साबलखेड-आष्टी महामार्ग दोन वर्ष झाली तरी पूर्ण होईना...
धुळीने नागरिक त्रस्त, लोक प्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे
आष्टी ता.२८ (बातमीदार)- तालुक्यातील साबलखेड ते आष्टी या महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असून या रस्त्यावर पडलेली खडी, मातीचे ढिगारे आणि वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यालगतच्या व्यावसायिकांसह वाहनचालक व सर्व सामान्य नागरिक धुळीने त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचे काम दोन वर्ष झाली तरी अपूर्णच आहे. त्यामुळे आता लोक प्रतिनिधींनी या कामाकडे लक्ष देऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
मागील दोन ते अडीच वर्षापासून साबलखेड ते आष्टीपर्यंत चालू असलेले महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मात्र या धुळीमुळे सर्व सामान्य नागरिकांसह रस्त्याच्या आजूबाजूचे लहानमोठे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या महामार्ग अधिकाऱ्याचे लक्ष आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या रस्ता रुंदीकरणाचे काम दोन्ही बाजूकडून समान झालेले नाही. प्रत्येक ठिकानी तुकडे तुकडे काम केले. मात्र कुठेच काम पूर्ण केलेले नाही. अनेक ठिकाणी साईड सिमेंट गटारींचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे रस्त्यालगत असणारे लहानमोठे दुकानदार, वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरच अस्ताव्यस्त पडलेली खडी, मातीचे ढिगारे आहेत. तर दुसरीकडे वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ते धुळीने माखले आहेत. या धुळीचा त्रास आजूबाजूच्या नागरीकांसह दुकानदार व दुचाकी चालकांना सहन करावा लागत आहे. तर रस्त्यालगतची पिके धुळीने माखली आहेत. आष्टीकडे ये- जा करताना दुचाकी चालकांची तर अक्षरश: दमछाक होत असून, या रस्त्यावर धुळ उडू नये म्हणून पाणी मारणे आवश्यक आहे. मात्र याकडेही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक धुळीने हैराण झाले आहे. या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार व मनक्याच्या आजाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याचे किमान गाव परिसरातील तरी काम तातडीने करण्यात यावे यासाठी लोक प्रतिनिधींनी लक्ष देऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे.
stay connected