अंभोरा पोलिसांची केरुळ येथे मध्यरात्री कारवाई
दोन गावठी पिस्टलसह आरोपी व अल्पवयीन मुलगी ताब्यात, आरोपीला पोलीस कोठडी
आष्टी ता.२८ (बातमीदार)- तालुक्यातील केरुळ येथे अंभोरा पोलिसांनी सोमवारी (ता २७) मध्यरात्री छापा टाकून दोन गावठी पिस्टलसह आरोपी व एक अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीला मंगळवारी (ता २८) न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सदरील मुलीला इंदापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणामुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अंभोरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केरूळ येथे मध्यरात्री छापा मारला असता आरोपी कुमार दत्तू कांबळे (रा वरकुटी. ता इंदापूर, जि पुणे) याच्या कडून 2 गावठी पिस्टल व एक पिस्टल राऊंड सह 1 लाख 2 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी कांबळे व त्याच्या साथीदारांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीने 10 दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला तिच्या गावातून पळवून आणले होते. तिला ताब्यात घेऊन इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी कुमार दत्तू कांबळे याच्यावर इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. सदरील आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत.
या कारवाईत अंभोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे, हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब गर्जे, पोलीस कॉन्स्टेबल शिवदास केदार, सुदाम शिरसाठ, मझरुद्दीन सय्यद यांनी पार पाडली. या कारवाईने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
stay connected