पावसामुळे नगर - बीड रस्त्यावरील पुल वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला

 पावसामुळे नगर - बीड रस्त्यावरील पुल वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला



कडा ( वार्ताहर):- आष्टी तालुक्यातील साबलखेड ते आष्टी या रस्त्याचे काम संथ गतीने चालू असल्यामुळे अखेर जे व्हायचे तेच घडले आणि  जोरदार पावसामुळे अहमदनगर बीड रस्त्यावरील कडा येथे बायपास करून तयार केलेला मातीचा पूल पहिल्याच पावसात  वाहून गेल्याने परिसरातील  पंधरा ते वीस गांवाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे‌. अगोदर पुलाचे काम केले असते तर ही वेळ आली नसती. 

      याबाबत अधिक माहिती अशी की आष्टी तालुक्यातील साबलखेड ते आष्टी या नगर बीड रस्त्याचे  सिमेंट रोडचे काम एक दीड वर्षापासून चालू आहे काम कासवतीने चालल्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात धुळीचा  भरपूर त्रास सहन करावा लागला.  जुन पासुन पाऊस सुरु झाला आहे. थोडा पाऊस झाला तरी चिडचिडीमुळे  नागरिक त्रस्त झाले आहेत.  कडा येथील पुलाचे काम एप्रिल मे महिन्यात सुरू करण्यात आले. मोठा पुल असल्यामुळे यापूर्वीच काम सुरू करणे अपेक्षित होते परंतु त्यांनी एप्रिल मे महिन्यात अगदी पावसाळ्याच्या तोंडावर  पुलाचे काम सुरू केले व बायपास म्हणून मातीचा पूल तयार करण्यात आला होता तो पहिल्याच पावसात वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली असून आता नागरिकांना थेट दादेगाव -धामणगाव तसेच वाकी मार्गे प्रवास करावा लागत आहे.  तसेच परिसरातील गावांचा कडा गावची  पूर्णपणे संपर्क तुटला आहे. कडा परिसरातील ग्रामस्थांना बीड, जामखेड आष्टी येथे जाण्यासाठी  धामणगाव मार्गे यावे लागत आहे  त्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी व्हावे अशी मागणी यापूर्वी  अनेक सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी केली होती तसेच पुल व रस्त्याचे काम तातडीने करावा अशी मागणी केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जोरदार पावसामुळे मौलाली बाबा दर्गा जवळ असणारे एका गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेले एका व्यापारीचे पाईप देखील नदीच्या पाण्यात पाहून गेले आहेत तसेच पुलाचे काम चालू असल्याने तेथील साहित्य देखील  दूरवर पाण्यात वाहून गेले. आता तरी व्यवस्थित नियोजन करुन पुलाचे रस्त्याचे काम तातडीने करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते डॉ.शिवाजीराव शेंगडे, माजी जि प सदस्य रवि पाटील, माजी पं.स. सदस्य गोरख कर्डीले, नितीन भालशंकर व इतरांनी केली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या हलक्या पावसाने शेतकऱ्यांनी उडीद, मूग, सोयाबीनची पेरणी केली होती त्यानंतर पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला होता. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर कडा परिसरात  सोमवारी सायंकाळी पावसाने सलग तीन तास जोरदार बॅटिंग केली असून त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तसेच तालुक्यातील हिवरा, सुलेमान देवळा, भोजेवाडी, पिंपरखेड परिसरात देखील सोमवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला त्यामुळे कांबळी नदीला चांगलाच पुर आला. प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील उडीद, मुग, कांदा, सोयाबीनची पिके काही ठिकाणी वाहुन गेली.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.