*लेख*
*आज एका प्रश्नाने पुन्हा,मन विषण्ण झाले.*
माणूस हा सामाजिक प्राणी आहे,त्यामुळे त्याला समाजातच रहावे लागते,समाजाच्या रिती रिवाजानुसार चालावे लागते.मान्य आहे काही गोष्टी...पण काही गोष्टींचा अतिरेक होतो तेव्हा प्रश्न पडतो आपण खरचं माणूस म्हणून जन्माला आलो का? प्रश्नांचे विचार चक्र भरदाव वेगाने धावते.बऱ्याच जणांना हा विषय नकोसा वाटेल,पण ज्यांना पडतो त्यांची किती कुचंबना होत असेल याची तुम्हाला थोडी ही किमंत नसेल.*जावे ज्यांच्या वंशा,तेव्हा कळे*,त्यामुळे बोलले नाही तर असाच अपमान,असेच प्रश्न उपस्थित राहणार.हा समाज आहे,तो कसा नावे ठेवेल,कसा वागेल काही सांगू शकत नाही.त्यांना कोणते प्रश्न निर्माण होतील काहीच सांगू शकत नाही.
*एका महिलेच्या पतीचे निधन झाले तिने टिकली लावली तर चालते पण,आज ती चक्क कुंकू लावून आली,असे चालते का?* असा प्रश्न विचारला तेव्हा मन सुन्न झाले.काय करावे,अन् काय करू नये अशा प्रश्नांचे तेच समजेना.कितपत योग्य असे प्रश्न निर्माण करणे.प्रथम ती महिला एक मानव आहे हे तर स्वीकारा.नंतर ती स्री की पुरुष.अन् नंतर तिचा पती जिवंत की देवाघरी गेला?अहो,एक मानव गेला देवाघरी.. .अन् प्रत्येक जन जाणारच आहे ना?आहे तो पर्यंत तरी आनंदाने,सन्मानाने एकमेकांना जगू द्या.कुंकू,टिकली,गंध का लावावा याच्या मागचे शास्त्रीय कारण तरी जाणून घ्या.ते प्रत्येक स्री पुरुषांनी लावावे.आज्ञा चक्र त्याने कार्यान्वित होते.मग ते लावण्याची अशी काही मक्तेदारी असते का?कुंकू,टिकली,गंध लावल्याने चेहरा/ रूप ही खुलते,प्रसन्न वाटते.
पती गेल्यावर ती महिला त्या पुरुषाची पत्नीचं असते ना? त्यांच्या मुलांची आईच असते ना? तिच्या आई बापाची मुलगीच ना? भावा बहिणींची बहिणच ना?सासू सासऱ्यांची सूनच ना? काय बदलते ते तरी सांगा?म्हणून अशी तुच्छ वागणुक दिली जाते.माणुसकी पायदळी तुडवून..आपुलकीचा गळा घोटून काय मिळते?आपण काय चुकीचे वागलो याचा त्यांच्या वागणुकीत तर थोडा ही लवलेश दिसत नाही.*दाखवायचे दात एक तर,खायचे दात वेगळे असतात*.उलट तिचा पती गेल्यानंतर ती तिचे स्वतः कुटुंब सांभाळते..तिच्या घरात वरून तरी काही पडत नाही..तिलाच कमवावे लागते ना? का तुम्ही तिचे घर चालवतात?.... तिचे व तिच्या कुटुंबाचे ती पोट भरू शकते.तुम्ही तिला मानसिक आधार देण्या ऐवजी अजून मानसिक खच्चीकरण करतात.अहो,आता तरी विचार बदला.पत्नी देवाघरी गेल्यावर ,पुरुष कोणती बंधने पाळतो हो? अन् का पाळावी? मग महिलांनी पण,नको ती बंधने का पाळावी? किंवा त्यांच्या वर बळजबरी का करावी? कोठे गेली समानता? कोठे गेली नितीमत्ता? विषमता दरी अजून किती खोल जाणार? तिला कुंकू लावल्याने ती काही मोठी होणार नाही?पण,मनाने ती पुर्ण खचेल?