मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना बेलगाव येथे होणार सर्वतोपरी मदत बेलगाव ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम.
आष्टी (प्रतिनिधी)
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यात अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु सर्वच सेतू केंद्रावर महिलांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे महिलांची हेळसांड होत आहे. अशी हेळसांड होऊ नये म्हणून आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील ग्रामपंचायत तर्फे गावातच अर्ज भरून घेतले जाणार आहेत. गावातील महिलांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय गावच्या ग्रामसभेत घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच तात्यासाहेब शिंदे हे होते.
गावातील रेणुका एकांस्ट्रक्शनचे मालक प्रवीण वारे यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत सदस्य तथा फोटोग्राफर ज्ञानेश्वर पोकळे हे मोफत फोटो काढून देणार आहेत. तर सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आष्टी या बँकेचे मिनी बँक चालक ज्ञानेश्वर भोसले हे बँक खाते उघडण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत. याशिवाय अर्ज ऑनलाईन करणे या कामी सुद्धा ज्ञानेश्वर भोसले हे सहकार्य करणार आहेत.
शासनाच्या सुधारित नियमाप्रमाणे बऱ्याच अटीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. उत्पन्न प्रमाणपत्राऐवजी पिवळे किंवा केसरी राशन कार्ड स्वीकारले जाईल. जमिनीची अट सुद्धा शासनाने काढून टाकली आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक महिलेला या योजनेसाठी अर्ज करता येईल. तेव्हा गावातील 18 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते प्रवीण वारे यांनी केले आहे.
stay connected