केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार?
➖➖➖➖➖➖➖➖
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली. पण कांद्याची निर्यात वाढून भाव जास्त वाढणार नाही, याचीही काळजी घेतली. कारण सरकारने प्रतिटन ५५० डाॅलर किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्काची खुट्टी मारून ठेवली. त्यामुळे आपला कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक देशांच्या तुलनेत महाग झाला. यामुळे कागदोपत्री निर्यात उठवली असली तरी प्रत्यक्षात निर्यातीला लगाम लावलेला आहे.निवडणुकीत कांदा निर्यातबंदीचा मुद्दा अंगलट येतो आहे आणि विरोधक याचा प्रचार करत आहे, हे लक्षात आल्यानंतर सरकारने धुळफेक करून दोन वेळा यावरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अपयश आले. त्यामुळे केंद्र सरकारने शनिवारी (ता.४) सकाळी निर्यातबंदी उठवल्याची अधिसूचना काढली.
यानंतर बाजारात कांद्याच्या भावात आज ५०० ते ७०० रुपयांपर्यंत वाढ झाली. कांद्याचा भाव २ हजार रुपयांवर पोचला. पण कांदा भावात लगेच फार मोठ्या तेजीची शक्यता धुसरच आहे. कारण सरकारने निर्यातबंदी उठवताना निर्यात आणि कांदा भाव जास्त वाढणार नाही, याची काळजीही घेतली.सरकारने अधिसूनेतच कांद्यावर प्रतिटन ५५० डाॅलर किमान निर्यात मूल्य (एमईपी) लावले. तसेच त्यावर ४० टक्के निर्यातशुल्क कायम आहे. म्हणजेच एमईपीच्या ४० टक्के शुल्क कांदा निर्यातीवर लागणार आहे. हे शुल्क होते टनाला २२० डाॅलर. म्हणजेच कांदा निर्यातीचे मूल्य टनाला किमान ७७० डाॅलर राहणार आहे. रुपयात जर याचा हिशोब केला तर टनामागे किमान ६४ हजार २०२ रुपये दराने कांदा निर्यात होईल. म्हणजेच निर्यातीच्या कांद्याचा किमान भाव किलोमागे ६४ रुपये असेल.
*भारताचा कांदा महाग झाला*
निर्यातबंदी उठवल्यानंतर कांद्याचा भाव सरासरी २० रुपये किलोवर पोचला. पण एमईपी आणि निर्यात शुल्कामुळे भारतातून निर्यातीच्या कांद्याचा भाव किमान ६४ रुपये प्रतिकिलो राहील. त्यावर वेगवेगळ्या देशांना निर्यातीसाठी खर्च येतो ५ रुपयांपर्यंत. म्हणजेच कांदा जातो किलोला ७० रुपयांच्या घरात.
पण आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा विचार केला तर अनेक देशांमध्ये कांद्याचा भाव ७० रुपयांपेक्षा कमी आहे. इजिप्तचा कांदा आपल्या कांद्यापेक्षा स्वस्त आहे. आता दुबईसह आखाती देशांमध्ये कांद्याचा भाव ७० ते ७५ रुपये किलो आहे. तर बांगलादेश, श्रीलंका आणि इतर देशांमध्ये कांदा ४५ ते ५५ रुपयांच्या दरम्यान आहे.
*वेगवेगळ्या देशांतील कांद्याचा भाव (प्रतिकिलो)*
देश…कांदा भाव
इजिप्त…३० ते ४० रुपये
चीन…३५ ते ४५ रुपये
बांगलादेश…४५ ते ५० रुपये
श्रीलंका…५० ते ५५ रुपये
पाकिस्तान…६० ते ७० रुपये
आखाती देश…७० ते ७५ रुपये
निर्यात किती वाढेल?
भारताचा कांदा एमईपी आणि निर्यात शुल्कामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात महाग पडत असल्याने केवळ ज्या ठिकाणी आपल्यापेक्षा भाव जास्त आहेत तेथेच जाईल. तसेच केवळ भारताच्याच कांद्याला पसंती असेल तेथे निर्यात होईल. पण जास्त निर्यातीची शक्यता कमीच आहे. दरवर्षी या काळात झालेल्या निर्यातीच्या तुलनेत केवळ १० ते २० टक्केच निर्यात होऊ शकते, असा अंदाज निर्यातदारांनी व्यक्त केल.
शेतकऱ्यांना कितपत फायदा?
कांद्याच्या निर्यात भाव किमान ६४ रुपये होणार असला तरी यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार नाही. कांद्याचे भाव वाढले तरी वाढ मर्यादीत राहू शकते. कांद्याचा बाजार २० ते ३० रुपयांच्या दरम्यानच राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
*निर्यातशुल्कासह इतर शुल्क काढा : निर्यातदार*
सरकारने कांदा निर्यातीवर ५५० डाॅलर एमईपी लावली इतपर्यंत ठिक आहे. पण त्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क काढावे, तसेच कंटेनरवरील ३० टक्के आणि सर्व्हिस चार्ज १८ टक्के आहे तो काढावा, अशी मागणी निर्यातदार करत आहेत. सरकारने जर हा निर्णय घेतला तर निर्यातीच्या कांद्याचा भाव आयातदारांसाठी कमी होईल आणि निर्यात वाढेल. शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळण्यास मदत होईल, असेही निर्यातदारांनी सांगितले.
stay connected