पत्रकारितेमुळेच लोकशाही टिकून : पोलिस अधीक्षक राकेश ओला, अहमदनगर पत्रकार संघातर्फे पत्रकार बांधवांचा सन्मान

 पत्रकारितेमुळेच लोकशाही टिकून : पोलिस अधीक्षक राकेश ओला, अहमदनगर पत्रकार संघातर्फे पत्रकार बांधवांचा सन्मान









नगर : Tejwarta 

देशभरात मराठी वृत्तपत्रांची संख्या अधिक असून, या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे व्यक्तिमत्त्व सवार्ंगीण विकसित होत आहे. पत्रकारिता हा देशाचा चौथा स्तंभ आहे. या स्तंभाच्या चौफेर कामगिरीमुळेच लोकशाही टिकून आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले.

‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहमदनगर पत्रकार संघाच्या वतीने हॉटेल राजयोग येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक राकेश ओला बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, अहमदनगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल लगड आदी उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक ओला यांनी प्रारंभी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. वृत्तपत्राचे महत्त्व विशद करताना ओला म्हणाले की, वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माहिती समाजाला मिळते. विविध विषयांचे संपादकीय अग्रलेख, लेख तसेच राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक व साहित्यिक माहिती वाचायला मिळत आहे. त्यातून व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास मदत होत आहे.  सर्वसामान्य व्यक्तींची वृत्रपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. त्यामुळे वृत्तपत्र हे जीवनाचे अविभाज्य घटक असल्याचे त्यांनी नमूद केले.

  महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी पौराणिक आणि आधुनिक उदाहरणे देत तसेच लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्र.के. अत्रे यांच्या समाजप्रती असलेली पत्रकारिता याबाबत मार्गदर्शन करीत  वृत्तपत्रांचे महत्त्व सांगितले. पूर्वी आजचे वृत्तपत्र दुसर्‍या दिवशी वाचनास मिळणे कठीण होत होतो. आता यामध्ये सुधारणा झाली असून, ई-पेपरमुळे 25 वर्षांनी सुध्दा हवी असलेली बातमी वा लेख  ई-पेपरमुळे उपलब्ध होणार आहे. निष्पक्ष आणि सजग पध्दतीची पत्रकारिता आवश्यक असल्याचे सांगत आयुक्त डांगे यांनी समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकारांनी करावे, असे आवाहन यावेळी केले.

  जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मोघे यांनी अभ्यासपूर्ण वृत्तपत्रांचा इतिहास आणि आधुनिक पत्रकारिता याबाबत मार्गदर्शन केले. ए. आय. चे आव्हान न मानता त्याला सोबत घेऊन कार्य सुरू ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के, अनंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी महापालिका आयुक्त डांगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध वृत्तपत्रांचे संपादक, आवृत्ती प्रमुख तसेच वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पत्रकारांचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध दैनिकांचे संपादक, बातमीदार छायाचित्रकार, ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

  प्रारंभी अहमदनगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल लगड यांनी प्रास्ताविक करीत पत्रकार संघाच्या वतीने सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. पत्रकार संघाचे सचिव संदीप रोडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.

....................



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.