कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या स्मृत्यर्थ 'समाजक्रांती पुरस्कार' माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना जाहीर

 *कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या स्मृत्यर्थ 'समाजक्रांती पुरस्कार' माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना जाहीर*




सात्रळ-(वार्ताहर) सात्रळचे भूमिपुत्र, थोर स्वातंत्र्यसेनानी,कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या स्मृत्यर्थ समाजक्रांती पुरस्कार व मातोश्री शांताबाई  पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक वितरण समारंभ तसेच श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयाच्या नूतन इमारत भूमिपूजन समारंभ दि.१९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता सात्रळ येथे  संपन्न होत आहे. 

        यावर्षीचा थोर स्वातंत्र्यसेनानी, माजी आमदार कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या स्मृत्यर्थ  'समाजक्रांती पुरस्कार' पनवेल येथील माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण १९ जानेवारीला संपन्न होणार आहे. अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी दिली.

      कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावलेले रयत शिक्षण संस्थेंचे रोपटे वाढवून त्याचे वटवृक्षात रुपांतर करण्यासाठी सामान्य नागरिकांपासून अनेक दानशूर व्यक्तींचा सहभाग आहे.  प्रारंभीच्या काळापासूनच कर्मवीरांना अनेकांनी एक रुपयांपासून ते वसतिगृहातील मुलांच्या भोजनासाठी मूठ मूठ धान्य दिले.मिळेल त्या मार्गाने अनेकांनी संस्थेला सातत्याने मदत केली. रामशेठ ठाकूर हे सुध्दा त्या देणगीदारांपैकींच एक दानशूर व्यक्तीमत्व आहेत.रामशेठ ठाकूर यांचे आणि रयत शिक्षण संस्थेचे नातेही तसे जुनेच आहे. रामशेठ ठाकूर हे देखील रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत.संस्थेच्या कमवा व शिका योजनेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर ते मोठे उद्योजक झाले. पण रयत शिक्षण संस्थेला ते कधीच विसरले नाहीत. त्यांच्या स्वतःच्या अनेक संस्था असूनही त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी मदतीचा ओघ कायम ठेवला आहे.रयत शिक्षण संस्थेसाठी व इतर शिक्षण संस्थाना त्यांनी आजतागायत  १००( शंभर)कोटी रुपयांहून अधिक देणग्या दिलेल्या आहेत.यात सात्रळ येथील कन्या विद्यालयाच्या इमारत बांधकामाकरिता त्यांनी ५० (पन्नास) लक्ष देणगी प्रदान केली आहे.तसेच पनवेल व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट परिसरात त्यांनी ५० (पन्नास) कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व शाळा महाविद्यालयांची स्थापना केली आहे. रयत शिक्षण संस्था आणि इतर अनेक शैक्षणिक संस्था व सेवाभावी संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

         सात्रळ येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत उपस्थित राहणार असून त्यांनीही सात्रळ येथील कन्या विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी रोख २५ (पंचवीस) लक्ष रुपयांची देणगी प्रदान केली आहे. घरत हे ही रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या समवेत नवी मुंबई येथील यशवंतरावजी देशमुख हे ही रयतचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत 

         सात्रळ येथील या सर्व कार्यक्रमाचे समन्वयक कैलासजी शिंदे (आय ए.एस) हे आहेत.कैलासजी शिंदे हे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत.ते सात्रळचे भूमिपुत्र व या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी सात्रळ रयत शैक्षणिक संकुलासाठी भरीव आर्थिक पाठबळ उभे केले आहे.

     वरील कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवीसाहेब (आय.ए.एस) सेवानिवृत्त,यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष. ॲड.भागीरथजी शिंदे( व्हा.चेअरमन) आहेत.

      कार्यक्रमासाठी आमदार आशुतोषदादा काळे, अध्यक्ष उत्तर विभागीय सल्लागार समिती,मा.विकासजी देशमुख सचिव रयत शिक्षण संस्था (सेवानिवृत्त आय.ए.एस), रयत शिक्षण संस्थेचे सचिव तसेच प्राचार्य ज्ञानदेवजी म्हस्के कुलगुरू कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा,   शिवलिंग मेनकुदळे सहसचिव रयत शिक्षण संस्था,मा.प्रकाशजी निकम चेअरमन बांधकाम समिती,मा.बंडूजी पवारसाहेब सहसचिव माध्यमिक विभाग रयत शिक्षण संस्था यांच्या समवेत अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

   या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच रयत शिक्षण संस्थेच्या सर्व जनरल बॉडी सदस्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

        कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी आवाहन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.