्यायचे आहे,ही श्रद्धा मनामध्ये निश्चय निर्माण करते आणि आपण करीत असलेल्या या वर्तनाने अल्लाह प्रसन्न होईल ही भावना त्यामागे असते. म्हणूनच अतिशय भक्तिभावाने आपण रमजानचे पालन करीत असतो .
या वर्षी उन्हाळा तीव्र असल्याने निश्चित त्याचा परिणाम  होणार आहे. परंतु वृध्द माणसे, आजारी रुग्ण, लहान मुले आदींना या मध्ये सूट दिलेली आहे. खूपच जास्त उष्णता असल्यास रमजानचे रोजे तहकूब करता येतात. 
निसर्ग हा अल्लाहच्या आदेशानुसार कार्यरत असतो.गेले काही दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस येतोय. त्यामुळे वातावरणामध्ये थोडेसे वेगळेपण जाणवत आहे.निसर्गात होणारा बदल रोखणे हे आपल्या हातात नाही.आपण वाहत्या पाण्याला बांध घालू शकतो, पावसाला नाही.हवेला रोखणे आपल्या हातात नाही.एसी लावून आपण  गारवा निर्माण करू शकतो, पण उष्णता रोखणे आपल्या हातात नाही. ज्या गोष्टी आपल्या ताब्यात नाही त्या करण्याचा प्रयत्न करू नये.  निसर्ग हा ईश्वर निर्मित आहे. आपण जर निसर्गात बदल करायला लागलो तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्यालाच भोगावे लागतील.तेव्हा अल्लाह ने ज्या गोष्टी निर्माण केल्या, त्यांचा सुयोग्य वापर करून आपण मानवतेसाठी त्यांचा सदुपयोग केला पाहिजे. रमजान महिन्यामध्ये केले जाणारे सर्व सोपस्कार हे मानवाच्या भल्यासाठी निर्मिले गेले आहेत .
अल्लाहतआला सर्वांना रमजान महिन्याचे पूर्ण पालन करण्याची शक्ती देवो.आमीन.(क्रमश:)
**********************

रमजानुलमुबारक - ३

*जीवनात संयम आवश्यक*

*✒️सलीमखान पठाण*
          श्रीरामपूर
    9226408082.

पवित्र रमजान महिना हा अल्लाहचा महिना असल्याने या महिन्यातील प्रत्येक कार्याचे पुण्य सत्तर पट असते.रमजान महिना म्हणजे सत्कार्याचा महापूरच.महिनाभर सर्वांची दिनचर्या बदललेली असते. सहेरी,नमाज,तीलावत, अल्लाहचे नामस्मरण इत्यादी धार्मिक विधी मध्ये दिवस निघून जातो.अल्लाहचे नामस्मरण केल्याने मनाला शांती मिळते. कुरआन पठण केल्याने कुरआनामध्ये अभिप्रेत असलेला अर्थ समजण्यास मदत होते. म्हणून कुरआन शरीफ वाचतांना तो आपल्या भाषेत भाषांतरित असला तर अधिक उत्तम. मराठी भाषेत सुद्धा भाषांतर उपलब्ध आहे. वारंवार वाचन केल्याने कुरआनचा अर्थ आपल्याला कळतो. अल्लाहनिर्मित ग्रंथ असल्याने आणि तो मूळ अरबी भाषेत असल्याने ती भाषा आणि त्या शब्दांचा अर्थ समजून घेऊन आपण कुरआन चा अर्थ लावला पाहिजे.
भारतीय राज्य घटनेत देखील कुरआन शरीफ ला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. म्हणूनच एका माथेफिरूने सर्वोच्च न्यायालयात कुरआन मधील काही आयती विरोधात दाखल केलेली याचिका घटनेमधील तरतुदींचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने नुसतीच फेटाळली नाही तर संबंधिताला 50 हजार रुपयांचा दंड केला. केवळ राजकीय उद्देशासाठी अशा पद्धतीच्या घटना अधूनमधून घडत असतात. परंतु यातून कुरआनशरीफ बद्दल इतर धर्मीयांमध्ये असलेले औत्सुक्य आणखी वाढीस लागले.भारतातील मराठी भाषेसह सर्व भाषांमध्ये कुरआन शरीफचे भाषांतर उपलब्ध असून लोक त्यांचे वाचन करून कुरआनबद्दलचे आपले ज्ञान समृद्ध करून घेत आहेत. रमजान महिन्यामध्ये कुरआन शरीफचे पृथ्वीतलावर अवतरण झाले असल्याकारणाने या महिन्यात विशेष करून कुरआनचे वाचन,पठण केले जाते.
कुरआन हा साक्षात अल्लाहची किताब असून पृथ्वीवरील लोकांच्या भल्यासाठी त्यामध्ये आवश्यक त्या सर्व बाबी नमूद केल्या आहेत.कोणती संकटे येणार आहेत याचे सूतोवाच करतानाच त्यापासून सुटका कशी करावी याचे मार्गदर्शन देखील त्यात केलेले आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण कसे वागावे याचे मार्गदर्शन आहे. रोजचे व्यवहार करताना कोणती पद्धती अमलात आणावी, व्यापार-उदीम करताना नफा किती असावा हे सुद्धा त्यात नमूद केले आहे. दररोज घडणाऱ्या प्रत्येक व्यवहारांमध्ये आपली भूमिका काय असावी याचे सखोल मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी दररोज कुरआन शरीफचे वाचन करून त्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. केवळ  वाचून मनाचे समाधान न करता आपल्या मातृभाषेत किंवा आपल्याला समजेल अशा भाषेत तो वाचावा म्हणजे आपले ज्ञान अद्ययावत होण्यास आणि अंमलबजावणी करण्यास सोयीचे जाते.प्रत्येक गोष्टी मध्ये नेहमी संयम बाळगावा. संयम बाळगल्याने कामे सुकर होतात. आततायीपणा विनाशाकडे नेतो. (क्रमश :)
**********************

