बीएसएनएल मोबाईल ग्राहकांना अखंडीत सेवा द्यावी- शंकर देशमुख
आष्टी ता.९ (प्रतिनिधी)- भारत संचार निगमची सततच्या विस्कळीत मोबाईल नेटवर्कमुळे आष्टीसह कडा परिसरातील असंख्य मोबाईल धारक त्रस्त झाले असून, ग्रामीण भागातील मोबाईल ग्राहकांना पुर्ण क्षमतेने सुरुळीत सेवा पुरवावी अशी मागणी भाजपा बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी संचार निगमचे महाप्रबंधक राजेंद्रसिंह चोंगाड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
आष्टीसह कडा शहरातील बाजारपेठ मोठी असून, याठिकाणी परिसरातील वीस ते पंचवीस गावांचा संपर्क आहे. शासकीय कार्यालय, कृषी उत्पन्र बाजार समिती, राष्ट्रीयकृत, सहकारी बँका, रुग्णालये, शाळा, महाविद्यालय आहेत. शासकीय योजनांची माहिती, नोंदणी, शेतकरी अनुदान, विद्यार्थी, तरुणांना शिष्यवृत्ती अर्ज यासारखी कामे आॅनलाईन करावी लागतात. परंतू मागील काही दिवसांपासून भारत संचार निगमची मोबाईल सेवा आष्टी तालुक्यात पुर्णपणे विस्कळीत झाली असल्यामुळे मोबाईल धारकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने ग्राहक इतर महागड्या मोबाईल कंपन्यांकडे आकर्षित होताना दिसत आहे. त्यामुळे भारत संचार निगमने ग्रामीण भागातील मोबाईल ग्राहकांना पुर्ण क्षमतेने व सुरुळीत सेवा पुरवावी. अशी मागणी भाजपा बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी संचार निगमचे महाप्रबंधक राजेंद्रसिंह चोंगाड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. याप्रसंगी पत्रकार राजेंद्र जैन, दिलिप परदेशी, राजेश शिंदे आदी उपस्थित होते.
stay connected