खाजगी सावकारकी मुळे शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ, पोलीसांनी खाजगी सावकारांचा बंदोबस्त करावा :- माजी आमदार भीमराव धोंडे
आष्टी ( वार्ताहर ) :- आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये खाजगी सावकारांच्या कर्जाला व त्यांच्या त्रासाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, अशा सावकारांची पोलिसांनी चौकशी करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी आ. भीमराव धोंडे यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, आष्टी पाटोदा शिरूर हा दुष्काळी परिसर आहे या भागात चांगला पाऊस पडत नाही. थोड्याफार पडलेल्या पावसावर शेतकरी उसणवारी करुन पेरणी करतात. पावसाने दडी मारली की, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहते. शेवटी गरज म्हणून शेतकरी खाजगी सावकारांच्या दारात जातात परंतु याचा सावकारांकडून गैरफायदा घेतला जातो परिणामी शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातो. अनेकजण पोटासाठी स्थलांतर करतात तसेच ऊसतोडणी साठी जातात. आष्टी, पाटोदा, शिरूर, कडा व इतर गावांमध्ये अनेकजण खाजगी सावकारकीचा धंदा करीत आहेत. गोरगरिबांना तीन ते दहा रुपयांपर्यंत टक्केवारीने पैसे देऊन व्याजापोटी अमाप पैसा उकळतात. टक्के वारी घेताना दिवसांगणीक व्याज आकारणी केली जाते. त्यामुळे गोरगरिब, शेतकरी, शेतमजूरां कडून जादा प्रमाणात व्याज घेतल्याने मेटाकुटीला येऊन शेवटी आत्महत्या करतात परिणामी त्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडते, खाजगी सावकारकी मुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण बीड जिल्ह्यात जास्त आहे. जो शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करतो त्यांच्याकडे बॅंके बरोबर खाजगी सावकारांचेही कर्ज असते. खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळूनही अनेक जणांनी कायमचे स्थलांतर केलेले आहे.याबाबत अनेक पिडीत शेतकरी मला येऊन भेटतात व आपल्या समस्या सांगतात. पोलीसांनी तातडीने खाजगी सावकारांचा बंदोबस्त करावा अन्यथा, खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची तसेच अशा शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या सावकारांची यादी सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच लवकरच बीडच्या पोलीस अधीक्षकांना भेटून याबाबत निवेदन देणार असल्याचेही माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले.
stay connected