हिवरा, देवळा परिसरात ढगफुटी, कांबळी नदीला पूर
पिके उद्धवस्त, पूल, रस्ते उखडले
कडा : आष्टी तालुक्यातील हिवरा, सुलेमान देवळा, भोजेवाडी,
पिंपरखेड परिसरात सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे या परिसरातील पिके उद्धवस्त झाली आहेत. तर कांबळी नदीला पूर आल्याने हिवरा-दादेगाव, धानोरा-देवळा रस्त्यावरील पूल खचले आहेत. तर रस्ते उखडून गेले आहेत. दरम्यान, पिंपरखेड येथील एक मोटारसायकलस्वार वाहून गेला होता, परंतु तो बचावला आहे.
सोमवारी सायंकाळी 5.30 ते रात्री 8 वाजेदरम्यान हिवरा, देवळा, अंभोरा, पिंपरखेड, भोजेवाडी या गावात ढगफुटी झाली. या पावसाने खरीप हंगामातील बाजरी, कांदा, मूग, उडीद, सोयाबीन पिके अनेक ठिकाणी वाहून गेली आहेत. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. या पावसाने कांबळी नदीला पूर आला होता. यामुळे हिवरा-दादेगाव, धानोरा-सुलेमान देवळा, भोजेवाडीकडे जाणारी वाहतूक रात्री ठप्प झाली होती.
दरम्यान, धानोरा- हिवरा रोडवर कांबळी नदीच्या पुलावर पिंपरखेड येथील बाळू चांगण नावाची व्यक्ती मोटारसायकलसह वाहून गेली होती. परंतु यात ती व्यक्ती बचावली आहे. तरी या परिसरातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी सरपंच बाबासाहेब गोफणे, युवक नेते अमोल लगड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
---
रस्ते, पूल उखडले
कांबळी नदीवरील हिवरा-दादेगाव रोडवरील पुलाला भगदाड पडले आहे. सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हिवरा- दादेगाव रोडचे काम झाले होते. अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदारांनी रस्त्याचे काम निकृष्ट केले होते. याबाबत ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार केली होती. परंतु अधिकाऱ्यानी याकडे दुर्लक्ष केले.
....
हिवरा-दादेगाव रस्ता, पूल उखडला आहे. गावातील सिमेंट रस्ता वाहून गेला आहे. तरी या रस्त्याच्या कामाची चौकशी करून पुलासह रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल.
-सोमनाथ लगड, उपसरपंच, हिवरा.
.....
stay connected