19 मार्चला मी करणार अन्नत्याग ! तुम्हीही करा!
शेतकरी आत्महत्या थांबायचे नाव घेत नाहीत. आता शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र कमी झाली नाही. याचा अर्थ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांवर संकट अधिक गडद झाले आहे. म्हणून या वर्षी देखील मला 19 मार्च रोजी अन्नत्याग/उपवास/उपोषण करावे लागत आहे.
19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (यवतमाळ)चे शेतकरी साहेबराव करपे त्यांची पत्नी मालतीताई व चार लेकरांनी सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेने सारा देश हादरून गेला होता. नोंद झालेली ही पहिली आत्महत्या. 19 मार्च हा साहेबराव करपे कुटुंबाचा हा स्मृती दिन आहे म्हणून या दिवसाची निवड केली आहे.
माझ्या अवतीभोवती वणवा पेटला आहे. एक दोन नव्हे, हजारो नाही, लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. एक सामान्य नागरिक म्हणून मी काय करू शकतो? एक दिवस मला अन्नाचा घास जाणार नाही. एक दिवसभर मी अन्नत्याग करू शकतो, असा विचार करून मी उपवास करायचे ठरवले आहे.
तुम्ही पण संवेदनशील असाल तर मला खात्री आहे, तुम्ही पण 19 मार्चला अन्नत्याग कराल.
हा अन्नत्याग कोणत्या राजकीय पक्षांचा कार्यक्रम नाही, कोण्या एका संघटनेचा कार्यक्रम नाही. हा सगळ्या संवेदनशील नागरिकांचा नैतिक कार्यक्रम आहे.
तुम्हाला कळवणे ही माझी जबाबदारी होती. ती मी पार पाडली आहे. आता तुमची जबाबदारी आहे.
19 मार्चला अन्नत्याग/उपवास/उपोषण करायचा निर्णय करा व ही पोस्ट इतरांना पाठवून त्यांनाही कळवा.
stay connected