रमजानुल मुबारक - ६
*भावनांची जाणीव होण्याचा काळ*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*९२२६४०८०८२*
रमजान महिन्यात केले जाणारे प्रत्येक कार्य हे एकीकडे पुण्य प्राप्तीचा आनंद देत असतांना दुसरीकडे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देखील देत असते. उदार अंत:करणाने लोक रमजान महिन्यामध्ये दानधर्म करतात.वस्तू वाटप करतात.गरजूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण हिरीरीने सहभागी होतो.यातूनच मानवतेच्या मूल्यांची जोपासना होते. रमजानचा रोजा धरल्याने तहान,भूक याची जाणीव व्यक्तीच्या ठायी निर्माण होते.जिथे पाणी मिळत नसेल तेथील लोकांची तहान कशी भागत असेल याची कल्पना रोज्यामुळे निर्माण होते.ज्यांना वेळेवर खायला अन्न मिळत नाही ते आपली भूक कशा पद्धतीने भागवत असतील याची जाणीव भूक लागल्यावर होते.त्याचबरोबर सुदृढ शरीरासाठी उपवास करणे अर्थात भुकेले राहणे सुद्धा आवश्यक आहे ही बाब सुद्धा प्रकर्षाने आपल्या निदर्शनास येते.
हजरत पैगंबर यांनी म्हटले आहे कि पोटभर खाऊ नका.शरीराचा एक तृतीयांश भाग अन्न, एक तृतीयांश भाग पाणी आणि एक तृतीयांश भाग रिकामा ठेवावा. तुम्ही कधी ही आजारी पडणार नाहीत.
इस्लाम धर्माने एकमेकांच्या भावना जाणून घेण्याला खूप महत्त्व दिले आहे.जेव्हा आपण रोजा धरतो, त्यातून भुकेची जाणीव निर्माण होते आणि ज्यांच्या घरात कधी कधी खायला काही नसतं असे लोक आपली गुजराण कशा पद्धतीने करत असतील याची जाणीव या रोज्यामुळे निर्माण होते.अशा घटकांची मदत करण्याची भावना व्यक्तीमध्ये वाढीस लागते. हाच रोजाचा महत्त्वाचा उद्देश आहे. गरजूंना मदत केल्याने त्यांच्या गरजा पूर्ण होतात. आपल्याला देखील एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळते.आपल्या उत्पन्नावर फक्त आपला किंवा आपल्या कुटुंबीयांचा हक्क नाही तर,समाजातील असे गोरगरीब,गरजू लोक, मुके प्राणी,पक्षी यांचा देखील हक्क आहे आणि तो आपण आदा केला पाहिजे ही प्रामुख्याने इस्लाम धर्माची शिकवण आहे.तहानलेल्यांना पाणी आणि भुकेल्यांना अन्नदान केले पाहिजे.ही प्रथा जगामध्ये पूर्वीपासूनच आहे.तिचा स्वीकार करून आपणही आपल्या परीने शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न अशा घटकांना केला पाहिजे. ही जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम रमजान महिन्यात होत असते.म्हणून हा महिना गमख्वारी अर्थात दु:ख वाटून घेउन मदत करण्याचा महिना म्हणून देखील ओळखला जातो.(क्रमशः)
**********************
रमजानुल मुबारक - ७
*कुरआन -३० पारे,११४ सुरए*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082.*
जगभरात सर्वात जास्त वाचला जाणारा ग्रंथ म्हणजे कुरआन शरीफ होय.संपूर्ण वर्षभर दररोज वाचला जाणारा हा ग्रंथ जगभरातील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाषेत उपलब्ध आहे हे याचे वैशिष्ट्य आहे.हजरत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या प्रेषित्वाच्या काळामध्ये जसे जसे प्रसंग आले,त्यानुसार अल्लाहने आपल्या देवदूतामार्फत मार्गदर्शनपर सूचना कुरआनच्या रूपात हजरत पैगंबरांपर्यंत पोहोचविल्या.कुरआन शरीफचे ३० खंड (पारे) असून यामध्ये ११४ सुरए आहेत. प्रत्येकाला स्वतंत्र नाव आहे.सर्वात पहिली सुरत सुर ए फातिहा असून कुरआन शरीफचा प्रारंभ सूरए फातिहा ने झाला आहे. मक्का आणि मदिना अशा दोन्ही ठिकाणी ही सुरत अवतीर्ण झाली आहे.सर्वात जास्त पठण करण्यात येणारी सुरत म्हणून सुर ए फातेहाची ख्याती आहे. प्रत्येक नमाजमध्ये प्रत्येक रकअतमध्ये याचे पठण केले जाते. सुरए फातिहा ची पंधरा नावे आहेत. यावरून तिचे महत्त्व लक्षात येते.
कुरआन मधील प्रत्येक सुरत चे विश्लेषण (तफसीर) करण्यात आलेले आहे. वारंवार वाचन आणि पठण करून कुरआन शरीफ समजून घेतल्यास प्रत्येक प्रश्नाची उकल त्यातून प्राप्त होते.जीवनात कुरआन शरीफ मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास आपल्याला योग्य तो मार्ग सापडतो.जगातील सर्व प्रश्नांचा उहापोह कुरआनमध्ये करण्यात आलेला आहे. मात्र त्याला चिंतन-मनन आणि विश्लेषण करून समजून घेण्याची आवश्यकता आहे. प्रेषित हजरत पैगंबरांनी त्यांना प्राप्त झालेले ज्ञान आपल्या अनुयायांमार्फत लोकांपर्यंत पोहोचविले आहे.
सुरए फातिहा मध्ये सात आयत असून २७ शब्द व १४० अक्षरे आहेत. अरबी भाषेत हे सर्व साहित्य आहे. सुर ए फातिहाला फातेहातुल किताब,सुरतुल हम्द, उम्मुल कुरआन,उम्मुल किताब, अस्सबुल मसानी,सुरतुल कंज,सुरतुल वाकिया, सुरतुल काफिया, सुरतुस्सशिफा, सुरतुस्स शाफिआ, सुरतुददुआ, सुरतुल मुनाजात देखील म्हटले जाते. कुरआन शरीफ मधील सर्वश्रेष्ठ सुरत म्हणून हिचा उल्लेख होतो.सुरए फातिहा सर्व प्रकारच्या आजारासाठी उपयुक्त असून पाण्यावर दम करून रुग्णाला पाजल्यास आराम मिळतो.
रमजान महिन्यामध्ये प्रत्येक नेक कार्य सत्तर पट पुण्य प्राप्त करुन देणारे असते म्हणून या महिन्यात जास्तीत जास्त वेळ कुरआन पठनासाठी दिला जातो.
(क्रमश:)
----------------------------------
stay connected