हा साधा विचारही मनात येवू नये,खूप खेददायक गोष्ट.आपल्याच भाव विश्वात रमताना इतरांना वेदना देणे कितपत योग्य?कोणी दिला तुम्हाला अधिकार?असे इतरांना दुय्यम वागणुंक देण्यास?हा प्रश्न माझा संपूर्ण मानव जातीला आहे?पण,तो सर्वाधिक प्रत्येक महिलेला आहे.थोडा विचार कर..कितपत योग्य आहे असे आपले वागणे? कमी लेखणे? तुमचा पती जिवंत आहे खूप उत्तम,पण तिचा पती गेला म्हणून तिला इतकी हिन वागणूक देणार.तुमचे सोहळे नको तिला,हवी फक्त माणुसकी,समानता..ती ही जाणारच की या जगातून..तुम्ही राहणार आहात का? अमर आहात का?जास्त विचार करू नका,फक्त त्या महिलेच्या जागी स्वतः ला ठेवून पहा.मग,सांगा काय वाटले? कोठे चुकते तुमचे? ती ही माणूसच आहे इतके लक्षात ठेवा.माणूस म्हणून जन्मा आला,माणूस म्हणून जग तरी...अन् जगव ही.
विधवा शब्दच आपल्या शब्द कोषातून बाद झाला पाहिजे.विधुर या शब्दाला कधी कोणी बाटवले नाही मग या विधवा शब्दाला का इतके बदनाम केले.तो शब्द काढून टाकला की सर्व सामान्य जीवन जगा अन् जगू द्या.असे घडले तर कोणते अत्याचार ही घडणार नाही.आपले विचारांना लागलेली वाळवी एकदा कायमची नष्ट झाली पाहिजे.मग,झाले...सर्व काही सुरळीत होईल.ती नारी तुमच्या पेक्षा किती तरी महान,एकटी जीवनाची लढाई लढते.अन् ती ही खंबीर पण..हेच पाहवत नाही असे वाटते..ही जळकी वृत्ती सोडून द्या. जगा अन् जगू द्या.माणूस म्हणून जर जन्मा आले असाल तर माणूस म्हणून जगा अन् जगवा.
संक्रांती सणाच्या वेळी वर्तमान पत्रातून मोठ मोठ्या हेड लाईन येतात...विधवा महिलेचा सन्मान..हळदी कुंकवात मान....तो त्यांचा अधिकार आहे,तुम्ही काही त्यांच्या वर उपकार करत नाही.हिटलर शाही बंद करा म्हणजे झाले.गुलाम गिरी कोणी सहन करनार नाही?अत्याचार करून पशु होण्यापेक्षा प्रेम,माया,ममता,जिव्हाळा देवून माणूस म्हणून जगा.तुमच्या शिक्षणाचा उपयोग काय? जे शिक्षण योग्य,अयोग्य विचार करायला शिकवत नसेल तर अशा शिक्षणाचा उपयोग काय? बुध्दी वर गंज का चढू देता? कधी तरी ब्रेन वाश करून जगा...अन् जगवा..माणुसकीचे बीज कार्यातून रोवा... *भिक नको पण कुत्रे आवर*,अशी सांगण्याची वेळ नका येवू देवू.माझी अहिल्यामाता आज असती तर,असे चित्र नक्कीच नसते..तुमच्यातील अहिल्या मातेला जागे करा..उघड्या डोळ्यांनी पहायला शिका.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो ते प्राशन करेल तो गुर गुरल्याशिवाय राहणार नाही.एका शिक्षिकेने दुसऱ्या शिक्षिकेला समजून घेतले तरी आमूलाग्र बदल घडेल.विचार शक्ती ने बऱ्याच मैत्रिणी दुरावल्या..पण,हो हो करत राहिले असते तर मग मी खूप गुणी समजली गेली असते..या समाजात.आवाज उठवला की,खूप शहानी समजते स्वतः ला?असे वक्तव्य तोंडातून पडतात.माणूस या शब्दाचा अर्थ जाणून जीवन जगावे.
stay connected