जावयाकडून दिव्यांग सासऱ्यासह मुलीला मारहाण
अंभोरा येथे पोलिस ठाण्यात जाऊन आमच्यावर केसेस करतोस याचा राग मनात धरून दिव्यांग सासऱ्यासह मुलीला जावयाने मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील दिव्यांग बाळू त्रिंबक पवार हे रविवारी मुलगा व मुलीसह घरी बसले होते. याच दरम्यान पोलिस ठाण्यात आमच्यावर लई केसेस करतोय या कारणावरून जावई दीपक कवळे याने दिव्यांग असलेल्या बाळू पवार यांना लाकडी काठीने मारहाण केली. मुलगी वडिलांना वाचविण्यासाठी मध्ये आली असता तिला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दिव्यांगाच्या स्कूटरवर दुचाकी घालून नुकसान केले. या प्रकरणी बाळू त्रिंबक पवार यांच्या फिर्यादीवरून दीपक कवळे याच्यावर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
stay connected