" भारतीय तरुणांसाठी कार्यकुशल नेतृत्वांची गरज "
----------------------------------------
आज भारत या देशाकडे जगातील सर्वात तरुणांचा देश म्हणून पाहिले जाते. भारताचे आजचे माणसी सरासरी वय वर्षे २८ इतके आहे देशातील एकूण लोकसंख्येच्या ७५ कोटी लोकांची गणना आज तरुण या वर्गात होतें म्हणूनच भारताची आज जागतिक ओळख एक तरुणांचा देश म्हणून होत आहे. भारताचे पुढील भविष्य या तरुणांच्या हातात असणार आहे भारताची अर्थव्यवस्था मजबूत बनवून देशाला महासत्ता बनवायचे का नाही हे याच तरुण पिढीच्या हातात असेल.
मग अशा वेळी देशातील राजकीय व्यवस्थेचे लक्ष या तरुणांकडेच असणे आवश्यक आहे परंतु देशातील आजची परिस्थिती पाहिली तर एकूण तरुणांच्या संख्येपैकी ४२ टक्के तरुण बेरोजगार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा रोजगार इथे मिळत नाही हीच बेरोजगार तरुणांची फळी देशाच्या अर्थव्यवस्थेपुढील मोठी समस्या आहे मग जर आपल्या मुलांच्या हाती कामच नसेल डोक्यात विचार नसतील तर ती कृती तरी काय करतील मग अशी भरकटणारी मुले उद्याचा उज्वल भारत देश घडवतील का? हा मोठा संशोधनाचा व चिंतनाचा विषय पुढे येत आहे. भारतीय मुलांकडे बुद्धिमत्ता, प्रतिभा, कष्ट करण्याची तयारी सर्व काही आहे तरी पण गेल्या दहा वर्षांमध्ये साडे सतरा लाख तरुणांनी कायमचा भारत देश सोडला आहे. त्या तरुणांनी भारत देश का सोडला असावा त्यांनी त्यांच्यातील ज्ञानसंपदेचा उपयोग स्वतःच्या देशासाठी का केला नसावा याचाही विचार होणं गरजेचं आहे त्यांना परदेशात मिळालेली संधी किंवा मिळत असलेल्या सुविधा भारतातच का दिल्या गेल्या नाहीत. खरंतर या मुलांनी इथेच राहून आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे अपेक्षित होते तरच भारत देश जागतिक महासत्ता होऊ शकला असता. आंतरराष्ट्रीय असलेल्या एप्पल कंपनीत ३४ टक्के, मायक्रोसॉफ्ट मध्ये ३० टक्के, आयबीएन मध्ये २८ टक्के, इंटल कंपनी मध्ये १७ टक्के तर अमेरिकेतील जागतिक अंतराळ संशोधन केंद्र म्हणजेच नासा येथे ३६ टक्के भारतीय मुलं आज यशस्वीरित्या काम करीत आहे या भारतीय तरुण तरुणींचा बोलबाला सर्व जगात आहे.
मग प्रश्न हा आहे की या तरुणांना ही संधी भारतीय कंपन्यात का मिळू शकली नाही? त्यांना ही संधी मिळवून देण्यात इथले स्वातंत्र्यानंतरचे ७५ वर्षापासूनचे राजकीय नेतृत्व कमी पडले आहे का? आजही देशात बेरोजगार तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामुळेच देशातील तरुण पिढी आज नैराश्यात भरकटत चालली आहे विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी ते चालले आहेत , बेकार असल्यामुळे त्यांचे लग्नही होत नाहीत,नैतिक मूल्य ,कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी यांच्यापासून ते आज दूर जात आहेत. राजकारणी लोक त्यांच्या स्वार्थासाठी या तरुणांचा वापर मोठ्या खुबीने करून घेत आहेत जाती-धर्माचे या तरुणांच्या मनात विष कालवून समाजामध्ये भांडण लावून आपले सत्तेचे राजकीय गणित या तरुणांच्या माध्यमातून जुळवून घेत आहेत. क्रिकेट सारख्या रिकामटेकड्या खेळात आपला वेळ वाया घालून आजची तरुण पिढी नेमकं काय साध्य करणार आहे कोटीन पैसे कमवणारे क्रिकेट प्लेअर या तरुणांसाठी नेमका काय अजेंडा देणार आहेत कालच मुंबई येथे भारतीय विजयी संघाच्या स्वागतासाठी जमलेली लाखो तरुणांची गर्दी भारत देशाचे नेमकं कुठलं भल करणार आहे कुठल्याही खेळाला एक खेळ म्हणूनच पाहिलं गेलं पाहिजे त्याला देशाच्या अस्मितेशी जोडणं संयुक्तिक नाही.
