Makar Sankrant 2025 पतंगातून मृत्यू ; दोषी मायबापच ?

 पतंगातून मृत्यू ; दोषी मायबापच ?

Makar sankrant


          पतंग उडविणे ही लोकांना एक चांगली गोष्ट वाटते. ते पतंग उडविण्याला उत्सव समजतात व पतंग उडवीत असतात. ज्यातून कोणाचे अकारण जीव जात असतात. आता पतंग उडविण्यातून धोके निर्माण झाल्यानं लोकांनी पतंग उडविणं बंद केलेले नाही तर लोकांनी पतंग हे विशिष्ट दिवशीच उडविण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार तीळसंक्रात, गणराज्यदिन याच विशिष्ट दिवशी ते पतंग उडवीत असतात व त्याच दिवशी अति बेभानपणे पतंग उडवून आपला आनंद साजरा करण्याची पद्धती त्या दिवशी प्रचलीत केलेली आहे. त्या दिवशी पतंग उडविणाऱ्या लोकांवर कुणीही बंदी आणत नाही व लोकांना मनसोक्तपणे पतंग उडवू देतात. 
         पतंग उडविणे हा अतिशय घातक खेळ असून तो तेवढाच जीवघेणाही आहे. तसं पाहिल्यास कोणतेही खेळ हे साधेसुधे नाहीत. क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, शंकरपट व पोळ्याला खेळला जाणार गोटमार हा खेळ, इत्यादी. त्यात पतंग हा देखील खेळ मोडतोच. याबाबतीत एका व्यक्तीचा संवाद. तो म्हणत होता, 
          "पतंग नाही उडविणार तर कोणता खेळ खेळणार."
          ते त्याचं बोलणं. त्यावर दुसरा एक व्यक्ती म्हणाला, 
           "कंचे खेळावेत."
           "कंचे खेळण्यात धोके नाहीत असं वाटंतय का?"
            "होय. अगदी तसंच वाटतंय."
            "अहो, कंच्यातून वाद निर्माण झाल्यावर एखाद्यानं एखादा कंचा त्याच्या गुप्त भागावर जोरानं मारल्यास त्यातही जीव जावू शकतो. जीव जावू शकतो का नाही?"
           ते त्याचं उत्तर. त्यावर पलीकडील व्यक्ती निरुत्तर झाला. 
           केवळ पतंग वा कंचेच खेळणं नाही, तर असे कितीतरी खेळ आहेत की त्या खेळात लोकांचा जीव जावू शकते. जसे क्रिकेट, विट्टीदांडू, लघोरी, धावन, जिम्नॅस्टिक्स, कबड्डी, खो खो, लंगडी. अशी बरीच नावं देता येतील की त्यामुळंच जीव जावू शकतो. थोडंसं चुकलं खेळतांना की जीव जाणारच. 
         बाकीच्या खेळात चुकांना वाव नाही. चुकलं खेळतांना की जीव जातो. परंतु पतंग खेळात चुकण्याचा  प्रसंगच उद्भवत नाही. मात्र या खेळाचा धाग्याशी संबंध येत असल्याने व या खेळातील धाग्यापासून माणसांचे गळे, पशुपक्षांचे गळे, नाही तर संपुर्ण जीव जात असल्यानं हा खेळ खेळायला बरा वाटत नाही. त्यातच नॉयलान मंजा. जो कधी सडत नाही. सडून गळत नाही वा नष्ट होत नाही. शिवाय असा नॉयलान मंजा पक्षांच्या पायात अडकल्यास पक्षी त्यातून निसटू शकत नसल्यानं ते उपाशी पोटी तडफडत मरण पावतात. ज्यातून पक्षी कमी होतात व पक्षांवर ही सक्रांत आलेली दिसते. तसेच हाल पशुंचेही असते. 
