GONDIA | शेअर मार्केटच्या नावाखाली करोडची फसवणूक; दोन भावानी पाच लोकांना फसवल्याची तक्रार आमगाव पोलीस स्टेशनला दाखल
- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरात शेअर मार्केटच्या नावावर 3.20 कोटीने फसवणूक करणाऱ्या दोन भावंडांवर आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोन भावंडांनी पाच जणांची फसवणूक केली आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याकाठी 7 ते 8 टक्के परतावा देण्याचे आमिष देत त्यांनी लोकांना लुटले. सुरुवातीला पाच लोकांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली असली तरी फसवणूक होणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आमगाव शहरातील बनिया मोहल्लातील किसन चंपालाल पांडे (21) व कन्हयालाल चंपालाल पांडे (24) या आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लोकांना 7 ते 8 टक्केप्रमाणे प्रतिमहिना परतावा (रिटर्न) देण्याचे आमिष दाखवून बनगाव येथील चलचूराज व्यंकटरंगप्पा कमैय्या (58) यांच्याकडून 3 कोटी 19 लाख 75 हजार रुपये घेऊन त्या पैशांचा अपहार केला आहे.
आरोपी भावंडांनी कमैय्या यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीकरिता पैसे दिले तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला 7 टक्के दराने व्याज देऊ, असे आमिष दाखवले. सुरुवातीला कमैय्या तयार झाले नाहीत. परंतु सर्वांनी त्यांना पैसे देण्यास म्हटल्याने त्यांनी जमीन विक्रीचे पैसे दिले. सन 2023 ला दिलेल्या पैशांची गरज असल्याने कमैय्या यांनी किसन पांडे याच्याकडे पैसे परत करण्याबाबत विचारणा केली. परंतु तो नेहमी काही ना काही कारणे सांगून टाळाटाळ करू लागला. 3 कोटी 19 लाख 75 हजाराने फसवणूक करणाऱ्या दोन्ही भावंडांवर आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम 420, 418, 403, 406, 120 ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.यात आणखी फसवणूक झाल्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे आणि फसवणुकीच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
stay connected