नखशिखांत लावणी हीच महाराष्ट्राची खरी शान-रेश्मा परितेकर भीमथडी मराठी साहित्य संमेलनात लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर यांनी व्यक्त केली भावना !

 नखशिखांत लावणी हीच महाराष्ट्राची खरी शान-रेश्मा परितेकर भीमथडी मराठी साहित्य संमेलनात लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर यांनी व्यक्त केली भावना !



केडगांव,ता.२० : लावणीकला बावनकशी सोने आहे. अलीकडे लावणीला माॅडर्न करण्याचे काम सुरू आहे. अंग प्रदर्शन करून शृंगार रस सादर केला जात आहे. मात्र

नखशिखांत लावणी कला हीच महाराष्ट्राची खरी शान आहे, असे मत लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर यांनी व्यक्त केले. निमित्त होते, भीमथडी मराठी साहित्य संमेलनात लावणी कलेचे बदलते स्वरूप या विषयावर प्रकट मुलाखतीचे. त्यावेळी परितेकर बोलत होत्या, यावेळी ज्येष्ठ लावणी कलावंत व चोफुला येथील रेणुका कला केंद्राच्या संचालिका सुषमा नेर्लेकर व रेखा काळे सहभागी झाल्या होत्या.  


ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी खुमासदार प्रश्न विचारून लावणी कलावंतांना बोलते केले. पेशवाईतील शाहीर सगनभाऊ, होनाजी बाळा यांनी दरबारी लावणी चे फड चालवले. पुढे तमाशा, कलाकेंद्रतून लावणीला लोकाश्रय मिळू लागला. शृंगारिक लावणी रसिकांना मोहिनी घालून मनोरंजन करत असताना मराठी माणूस हरवून जायचा. यात्रा, जत्रामध्ये लावणीला रसिकांनी डोक्यावर घेतले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी वीर रसाच्या लावण्या करून गाजवली, असा संदर्भ देत यादव यांनी रसिकांचे मनात कुतुहल निर्माण करून प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम उंचीवर नेला. 


मी लहान असताना आईच्या बरोबर पायात चाळ बांधून नाचायला शिकले. पोटाची भूक भागवण्यासाठी परंपरागत लावणीकडे वळले. कष्ट आणि मेहनतीने लावणीचा वारसा जतन करताना मानसन्मान मिळाले. पण नखशिखांत लावणीचे सध्या होणारे वस्त्रहरण पाहवत नाही अशी भावना रेश्मा परितेकर यांनी बोलून दाखवली. दिलखेचक अदा आणि ठसकेबाज लावणी सादर करून रसिकांना वेड लावणा-या परितेकर सध्या पुणे विद्यापीठात लावणी कलेवर पीएचडी करीत आहेत. अकलूजला लावणी महोत्सवात चार वेळा प्रथम क्रमांक मिळवला आहे.


राज्यस्तरीय तिसरे भीमथड़ी मराठी साहित्य संमेलनात प्रकट मुलाखतीत लावणीचे बदलते स्वरूप यावर परितेकर म्हणाल्या, "महाराष्ट्राची सांस्कृतिक कला ही लावणी शिवाय पुर्ण होऊ शकत नाही. परंतु, अलिकडे लावणी माॅडर्न करण्याचा प्रयत्न होत आहे, हे योग्य नाही. अगं प्रदर्शन ही लावणीची संस्कृती नाही. पैशासाठी लावणीचे वस्रहरण करणे योग्य नाही, नखशिखांत झाकलेली लावणीचे रसिकांना आकर्षण आहे." काशीचा ब्राह्मण या अदाकारीच्या लावणीची झलक दाखवून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.


लावणी कलावंत रेखा काळे म्हणाल्या, "पारंपरिक लावणीचा रसिक कमी झाल्याने कलावंत अडचणीत आला आहे. राजाश्रयावर काही काळ लावणी जिवंत राहिली, पुढे लोकाश्रय मिळाला. लावणी परंपरा जपण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. लावणीकडे वाकड्या नजरेने पाहणारे आता लावणीवर पोट भरतात. खरा कलावंत मात्र दुर्लक्षित राहिला आहे."


सुषमा नेर्लेकर म्हणाल्या, ''संपूर्ण आयुष्य लावणी नाचवत घालविले. पण आमची पुढील पिढी मात्र बाजूला जाताना दिसते, लावणी ऐवजी नोकरी व धंदा करणे पसंत करत आहे. बावनकशी लावणी जपण्यासाठी लोकश्रय मिळाला पाहिजे. वृद्ध कलाकारांना सरकारने आधार दिला तर या क्षेत्रात लोक येतील. कामापुरती लावणी करणारे खूप आहेत."






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.