आष्टी - चिंचाळा ते देसूर रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करावे या मागणीसाठी चिंचाळा येथे सामाजिक कार्यकर्ते अशोक पोकळे यांनी ग्रामस्थांसह उपोषण केले.
--------
अर्धवट रस्ता कामासाठीचे उपोषण
दुस-या दिवशी आश्वासनानंतर मागे
--------
देसूर-चिंचाळा रस्त्याचे रखडले होते काम
---------
प्रतिनिधी, आष्टी
तालुक्यातील देसूर ते चिंचाळा या रस्त्याचे आठ महिन्यांपासून अर्धवट अवस्थेतील काम पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक पोकळे यांनी शुक्रवारी (दि. ३) चिंचाळा गावात सुरू केलेले उपोषण शनिवारी (दि. ४) अधिका-यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
तालुक्यातून जाणा-या ग्रामीण मार्ग क्रमांक ६६ देसूर ते चिंचाळा या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम करावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या चार किलोमीटर अंतराच्या रस्ता कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने आठ महिन्यांपूर्वी हे काम हाती घेतले. मात्र, खडी व मुरूमाच्या एका थरापर्यंतचे काम महिनाभरात पूर्ण झाल्यानंतर उर्वरित काम तसेच अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले. या अर्धवट कामामुळे देसूर, चिंचाळा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी गैरसोय सुरू होती.
ग्रामस्थांनी अपूर्ण अवस्थेतील हे काम पूर्ण करून घेण्यात यावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करूनही हे काम सुरू होत नसल्याने चिंचाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक पोकळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानुसार शुक्रवारी (दि. ३) त्यांनी चिंचाळा गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. शनिवारी (दि. ४) सा.बां. विभागाच्या अधिका-यांनी काम पूर्णत्वाचा कालावधी १२ महिन्यांचा असून निधी अनुपलब्धतेमुळे या कामाचे कोणतेही देयक कंत्राटदारास देण्यात अदा करण्यात आले नसल्याचे कळवून उर्वरित तीन महिन्यांच्या मुदतीत हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच सोमवारी (दि. ६) या कामास पुन्हा सुरवात करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन श्री. पोकळे यांना दिल्यानंतर सुरू असलेले हे उपोषण मागे घेण्यात आले.
stay connected