*तात्पुरता फायदा की दीर्घकालीन हित?*
अमर हबीब
पिंजऱ्यात पक्षी आहेत. पिंजर्याचे दार बंद. मालक पक्ष्यांना बाजरीचे दाणे टाकायचा, बाजरी खाऊन पक्षी कंटाळले, अनेक पक्षी आजारी पडले. त्यांनी संघटना बांधली. घोषणा दिल्या. शेवटी मालकाने विचारले 'तुम्हाला काय हवय?' पक्ष्यांचा पुढारी म्हणाला, 'आम्हाला बाजरी नको, ज्वारी पाहिजे,' मालकाने लगेच मान्य केले. पक्ष्यांनी पुढाऱ्याचा जयजय केला.
काही दिवसांनी नवा पुढारी आला, तो म्हणाला, 'ज्वारी नव्हे आम्हाला गहू हवे.' त्याचेही आंदोलन झाले. मालकाला मान्य करणे भाग पाडले. पुढे कोणी तांदूळ मागितले कोणी डाळींबाचे दाणे.
या सगळ्या गदारोळात एक पक्षी शांतपणे निरीक्षण करीत होता. त्याने एके दिवशी सर्व पक्ष्यांना बोलावले व त्यांना विचारले, 'बाबांनो, मालकाची चालाखी तुमच्या लक्षात आली का?' पक्षी म्हणाले, 'मालक चांगला आहे, आपण आंदोलन केले की तो धान्य बदलून देतो, आपण त्याला दीड पट दाणे मागितले तर त्यालाही हो म्हणाला. अजून काय पाहिजे.' तो शांत पक्षी म्हणाला, 'मित्रानो, आपला निसर्गधर्म आकाशात उडण्याचा आहे. जंगलात झाडांवर बागडण्याचा आहे. याने आपल्याला या पिंजऱ्यात कोंडून ठेवलय, ग्राहक आला की, आपल्यापैकी एकाला पकडून तो ग्राहकाला विकतो, ग्राहक आपल्याला कापून खातो, आपल्याला निसर्गधर्मा नुसार जगायचे असेल तर ते दार उघडले पाहिजे.' एवढे बोलून तो पुन्हा शांत झाला.
पक्ष्यांची कुजबुज सुरू झाली. बाजरी, जवारी, गहू, तांदूळ, डाळिंब मागणारे #फायद्याचे बघत होते. तो शांत पक्षी #स्वातंत्र्याचे बोलत होता. फायदा तात्कालिक होता, त्यातून गुलामीचे आयुष्य जगणे भाग पडत होते. स्वातंत्र्यात खरे आयुष्य जगता येत होते.
तुम्ही सरकारला जे मागता, ते द्यायला सरकार काचकूच करुन का होईना देईल पण स्वातंत्र्याचे काय? तुमच्या पायात बेड्या, हात बांधलेले अन समोर पंचपक्वानांचे ताट ठेवले तर त्याचा काय उपयोग?
किसानपुत्र आंदोलन एकच मागते ते म्हणजे शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, सीलिंग, आवश्यक वस्तू व जमीन अधिग्रहण या कायद्यांनी शेतकऱयांना गळफास लावला आहे. हे कायदे रद्द झाले की, शेतकरी काय व कसे मिळवतो ही सांगायची गोष्ट नाही.
किसानपुत्रानी ठरवायचे आहे की, पिंजऱ्यात राहून काही फायदे मिळवायचे आहेत की, पिंजऱ्याच्या दाराला धडक मारायची?
● अमर हबीब, आंबाजोगाई
किसानपुत्र आंदोलन,
8411909909
#किसानआंदोलन #kisanputraandolan
#antifarmerlaws #शेतकरीविरोधीकायदे
(पटले तरच शेअर करावे)
stay connected