विद्यार्थ्यांनी अभ्यास, करिअर, आणि इतर गोष्टींमध्ये समतोल राखावा – डॉ. महेश नाथ
आष्टी (प्रतिनिधी) – सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी भास्कर अकॅडमी फॉर सायन्स अँड इंजीनियरिंग संचलित अविष्कार लर्निंग सेंटर आणि राख करिअर सेंटरच्या वतीने बारावी बॅचचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. महेश नाथ, डॉ. नाथ डेंटल क्लिनिक, कडा यांची उपस्थिती होती, तर उद्घाटन प्राचार्य पंकज शिंदे, शिंदे कॉलेज, जामखेड यांनी केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये सीमा गुट्टे मॅडम (सचिव, महाराष्ट्र बळीराजा अधिकार परिषद, पुणे), अॅड. प्रतीक्षा डावकर (दिवाणी व फौजदारी न्यायालय, आष्टी) आणि प्रा. अविनाश कुमार झा (फिजिक्स ट्यूटर, कोटा, राजस्थान) यांचा समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. महेश नाथ यांनी विद्यार्थ्यांना आपल्या करिअरमध्ये योग्य तो समतोल कसा साधावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी करिअरची निवड करताना कशा पद्धतीने विचार केला पाहिजे, तसेच अभ्यास किंवा काम करताना योग्य नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले.
सीमा गुट्टे मॅडम यांनी आजच्या काळात विद्यार्थ्यांचा वाढता मोबाईल वापर आणि त्यातून होणाऱ्या सवयींमुळे आरोग्यावर होणारे विपरित परिणाम स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून लांब राहून आपले करिअरवर अधिक फोकस कसा करावा, यावरही विचार मांडले. अॅड. प्रतीक्षा डावकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आजकाल घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांबाबत जागरूक करत, त्यापासून कसे दूर राहावे याविषयी मार्गदर्शन केले.
प्रा. अविनाश कुमार झा (फिजिक्स ट्यूटर, कोटा, राजस्थान) यांनी आयआयटी प्रवेशाच्या तयारीसाठी राजस्थानमधील कोटा शहर कसे महत्त्वपूर्ण ठिकाण आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ. मीरा शिवाजी राख मॅडम आणि सौ. माधुरी महेशकुमार तवले मॅडम यांनी केले होते. गणेश लॉन्स, डोईठाण रोड, आष्टी येथे या समारंभाचा भव्य आयोजन करण्यात आला होता.
stay connected