"मनुष्य जीवनात सु-संवाद हा हवाच"
*****************************
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे त्याच्या संपूर्ण आयुष्याचा एकमेकांशी संवाद हा एक अविभाज्य घटक आहे.खरं तर त्याचा इतरांबरोबरचा नियमित उत्तम संवाद संपला की त्याच्या जीवनाची वाटचाल औदासीन्य किंवा नैराश्याकडे गेलीच म्हणून समजा,आज रोजच वर्तमानपत्र व न्युज चॅनल मध्ये अनेक लोकांनी विविध कारणांनी वा नैराश्य येऊन आत्महत्या केल्या असे पाहण्यात येते यात विशेष म्हणजे आत्महत्या करण्यात आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात दिसून येते मग प्रश्न असा पडतो असे काय घडते की तरुण पिढीला आत्महत्या हाच एक पर्याय समोर दिसतो एवढे टोकाचे पाऊल उचलण्याइतके नैराश्य त्यांना का येत असेल?दैनंदिन जीवनात येणारे कुठलेही दुःख किंवा अतिरिक्त मनावर येणारा ताण त्यांना का असह्य होत असेल? त्याचे प्रमुख एक मुख्य कारण समोर येते ते म्हणजे त्यांचा स्वतःच्या कुटुंबाशी,मित्र मैत्रिणीशी किंवा समाजाबरोबर होत नसलेला मुक्त संवाद,कुटुंब किंवा मैत्रीत खेळीमेळीचे, विश्वासाचे वातावरण नसेल त्यांच्यात योग्य संवाद होत नसेल तर अशा टोकाच्या घटना घडून येतात.प्रत्येक मनुष्य जीवनात कोणतीच गोष्ट कायम स्वरूपी नसते त्यात काही घटना,प्रसंग,वाईट परिस्थिती ही सुद्धा कायम नसते तिचा कालावधी संपला की ती निघून जाते फक्त त्या काळात माणसाने योग्य व्यक्तीशी,कुटुंबाशी आपल्या माणसाशी योग्य सुसंवाद ठेवणे गरजेचे असते.मनुष्य जीवन आहे चुका तर प्रत्येकाकडून होतच असतात पण त्या झालेल्या चुका मनात ठेवून काहीच साध्य होत नाही उलट स्वतःच्या व इतरांच्या चुकांनाही माफ करून सर्वांबरोबर चांगला संवाद ठेवून आनंदाने जीवन जगण्याचा कायम प्रयत्न केला पाहिजे.समाज व कुटुंबातील चांगल्या संवादामुळे आपले सहजीवन समृद्ध होते मग त्याचा उपयोग समाज व देशहीता साठीही होऊ शकतो.
विज्ञान व अध्यात्माने देखील सांगितले आहे की मानवाच्या जीवनात नैसर्गिक आपत्ती खूप कमी म्हणजे फक्त दोन टक्केच येते बाकी संकटं तो स्वतःच्य्या हातानेच निर्माण करत असतो पण ही गोष्ट त्याच्या लक्षात येण्यासाठीही त्याचा विज्ञान व अध्यात्माशी संवाद असला पाहिजे या संवादामुळेच तो मानसिकदृष्ट्या सक्षम बनू शकतो. संवाद हा प्रेमाचा उगम असतो,भावना व्यक्त करतो तो संवाद पण त्याच संवाद झालेल्या शब्दात वाद ही होतो हे जाणूनच कायम चांगला संवाद साधणे गरजेचे आहे.अबोला धरणं हे वाद टाळत असलं तरी त्यातून नाती संपतात व जवळची माणसं कायम आपल्या पासून दूर जातात.आपल्या जीवनात अगदी आपल्या लहानपणापासून संवादाची भाषा सुरू होते फक्त मनुष्यच नाही तर सगळी सृष्टी,प्राणी,पक्षी सर्वच संवाद साधत असतात.संवाद हा प्रत्येक गोष्टीतच लपला आहे गरज असते तो फक्त ओळखण्याची ताल,
सूर,लय,गायन याचा कलेशी संवाद असतो,पावसाच्या सरींचा निसर्गाशी संवाद चालतो,कोणत्याही प्राण्याच्या पाठीवर मायेने थोपटले तर त्याच्या डोळ्यात तुमच्या विषयी प्रेमाच्या संवादाच्या वेगळ्याच छटा दिसून येतात. पंढरीच्या वारकऱ्यांचा विठ्ठलाशी एक मानसिक संवादच चालू असतो त्यामुळेच विठू नामात ते एवढे दंग होतात की ते आपले सर्व कष्ट यातना विसरतात.
जगात प्रत्येक जणच संवादासाठी आसुरलेला असतो त्याला फक्त तुमच्या दोन गोड शब्दांची गरज असते भले तुम्ही कोणाच्या आर्थिक संकटात मदत नाही केली तरी चालेल पण त्याच संकट काळी त्याच्या बरोबर केलेला प्रेमाचा संवाद त्याला मोठी उभारी देऊन जातो.
