KALYAN | कल्याणमधील पूर्वेतील शंभर फूटी रस्ता चौकातील तरुणाच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक
- कल्याण पूर्वेतील शंभर फूटी रस्त्याच्या चौकात १ जुलै रोजी संदीप राठोड यांची पाच जणांनी धारदार हत्याराने वार करत हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. ही हत्या पूर्वी झालेल्या वादातून झाली असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांनी दिली आहे. संदीप राठोड हा द्वारलीपाडा येथे राहत होता. तो १ जुलै रोजी सायंकाळी त्याचा मित्र प्रेम चव्हाण याच्यासोबत दुचाकीवरुन घरी जाण्यास निघाला होता. शंभर फुटी रस्त्यावरील एका वाईन शॉप मधून संदीप यांनी बियर खरेदी केली, मित्रासोबत घरी जाण्यासाठी बाईकच्या दिशेने दोघे आले असता त्याच चौकात पाच जणांनी संजय याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ला करुन आरोपी पसार झाले होते. मात्र संदीप राठोडचा मृत्यू झाला. या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिनकर पगारे, पोलीस कर्मचारी सुशील हंडे, नरेश दळवी, सुरेश जाधव, सचिन कदम आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथक आरोपींच्या शोधात होते. कोळसेवाडी पोलिसांनी पेंद्या उर्फ अरविंद गाळपांडे यांच्यासह एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शैफ उर्फ साहिल शेख आणि विद्यासागर मूर्तील उर्फ अण्णा या दोघांना ताब्यात घेतले होते. आरोपीपैकी पेंद्या याचे संदीप सोबत काही महिन्यापूर्वी भांडण झाले होते. या प्रकरणी पेंद्या याने संदीप विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या भांडणाचा राग पेंद्याच्या मनात होता. संदीपचा वचपा काढण्यासाठी पेंद्याने अन्य तीन साथीदारांना घेऊन संदीप शंभरफूटी चौकात गाठले. त्याच्यावर चाकूने हल्ला करुन त्याची हत्या केली आहे. अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात यापूर्वी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या हत्या प्रकरणातील अन्य एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
stay connected