Loksabha Election 2024 : निती भ्रष्ट मार्गाचा सर्रास वापर झाल्याने गाजलेली निवडणूक,
जनतेने निवडणूक हातात घेतल्याने उमेदवारांची झाली दमछाक
अहमदनगर - राजकारणात वापरल्या जाणाऱ्या साम-दाम-दंड-भेद या सर्व अस्त्रांसह नीती भ्रष्ट मार्गांचा सर्रास वापर करूनही अपेक्षित यश मिळण्याची शक्यता नसल्याने अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक ही राज्यात नव्हे तर देशात गाजली आहे.
एकीकडे प्रचंड यंत्रणा, सोबतीला सत्ता,
शासकीय यंत्रणा,अमाप पैसा तर दुसरीकडे अचानक झालेली एन्ट्री, जनतेचा मिळालेला प्रतिसाद आणि जिल्ह्यासह राज्यातील नेत्यांचे मिळालेले पाठबळ त्यामुळे वाढलेला आत्मविश्वास असे चित्र नगर दक्षिण च्या निवडणुकीत दिसून आले.
या मतदारसंघाचे विद्यमान तरुण व तडफदार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक पारनेर चे धडाडीचे आमदार निलेश लंके यांच्या उमेदवारीने अत्यंत कठीण गेल्याचे दिसून येत आहे .जसजशी निवडणूक जवळ येत होती तसतशी प्रचाराची पातळी सुद्धा घसरत चालली होती.एवढेच नव्हे तर मतदानाच्या दिवशी सर्व तंत्र आणि मंत्रांचा वापर करण्यात आला. पैसे वाटप करताना कार्यकर्ते धरले गेले.खोटे मतदान दाखवून आपल्या विरोधातील मते मतपेटीत जाऊ नये यासाठी परस्पर मतदारांना बाहेरच पैसे देऊन व शाई लावून घरी पाठवण्याचा प्रकार उघडकीस आला. तरी सुद्धा शासकीय यंत्रणेने कोणती दखल न घेता सर्व प्रकरणांवर पडदा टाकण्याचा केलेला प्रयत्न,प्रचंड दबावात असलेली शासकीय यंत्रणा या सर्व गोष्टींमुळे नगर दक्षिणची निवडणूक लक्षवेधी ठरली.
राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या संपूर्ण राजकीय अनुभवाचा उपयोग करीत या निवडणुकीमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.आपल्या मुलासाठी त्यांनी नगर दक्षिणचे प्रत्येक तालुक्यामध्ये पायाला भिंगरी बांधल्यागत दौरे केले.प्रत्येक तालुक्यातील पुढाऱ्यांची नस माहीत असल्यामुळे त्यांना आपलेसे करून घेण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला.तंत्र,मंत्र, अर्थ या सर्वांचा वापर करीत जास्तीत जास्त लोकांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या मागे उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मागील पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांनी जे काही मार्ग अवलंबले होते त्यामुळे नाराज झालेली स्व पक्षातील मंडळी तसेच विरोधी पक्षातली मंडळी यांना या निवडणुकीमध्ये सोबत घेण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीने विखेंची पूर्ती दमछाक झाली. प्रचारामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरला आले.मात्र त्यांनी काय भाषण केले हे कोणाला उमगलेच नाही.आपल्या भाषणात त्यांनी सुजय विखेंचा कुठेही उल्लेख केला नाही किंवा त्यांना मत द्या असेही सांगितले नाही. त्यामुळे मोदींच्या सभेचा अपेक्षित फायदा विखेंना झाला नाही. दुसरीकडे निलेश लंके यांनी प्रत्येक तालुक्यात आपली फारशी यंत्रणा नसताना मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपले वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला.आर्थिक बाजू कमकुवत असली तरी नैतिक बाजू भक्कम असल्याने लोकांचा वाढता पाठिंबा त्यांना मिळाला.
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ज्या काही बाबी घडल्या त्या पाहता नीती भ्रष्ट मार्गांचा सर्रास वापर नगर दक्षिण मध्ये झाल्याचे दिसून आले. जी मते आपल्याला मिळणार नाही ती विरोधी उमेदवाराला सुद्धा मिळू नये यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात आली. मतदान केंद्रावर वापरली जाणारी शाई उपलब्ध करून घेऊन परस्पर बाहेरच मतदारांना पैसे देऊन आणि बोटाला शाई लावून तुमचे मतदान झाले आता घरी जा असे सांगण्यात आले.हे प्रकरण उघडकीस आले तरी त्याची फारशी दखल शासकीय यंत्रणेने तरी घेतल्याचे दिसत नाही. दुसरीकडे पारनेर तालुक्यात पैसे वाटप करताना रंगेहात पकडले गेलेले कार्यकर्ते आणि त्यांचे व्हायरल झालेले व्हिडिओ याचाही परिणाम मतदारांवर झाला. पाथर्डी तालुक्यामध्ये मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनाच मॅनेज करण्याचे प्रयत्न झाले.अशा पद्धतीने राजकारणातील जेवढ्या काही गलिच्छ पद्धती असतील त्या सर्वांचा वापर करण्याचा कळस नजर दक्षिणच्या या निवडणुकीत झाला. यावरून सत्ताधारी पक्षाची पायाखालची जमीन सरकली असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
दुसरीकडे विरोधी उमेदवाराला गावातून लोकांनी लोक वर्गणी करून दिली.पारनेर तालुक्यात दुपारून झालेल्या मतदानामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक बूथ सोडून गेल्याची ही चर्चा जिल्ह्यात होत आहे.
