चंद्रपूर मधील जांब (बुज) येथील अंगुलिमाल उराडे यांचा पुण्यात सन्मान

 चंद्रपूर मधील जांब (बुज) येथील अंगुलिमाल उराडे यांचा पुण्यात सन्मान




संस्थापक सागर भाऊ वाघमारे, अध्यक्षा पिंकीताई सागर भाऊ वाघमारे यांच्या युवा प्रबोधन साहित्य मंच पुणे महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या वतीने पुणे जिल्हा येथील सौ. पुष्पावती दशरथ बहुले सभागृह, नाना - नानी पार्क तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण व कवी संमेलन रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या सोहळ्यामध्ये चंद्रपुर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील जांब (बुज) या खेडेगावात वास्तव्याला असलेले लेखक, कवी, सर्पमित्र तथा सामाजिक कार्यकर्ते अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांना "युवा महाराष्ट्र आदर्श समाज भूषण पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.डॉ.अमरजी चौरे, स्वागताध्यक्ष श्री.संजय कुलकर्णी, प्रमुख मार्गदर्शक मा.देवीलाल रौराळे अमरावती, मा.नितीन सुर्यवंशी, मा.हरेशभाई देखणे (डायरेक्टर), व्याख्याते प्रा.संपत गारगोटे, मा.आरोही हिवरकर अभिनेत्री, मा.रेखा गायकवाड अभिनेत्री, श्री.क्रांतीनाना मळेगांवकर (फेम न्यू होम मिनिस्टर), हेमंत थोरात (सिने निर्माता), निलेश चौधरी (युवा उद्योजक) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम थाटात पार पडला.

            लेखक कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे हे अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आले.  शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा देत असत. आसाम रायफलचा इंटरव्यू लेटर पोस्टाने आला आणि तो इंटरव्यू लेटर अंगुलिमाल उराडे यांच्या वडिलांच्या हातात मिळाला. तेव्हा त्यांच्या जन्मदात्या वडिलांनी भांडण घालून अंगुलिमाल यांचा नोकरीचा इंटरव्यू लेटर जाळून टाकला आणि अंगुलिमाल उराडे यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यात आले. वडिलांनी सन २०११ मध्ये आई , ताई आणि अंगुलिमाल यांना घराबाहेर हाकलून दिले. अगदी तेव्हापासूनच आई मायाबाई उराडे ह्या दोन मुलीं व अंगुलिमाल यांना सोबतीला घेऊन सावली तालुक्यातील जांब (बुज) या गावी म्हणजे आपल्या माहेरी येऊन वास्तव्य करू लागल्या आणि आपल्या  लेकरांचा योग्य पद्धतीने सांभाळ केला. लेकरांना कशाची कमतरता भासू दिली नाही. अंगुलिमाल उराडे हे जीवनात न खचता, न डगमगता झाले गेले सर्व विसरून आई आणि ताई यांच्या सोबतीने आनंदाने जीवन जगू लागले. कॉलेज करता करता अंगुलिमाल यांच्या मनात साहित्याची गोडी निर्माण झाली‌. आणि ते साहित्य क्षेत्रात उतरले. कवी अंगुलिमाल उराडे यांनी सन  २०१५ मध्ये आपल्याच जन्मदात्या वडिलांच्या सत्य घटनेवर आधारित "विषारी साप" नावाची एक कविता लिहून वर्तमानपत्रात प्रकाशित केली आणि या "विषारी साप" नावाच्या कवितेने कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांची महाराष्ट्रामध्ये एक विद्रोही कवी म्हणून ओळख निर्माण करून दिली. तेव्हापासूनच त्यांच्या साहित्य लिखाणाला चालना मिळाली. आपल्या नावासमोर जन्मदात्या आईचे नाव लावल्यामुळे अनेकांकडून कवी अंगुलिमाल उराडे यांचे मोठ्या प्रमाणात कौतुकही करण्यात आले. ते साहित्य क्षेत्रामध्ये कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे  या नावाने परिचित आहेत. ते कविता, लेख, चारोळी लिहितात. तसेच दरवर्षी उन्हाळ्यात झाडाझाडावरती जलपात्र लटकवून पक्षी वाचवा अभियान राबवतात. सर्पमित्र म्हणूनही काम करतात. ऑगस्ट महिन्यात नाग (कोब्रा) सापाला जीवदान देत असताना त्यांना त्या नाग सापाने दंश केला. तेव्हा अंगुलिमाल मायाबाई उराडे हे १० दिवस गडचिरोलीतील दवाखान्यात मृत्यशी झुंज देत राहिले. अखेर १० दिवसांनंतर त्यांचा जीव वाचला. तसेच गोरगरिबांना मोफत रक्त मिळवून देण्यासाठी कायम धडपड करत असतात. शाळेतील गरीब मुलामुलींना बुक पेन भेट देत असतात. अंगुलिमाल उराडे हे स्वतः गरिबीत जीवन घालवितांना देखील वेळोवेळी अनेकांच्या मदतीला धावून जाने हे त्यांचे नित्याचे काम आहे. त्यांच्या याच कामामुळे त्यांच्यामध्ये असलेली समाजसेवेची धडपड कायम दिसून येते. अनेक कवी संमेलनामध्ये त्यांनी आपल्या स्वरचित कवितांच्या माध्यमातून ज्वलंत विषयांना हाताळून वाचा फोडलेली आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय योगदानामुळे अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी साहित्यिक अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांना आतापर्यंत काव्य गौरव, काव्य रत्न, अहिल्याबाई होळकर जीवनगौरव, समाजसेवा, उत्कृष्ट साहित्य, समाज रत्न, महात्मा ज्योतिराव फुले, साहित्य गौरव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न, द बेस्ट स्टोरी रायटर, साहित्य भूषण, स्वामी विवेकानंद लेखनी गौरव, युवा भूषण, अण्णाभाऊ साठे कलावंत पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे.

         कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांना "युवा महाराष्ट्र आदर्श समाज भूषण पुरस्कार" रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे मिळाल्याचे समजताच जिवलग मित्र व गावातील नागरिकांनी अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांचे भरभरून कौतुक करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.