मुलांचे दात आणि त्यांची घ्यावयाची काळजी .......................... लेखक.. डॉ. सय्यद हुमायुद्दीन,आष्टी
आपण सहज म्हणतो,हसतील त्यांचे दात दिसतील.पण हा ही विचार केला जावा की, हसण्यासाठी दात असलेच पाहिजेत असे नाही. लहान मुलं दात नसतील तरी छान हसतात.अर्थात त्या हसण्यानं त्यांच्या इतकाच आनंद आपल्यालाही मिळतो.मुलं लहानाचं मोठं होईपर्यंत त्यांच्या दात येण्याचा सिलसिला जेव्हा आपण पाहतो,तेव्हा हे लक्षात येतं की रोपट लावण्यापासून वृक्ष होण्यापर्यंतच्या कालखंडासारखाच या दंतकथे कडे आपण पाहू शकतो.असं म्हटलं जातं की,दुधाचे दातही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.त्याची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे.सहाव्या आठवड्यात गर्भात दंतपेशींची सुरुवात होते. सहाव्या महिन्यात दुधाचा पहिला दात येतो. सहाव्या वर्षी पाहिला कायमचा दात अर्थात दाढ येते.साधारण बारा वर्षे पर्यंत दुधाचे दात पडून त्या जागेवर कायमचे दात येतात आणि शेवटचा कायम दात अर्थात दाढ येते.येणारच असेल तर वयाच्या 18 व्या वर्षी तिसरी दाढ अर्थात अक्कल दाढ येते.हे सर्व झाल्यानंतर योग्य ती काळजी घेतली नाही तर आत किडायला सुरुवात होते.दात हा मानवी सौंदर्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा पैलू असल्याने आपल्या मुला मुलींच्या अगदी दुधाच्या दातापासूनच आई वडील काहीसे चिंतीत असतात.आपल्या लेकराचे दात कसे दिसतील याचीही त्यांना काळजी वाटते.जवळच्या नात्यातील कुणाचे दात वेडे वाकडे असतील तर,तसे तर येणार नाहीत ना?अशी मनात उगीचच पाल चुकचुकते.पण ते फार काही महत्त्वाचे नाही.बाळाच्या हिरड्या टनक व्हायला लागल्या म्हणजे साधारणतः सहाव्या महिन्यापासून दीड वर्षापर्यंत कधीही दात येऊ लागतात.तेव्हा पासून मुलांच्या दाता विषयीची काळजी पालकांच्या मनात दाटलेली असते.मुला मुलींना दुधाचे दात येण्याचं वय,दात येण्याचा क्रम, दातांची बळकटी,दातांचा रंग,त्यांचा सरळ वाकडेपणा,टनकपणा इत्यादी सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळ्या असतात.दात येताना दुखतो.ताप येतो,जुलाब होतात.असं मानलं जातं त्यामुळे दात येत असताना जेव्हा जुलाब होतात तेव्हा काही पालक त्याकडे दुर्लक्ष करतात.जुलाबावर इलाज करणे टाळतात. मुलाला दात येताहेत म्हणून जुलाबावर उपचार करायचे नाहीत,हे चूक आहे.अगदी अपवादात्मकरीत्या एखाद्या बाळाला जन्मताच दात असतात.या दातांबद्दल खूप समज गैरसमज आढळतात.अशा दातांमुळे पालकांनी घाबरून जाण्यासारखं काही नसतं.प्रसंगी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.माणूस सोडून इतर कोणताही दात असलेला प्राणी साखर खात नाही.त्यामुळे त्यांचे दात किडतही नाहीत. त्याकरिता गोड खाण्यावर नियंत्रण मिळवणे आणि खाल्ल्यावर दात स्वच्छ करणे गरजेचे ठरते.दात किडू द्यायचे नसतील तर काही सवयी पासून बाळाला दूर ठेवायला हवे.बाळाला दूध पाजत निजू देणे,तोंडात बाटली ठेवून बाळाला झोपवणे इत्यादी.तसेच अंगठा किंवा बोट किंवा चोखणी चोखल्याने समोरचे दात पुढे येण्याची शक्यता वाटते.हे आपण सहज टाळू शकतो. मुलं पुष्कळदा तोंडावर पडतात आणि दातांना इजा होते.यात दात वाकडा होणं,हिरडीत घुसणं, दात पडणं,मोडून तुकडा पडणं इत्यादी गोष्टी घडतात.अशावेळी घरगुती उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा. काहींचे दात सरळ असतात तर काहींचे वेडे वाकडे.वेडे वाकडे का येतात? याविषयी गैरसमज आढळतात.खरं तर सर्व मोठ्या माणसांनी हे समजून घ्यायला हवे की,त्यांना नवीन येणारे दात आकाराने मोठे असल्याने जागा जास्त लागते.ही जागा दुधाच्या दातात फटी पडून तयार होत असते.तशी जागा जर जबड्याच्या हाडाची वाढ नीट झाली नाही तर नव्या दातांना मिळत नाही.परिणामी दात वेडेवाकडे येऊ लागतात.कायमच्या दातांपैकी एखादा दात पडला असल्यास लगेचच स्वच्छ डबीत घालून तासाभरात डॉक्टरांकडे न्यावा.तो लगेचच परत बसवता येण्याची अनेकदा शक्यता असते.दातांच्या सौंदर्याबाबतही अजून म्हणावी तितकी जागरूकता झालेली नाही.खरंतर वेळेवर केलेला उपाय,ट्रीटमेंट मुळे चेहऱ्याचे सौंदर्य तर वाढतेच,दातांचं आरोग्यही सुधारते.कलयुगात शास्त्रशुद्ध विचाराने दातांच्या आरोग्याकडे पाहायला शिकलं पाहिजे.आता दातांच्या समस्यांवर अनेक उपचार केले जातात. दातांची कीड यंत्राने साफ करून टाकतात. त्यात सिमेंट किंवा चांदी भरतात.गरज असेल तर रूट कॅनल करण्याचा पर्याय सुचवतात.त्यामुळे मोत्यासारखे आपले दात कीड मुक्त होतात,वेदना मुक्त होतात आणि इतर दातांप्रमाणे मजबूत होऊन ते अन्न चावायला मदत करू शकतात.
लेखक.. डॉ.सय्यद हुमायुद्दीन,आष्टी
stay connected