रमजानुल मुबारक -४

*कुरआन समजून घेताना ...*

*✒️सलीमखान पठाण*
        श्रीरामपूर
*9226408082*

पवित्र रमजान महिन्यांमध्ये इस्लामी धार्मिक ग्रंथ कुरआन शरीफ चे अवतरण पृथ्वीतलावर झालेले आहे.सुमारे साडे तेवीस वर्ष कालावधी त्यासाठी लागला.प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहू अलैही व सल्लम यांचेवर अल्लाहचे विशेष देवदूत (फरिश्ता) हजरत जिब्रईल अलैसलाम हे अल्लाहचा संदेश घेऊन येत असत.मक्का शहराजवळील गार ए हिरा या गुहेमध्ये हजरत पैगंबर प्रार्थना करीत असतांना तेथे हे देवदूत येऊन त्यांना कुरआन मधील आयत वाचून दाखवित होते. हजरत पैगंबर ती पाठ करून घेत व आपल्या अनुयायांना सांगून तिचे लेखन करून ठेवीत होते.अशा पद्धतीने साडे तेवीस वर्षांमध्ये तीस खंडांचा हा दैवी ग्रंथ पृथ्वीतलावर अवतरीत झाला. हा दैवी ग्रंथ समस्त मानव जातीसाठी आहे.
रमजान महिन्यांमधील विशेष प्रार्थनेचा भाग म्हणून घराघरातून खूप मोठ्या प्रमाणात महिनाभर कुरआन शरीफचे वाचन केले जाते.त्याचा अर्थ समजून घेतला जातो.
अल्लाहतआला ला जो संदेश त्यातून अभिप्रेत आहे तो समजावून सांगण्याचे कार्य कुरआनशरीफचे जानकार करतात.
कुरआन शरीफ म्हणजे दैनंदिन जीवनाची दैवी घटना आहे.घटनेमध्ये ज्या पद्धतीने नियम,अटी असतात. त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपण जीवन व्यतीत केले पाहिजे,त्या प्रत्येक बाबीचे सखोल मार्गदर्शन कुरआन शरीफ मध्ये केलेले आहे. कोणते वाईट कृत्य केल्याने त्याचे काय परिणाम होतात हे सुद्धा त्यात नमूद केले आहे. प्रत्येकाने आपले जीवन सचोटीने जगावे,वागावे, बोलावे आणि चालावे ही शिकवण कुरआन शरीफ मध्ये दिलेली आहे.
दैनंदिन व्यवहारामध्ये कशा पद्धतीने आपण वर्तन केले पाहिजे या बाबी त्यात सांगितलेल्या आहेत. नातेवाईक, कुटुंब, मित्रपरिवार या प्रत्येकाचे कोण कोणते अधिकार आपल्यावर आहेत,आपले कर्तव्य त्यांच्या प्रति काय आहेत या बाबी देखील नमूद केल्या आहेत.आपले जीवन समृद्ध आणि सार्थक होण्यासाठी प्रत्येक माणसाने कशा पद्धतीने वागले पाहिजे याचे ही मार्गदर्शन या दैवी ग्रंथामध्ये केलेले आहे.ज्याने कुरआन शरीफ मधील शिकवण अंगीकारली त्याचे जीवन कारणी लागले असे समजले जाते.आपल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब कयामतच्या दिवशी प्रत्येकाला द्यावयाचा असल्याने प्रत्येकाने पापभिरू वृत्तीने वागले व जगले पाहिजे हा मूलतः संदेश कुरआनमध्ये दिलेला आहे.चांगले जीवन जगण्यासाठी कुरआनचा संदेश समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे.(क्रमशः)
*********************