          नॉयलान मंजा. हा नॉयलान मंजा सरासरी तुटत नाही, सडत नाही, गळत नाही, नष्टही होत नाही. तो ओढल्यास रबरासारखा लांब होतो. तो तिक्ष्ण असून अतिशय धारधार असतो. जो गळ्यावर आल्यास गळ्याचा पुर्ण भाग कापला जातो. ज्यात नसा असतात. रक्तवाहिन्या असतात व त्या रक्तवाहिन्या तुटून गेल्यानं त्यातून रक्तस्राव होतो. असा रक्तस्राव बराच झाल्यानं व्यक्ती गतप्राण होतो. ही तीव्रता बरेचदा जाणवते. याबाबतीत एक व्यक्ती म्हणाला, 
         "नॉयलान मंजाला दोष दिला जातो. मग साधा मंजा घातक नाही काय?"
          त्या व्यक्तीचं म्हणणं बरोबर. साधा मंजाही गळे कापू शकतो. तोही तेवढाच घातक आहे.
          त्या व्यक्तीचं म्हणणं बरोबर होतं. साध्या मंजानंही नुकसान होतच होतं व गळेही कापले जात होते. 
         पतंग....... पतंग उडविल्यानं पशूपक्षांचेच नाही तर माणसांचेही गळे कापले जात असतात. ज्यात निरपराध माणसं विनाकारण मृत्युमुखी पडत असतात. ज्यातून कोणाचा पती मरण पावल्यास संसार तुटतो. कुणाचा पुत्र मरण पावल्यास शल्य जाणवतं आणि कोणाचे आईवडील मरण पावल्यास छत्र हरवतं. ज्यात पालकांचा दोष असतो. पतंग उडविल्यानं आपलं काय नुकसान होणार आहे. असा विचार करीत लोकं आपल्या पाल्यांना ते रडतात, म्हणून त्याची हौस पुरविण्यासाठी आणि त्याला आनंद मिळवून देण्यासाठी पतंग व मंजा घेवून देतात. ज्याने कधीकधी त्यांच्या पाल्याचंच नुकसान होत असते. ज्यात कधीकधी ते पाल्य पतंग उडवितांना नॉयलान मंजाचा वापर करतात. ज्यांना पोलीस पकडून नेत असतात. 
         अलिकडील काळात पतंग उडविण्याचा छंद वाढत चाललेला आहे. आज तिळसंक्रात आहे व तीळसंक्रात हा सण जरी तिळगुळ घ्या व गोड गोड बोला. असा गोड बोलण्याचा संदेश देत असला तरी हा दिवस कोणाच्या तरी आयुष्यात अति वेदनाशामक वेदना आणणारा दिवस आहे. जर कोणी पतंग उडविणार असेल तर....... या गोष्टीचा नक्कीच सर्वांनी विचार करावा व जरी तीळसंक्रात हा सण आपण पतंग उडविण्याचा सण म्हणून साजरा करीत असलो तरी पतंग कोणीही उडवू नये. तशी शपथ आपण घ्यावी. 
         उद्या लोकं तीळसंक्रात एक गोड बोलणारा सण म्हणून साजरा करणार आहेत. ज्यात कोणाचा जीव जावू शकतो व त्याला पतंग उडविणाऱ्याचा राग येवू शकतो. असे होवू नये. म्हणून कोणीही पतंग उडवू नये व तीळसंक्रात हा सण पतंग उडविण्याचा दिवस म्हणून साजरा करु नये. तर तो गोड सण म्हणून साजरा करावा. तसंच पालकांनीही या दिवसाच्या निमित्याने त्यांचा पाल्य रडला तरी आपल्या पाल्यांना पतंग घेवून देवून दोषी होवू नये. ज्यातून कोणाची मान कापण्यातून वाचेल. कोणाचा जीव जाण्यातूनही वाचेल नव्हे तर कोणाचा संसार तुटून त्याचं विनाकारण नुकसान होण्यातून वाचेल यात शंका नाही. 

          अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.