आज भारतातील भरकटत चाललेल्या या तरुणाईला कार्य कुशल नेतृत्वांची गरज आहे जे नेतृत्व त्यांना योग्य मार्गदर्शन करेल त्यांना योग्य ती रोजगाराची संधी इथेच उपलब्ध करून देईल. मग असं नेतृत्व योग्य व्यक्तीच्या वा समूहाच्या हाती असणे आवश्यक आहे असं नेतृत्व सत्तेत बसवण्याची जबाबदारी या तरुणांची व सर्व समाजाची आहे ज्या राजकीय नेतृत्वाच्या हातात आपण देशाची सत्ता देणार आहोत त्यांचा नेमका पुढील अजेंडा काय आहे ज्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवत आहोत ज्यांच्या मागे आपण जात आहोत त्या नेतृत्वाच्या वैयक्तिक व्यक्तिमत्त्वाच्या पैलू बरोबरच त्यांचे राजकीय अंतस्थ हेतू काय आहेत हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. देशाचे राजकीय नेतृत्व समाजाभिमुख व सर्व जात ,धर्म ,पंथ ,वंश , प्रदेश या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारं असाव, राजकीय नेतृत्वाने राजधर्माच्या नैतिक मूल्यांच्या तत्त्वांचे नेहमीच पालन केले पाहिजे हेच आपल्या भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत आहे.
पण दुर्दैवाने भारतातील आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर नैतिकतेला पायदळी तुडवून, राज्यघटनेचा आपल्या सोयीने अर्थ लावून कुठल्याही प्रकारे सत्ता मिळवणे हे एकच ध्येय नेतृत्वांचे दिसत आहे. एकेकाळी सत्य हाच देव आहे असं म्हणणार महात्मा गांधी यांच नेतृत्व जगाला लाभलं तर एकच खोटी गोष्ट वारंवार बोलत जा म्हणजे नंतर ते खरं वाटायला लागतं असं सांगणारा गोबेल्स याचही नेतृत्व जगानं पाहिलं, जर्मनीचा नेतृत्व करणारे हिटलर असं म्हणतो की खोटं बोलतानाच इतके जोरात खोटं बोला की खरं बोलायला कोणी धजावला गेला नाही पाहिजे.
मग नेमकं भारताच्या आजच्या नेतृत्वाची वाटचाल वरील पैकी कोणत्या मार्गाने होत आहे याचा गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. कुठल्याही राजकीय नेतृत्वाने स्वतःलाच श्रेष्ठ समजण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका घेण आवश्यक आहे. लोक कल्याणकारी राज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला मार्ग आजच्या राजकीय नेतृत्वांनी अंगीकारला पाहिजे. गोरगरीब, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारे नेतृत्व आज तरुणांमधुन निर्माण झालं पाहिजे किंबहुना अशा चांगल्या नेतृत्वाच्या मागे समाजाने ठाम उभे राहिले पाहिजे. कुठल्याही नेतृत्वामध्ये संवेदनशीलता हा गुण फार महत्त्वाचा आहे कारण संवेदनशील असलेले नेतृत्व स्वार्थाचा कधी विचार करत नाही, का तर संवेदनशील माणसाला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असते व ते दुःख दूर करण्यासाठी तो नेहमी प्रयत्न करतो. असं नेतृत्व त्यांना मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून चांगले निर्णय घेऊन समाजाच्या विकासाचे, भल्याचे धोरण ठरवून ते आपल्या कृतीतून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आत्ताच भारतातील सर्वात मोठा लोकशाही उत्सव म्हणजेच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, निवडून आलेल्या खासदार व मंत्रिमंडळाने शपथ घेतली भारतातील विविध भागातून निवडून आलेल्या खासदार आज देशाच्या कायद्याच्या सर्वोच्च सभागृहात बसले आहेत या सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे की भारतातील या नव तरुणांना आपल्या माध्यमातुन एक चांगलें नेतृत्व मिळावं जे की त्यांचे बेरोजगारी, शिक्षण व विविध प्रश्न सोडवतील.
आज भारतीय तरुणांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मार्गक्रम करताना कार्यकुशल नेतृत्वांची खरी गरज आहे त्या दृष्टीने आपण सर्व नवनिर्वाचित नेतृत्व प्रयत्न कराल हीच अपेक्षा...!!!
लेखक -
प्रा. महेश कुंडलिक चवरे,
आष्टी.
मो.९४२३४७१३२४
stay connected