पिवळ्या, केशरी रंगाची शिधापत्रिका कालबाह्य होणार
नागरिकांनी घरबसल्या ई-शिधापत्रिका काढून घ्यावी - जे.डी.शाह
कडा (प्रतिनिधी) -राज्यातील नागरिकांना देण्यात आलेल्या पिवळ्या व केशरी रंगाच्या शिधापत्रिका रद्द होणार आहे. तसेच सदर रंगाच्या शिधापत्रिकांचा यापुढे कोणत्याही शासकीय-निमशासकीय कामासाठी कोणताही उपयोग होणार नाही. सध्या बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात कार्यालयाने डिजिटल रेशनकार्ड ( ई-शिधापत्रिका) देणे सुरू केले आहे. जुने व नवीन तसेच नवीन नाव समाविष्ट करणे, नावात दुरुस्ती नाव करणे, नाव कमी करून बाहेर गावी स्थलांतरित करणे इत्यादी कामांसाठी तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना ई-शिधापत्रिक- रेशनकार्ड ऑनलाइन डिजिटल कार्ड मिळणार आहे .यापुढे आता नागरिक घरबसल्या रेशनकार्ड काढता येणार आहे. यासह सेतू केंद्र, सीएससी केंद्रात जाऊन ऑनलाइन अर्ज केल्यावर ई-शिधापत्रिका रेशनकार्ड त्यांना मिळेल. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तात्काळ आपल्या घरातील मुलांच्या व थोरामोठ्यांच्या मोबाईल वरून ई-शिधापत्रिका काढून घ्यावेत. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जे.डी.शाह यांनी प्रसिध्दीपत्रकातुन केले आहे.
*दलालांना चाप बसणार*
तहसील कार्यालयात ई-शिधापत्रिका रेशनकार्ड काढून देण्यासाठी अनेक दलाल कार्यरत आहेत. ते लाभार्थ्यांकडून रेशनकार्ड काढून देण्यासाठी सुमारे तीन ते पाच हजार रुपये उकळतात. दलालांबाबत अनेकांनी तक्रारी केल्यावर राज्य सरकारने ऑनलाइन डिजिटल ई-शिधापत्रिका, रेशनकार्ड देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे दलालांना आता चाप बसणार असून, शासकीय शुल्कातच सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळेल. बीड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात डिजिटल रेशनकार्ड देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत बऱ्याच लाभार्थ्यांना ऑनलाइन रेशनकार्ड देण्यात आले आहे. आता नागरिक स्वत: ऑनलाइन रेशनकार्ड काढू शकतात. त्यासाठी दलालांकडे जाण्याची गरज नाही. तरी जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांनी स्वतः पुढाकार घेवून महाराष्ट्र शासनाच्या https:/rcms.mahafood.gov.in/ या लॉगिन वरुन ई-शिधापत्रिका रेशनकार्ड काढून घ्यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जे.डी.शाह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन केले आहे.
stay connected