आई वडील, पती पत्नी,भाऊ बहीण,मुलगा मुलगी वा इतर प्रत्येक नात्यात सुसंवाद हा कायम असायलाच हवा तो मधुर हवा,योग्य हवा,निष्कपट निस्वार्थी हवा त्यात कोणाचीही निंदा नसावी.सुसंवाद चांगला असेल तर अपेक्ष्या,राग,
चीडचीड,हक्क बजावणे,संशय,
आपले तेच खर मानणे असे विकार जास्त उत्पन्न होत नाहीत.प्रत्येकाने नेहमीच सकारात्मक लोकांशीच संवाद साधून आपला आत्मविश्वास दिवसेंदिवस वृद्धिंगत केला पाहिजे समोर जशी परिस्थिती येईल तशी ती स्वीकारली तर आपल्याला सहज कोठेही व कोणाबरोबरही जुळवुन घेता येते त्याचा त्रास आपल्याला व समोरच्या व्यक्तीलाही होत नाही त्यामुळे आपण कायम समाधानी आयुष्य जगू शकतो.सगळ्यांशी असलेल्या वैयक्तिक चांगल्या संवादामुळे आपल्याला कायम आनंद मिळू शकतो कधी कधी आपल्या अहंकारामुळे आपण चांगल्या व्यक्तीशी संवाद टाळतो परंतु कधी मनात नैराश्य,चिंता,अपयश आले तर त्या योग्य व्यक्तीशी ठेवलेल्या संवादामुळे ते दूर होऊ शकते.
मानवी जीवनात विचार व भावना यांचा खूप जवळचा संबंध आहे विचारातूनच भावनेचा जन्म होतो किंबहुना प्रसंगानुसार त्या भावना कुठे व्यक्त ही केल्या जातात परंतु काही ज्या भावना व्यक्त होत नाहीत त्या भावनेचा मानवी मनातच कोंडमारा होतो मग त्याच भावना आपल्या मानसिक व शारीरिक आजारांचे कारण ठरतात म्हणूनच निरोगी राहण्यासाठी त्या भावना कुठेतरी कोणाकडे तरी व्यक्त करणे आवश्यक असते म्हणूनच त्या दबलेल्या भावना संवाद रूपाने व्यक्त करताना कोणताही कमीपणा वाटून घेऊ नका.आपल्या भावना,विचार,
मते,कल्पना यांच्या अभिव्यक्तीसाठी संवाद हे अतिशय महत्वाचे माध्यम आहे संवादातून मिळालेला एखादा चांगला विचार एखाद्याच्या जीवनात चांगले परिवर्तन घडवून आणू शकतो,उत्तम संवादातून आपल्या बाजूने नसणारा एखादा प्रतिसाद आपल्या बाजूला वळवला जाऊ शकतो परंतु चांगला संवाद साधण्यासाठी नम्रता,शांत,संतुलित, आत्मविश्वास व एकाग्रता या गुणांची नितांत आवश्यकता असते.मधुर प्रेमाने केलेल्या संवादात जग जिंकण्याची ताकत असते .सगळ्यांनाच आपली आस्थेने प्रेमाने चौकशी करणारा हसतमुख माणूसच हवा असतो फक्त तो स्वार्थी व गरजेपुरते नातं ठेवणारा नसावा.
सुसंवादाने नाती जवळ येतात तर वाद केल्याने माणसें भावनिक दुखावले जातात,काही ठिकाणी वाद टाळणे जरी अशक्य असले तरी सुसंवाद साधून जीवनाची गोडी वाढविणे शक्य आहे.सुसंवाद साधून मिळणारा आनंद तुम्हला कायम समाधानच देऊन जातो कारण एकटेपणा तुम्हाला कधीच आनंद देऊ शकत नाही दुसर्यांना दुःख देणारा त्याला फसवणारा मनुष्य कायम स्वतः आतून प्रचंड दुःखी असतो.
जीवनात तुम्ही कसे दिसता तुमच्याकडे कुठले पद, प्रतिष्ठा,सत्ता आहे याला समाजाच्या लेखी काही महत्व नाही तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सर्वच थरातील लोकांशी कसा संवाद साधता यावरूनच समाज तुमची किंमत ठरवत असतो.सुसंवादाच्या जादूने क्षणात परकी माणसं आपली होतात.
बाहेरच्या जगाशी जसा आपला चांगला संवाद आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपला स्वतःचा स्वतःशीच आंतरिक संवाद ही खूप महत्त्वाचा असतो कारण आपला मनाशीच संवाद जर अस्थिर असेल तर त्याचा त्रास स्वतःबरोबर इतरांनाही होतो तुमचा स्वतःशी स्वसंवाद कसा आहे यावरच तुमचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य अवलंबून असते.आयुष्यातील खूप कठीण प्रसंग व प्रश्नांची उत्तरे आपल्याला स्वसंवादातूनच मिळतात स्वसंवादामुळे आत्मज्ञान व आत्मपरीक्षण ही होते,आपल्यातील गुण व दोष लक्षात येतात.
आजच्या तरुण वर्गाचा स्वतःच्या मनाशी व इतरांशी योग्य सुसंवाद नसल्यामुळेच त्यांच्या मनात चाललेले द्वंद्व व चुकीच्या विचाराचा निचरा होत नाही त्यामुळेच त्यांना विविध मानसिक शारीरिक व्याधींना कमी वयात सामोरे जावे लागते.जीवनातील अंतिम सत्य लक्षात येण्यासाठी प्रत्येकाला स्वतःच्या मनाशी सकारात्मक स्वसंवाद साधता यायलाच हवा,
सुसंवाद साधने ही एक प्रकारची कला आहे त्याच संवाद कलेने इतरांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य व स्वतःच्या मनाचे आत्मिक समाधान मात्र साधलं गेलं पाहिजे.....
stay connected