रमजानुल मुबारक - ५


*मानवी प्रशिक्षणाचा काळ*


*✒️सलीमखान पठाण*
               श्रीरामपूर

           ९२२६४०८०८२



रमजान महिना ही जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक पर्वणी आहे. व्यक्तीच्या प्रशिक्षणाचा हा काळ आहे. दैनंदिन जीवनामध्ये वावरतांना अनेक प्रसंगांना  आपल्याला सामोरे जावे लागते.त्यांना सामोरे जाताना आपण कशा पद्धतीने वागले पाहिजे याचे प्रशिक्षण रोजाच्या माध्यमातून रमजान महिन्यात होत असते. यासाठी केवळ उपाशी राहून चालत नाही. तर प्रत्यक्ष कृतीची गरज असते आणि महिनाभर झालेली ही कृती पुढे वर्षभर जर आपल्या जीवनात टिकली तर आपण जिंकलो.

रोजा असो अगर नसो, प्रत्येक माणसाने बोलताना आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अश्लील बोलणे, शिव्या शाप देणे, खोटं बोलणे या कृतीमुळे व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो.रोजामुळे आपण कसे वागावे याची एक सीमारेषा आखली जाते. विनाकारण कुणाशी वाद घालू नये, कुणाची निंदा करू नये, शिव्याशाप देऊ नये, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावेल असं कोणतंही वक्तव्य आपण करू नये ही सर्व शिकवण रोज्यातून मिळत असते.

दैनंदिन जीवनामध्ये व्यक्तीने कसे वागावे याची एक आचारसंहिता इस्लाम धर्माने कुरआनच्या माध्यमातून घालून दिलेली आहे. प्रत्येकाने त्या पद्धतीनेच वागले पाहिजे. व्यवहारांमध्ये सचोटी असावी. वागण्यामध्ये नम्रता असावी. कुणाची ही पाठीमागे निंदा करू नये याला गिबत म्हणतात. हा सर्वात मोठा रोग प्रत्येकाला लागलेला आहे. एखाद्याचं चुकलं असेल तर समोरासमोर त्याला सांगणे कधी ही चांगलं. परंतु पाठीमागे दुसऱ्याजवळ त्याच्याबद्दल निंदात्मक बोलणे हे मान्य नाही. कोणी जर आपल्याशी विनाकारण भांडत असेल तर त्याच्या तोंडी  न लागता भाऊ मला रोजा आहे असे सांगून शांत राहावे.

आपला रोजचा वेळ ईश्वर भक्तीसाठी समर्पित करावा. ईश्वराचे म्हणजे अल्लाहचे नामस्मरण करावे. कुरआन पठण करावे. दानधर्म करावा. आपल्या घरामध्ये चांगले खात असताना आपला शेजारी भुकेला आहे किंवा कसे याची दक्षता घेण्याची शिकवण सुद्धा हजरत पैगंबरांनी दिली आहे.

रमजान महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या संस्कारांचे मोठे पुण्य आहे. हा पुण्यसंचय करण्यासाठी प्रत्येकाने अल्लाहतआला ने निश्चित केलेल्या मार्गानुसार व हजरत पैगंबरांनी दिलेल्या संदेशानुसार आपले जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केला तर जीवनातून सर्व प्रकारच्या चुकीच्या चालीरीती,वाईट प्रथा नष्ट होऊन एक सार्थ आणि परमार्थ जीवन जगता येईल. आपल्यामुळे इतरांना दुःख होईल किंवा यातना होतील असं वर्तन कुणीही करू नये.याचे प्रत्यक्ष आचरण रमजान महिन्याच्या माध्यमातून केले जाते.ते अंगिकारून प्रत्येकाने आपले जीवन सफल करण्याचा प्रयत्न केल्यास यथार्थ जीवन जगल्याचे समाधान आपल्याला प्राप्त होऊ शकते. यासाठी मनाचा निश्चय करून आपण आपले दैनंदिन वर्तन केले पाहिजे. स्त्री आणि पुरुष दोघांना या सर्व बाबी लागू आहेत.(क्रमशः)

*********************





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.