त्यामुळे सध्या होत असलेल्या चर्चेतून एकूणच भाजपला हे सीट गमवावे लागते की काय अशी परिस्थिती आहे. दुसरी संशयाची बाब म्हणजे या मतदार संघात झालेल्या निवडणुकीची मतदानाची अंतिम आकडेवारी दोन दिवसांनी जाहीर झाली. सोमवार आणि मंगळवार दोन दिवसात तीन वेळा आकडेवारी बदल झाला.वास्तविक पाहता निवडणूक यंत्रणा एवढी सक्षम आहे कि दोन तासांमध्ये सर्व आकडेवारी उपलब्ध होत असते. मात्र इथे दोन दिवसांमध्ये तीन वेळा निवडणुकीची आकडेवारी बदलली व 56 हजार मते वाढल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबी निवडणूक प्रक्रियेमध्ये संशय निर्माण करणाऱ्या आहेत. यातील खरे काय आणि खोटे काय ते आता चार तारखेला कळेलच,परंतु राजकारणामध्ये कुणी कुणाचं नसतं किंवा फार सरळ पद्धतीने राजकारण करता येत नाही याचा प्रत्यय नगर दक्षिणच्या लोकांना आला. प्रवरेची यंत्रणा तशी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.या ही वेळी ही यंत्रणा सक्रिय होती. परंतु त्यामध्ये पूर्वीसारखा जोश नव्हता. असे चर्चे अंती दिसून येते. प्रचंड दबावांमध्ये कार्यकर्ते सुद्धा काम करीत असल्याचे कळते. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सुद्धा सत्ताधाऱ्यांचा खूपच दबाव होता.या सर्व बाबीमुळे सत्ताधाऱ्यांबद्दल नकारात्मक भूमिका तयार झाली. त्यातच बीडमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागासवर्गीयांबद्दल केलेल्या भाषेमुळे धनगर समाज नाराज झाला तसेच वंजारी समाज ही नाराज झाल्याचे समजते. मुस्लिम समाजाबद्दल उघड उघडपणे विरोधाची भूमिका स्वीकारली गेल्याने हा समाज पहिल्यापासूनच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे या समाजाने कधी नव्हे एवढी एकजुट करीत मागील निवडणुकीपेक्षा अधिक जोमाने मतदानात भाग घेतला. या सर्वांचा परिणाम मतदानावर झाला. शेवटच्या दोन दिवसात बरेच वारे बदलल्याने नगर दक्षिणचा निकाल निलेश लंकेच्या बाजूने लागेल अशीच सार्वत्रिक चर्चा आहे. याबाबत 4 जूनला चित्र स्पष्ट होईल
एक मात्र या निवडणुकीत जे प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे सत्ताधारी पक्षाने राज्यात व जिल्ह्यात येन केन प्रकारे निवडणूक जिंकण्यासाठी सर्व प्रकारचा अवलंब केला. काहींवर दबाव आणून काहींना आर्थिक पाठबळ देऊन तर काहींना दम देऊन सुद्धा शांत बसविण्यात आल्याची चर्चा आता जिल्ह्यात होत आहे. परंतु लोकशाहीमध्ये हे प्रकार चालत नाही. एकदा निवडणूक जनतेने हातात घेतली तर भल्याभल्यांचा पराभव होतो हा या देशाच्या निवडणुकीचा इतिहास आहे. नगर दक्षिण मध्ये हे चित्र पाहायला मिळाले. दक्षिणेच्या प्रत्येक तालुक्यात तुल्यबळ उमेदवार असताना उत्तरेतून डॉक्टर विखे आयात केले गेले. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये ही सल होती. त्यातच विखे यांचा आक्रमकपणा,काम करण्याची बेधडक पद्धत ही अनेकांना जड जाते. ते कोणाचाही मुलाहिजा न ठेवता काम करतात. त्यामुळे त्यांच्यापुढे आपली डाळ शिजत नाही ही सल दक्षिणेतील अनेक तालुक्यात आहे. त्यामुळे उत्तरेचा बोजा दक्षिणेवर नको अशी सुद्धा सार्वत्रिक भावना निर्माण होऊन त्याचाही मोठा त्रास या निवडणुकीत झाला आहे. शेवटी मात्र आता कुणाचे नशीब बलवत्तर आहे हे येत्या चार जूनलाच कळणार आहे.
stay connected