*इस्लामीया दारुल उलूम येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन*
-------------------
*तीन विद्यार्थी हाफिज पदवीने होणार सन्मानित*
---------------------
आष्टी (प्रतिनिधी) - शहरातील जामा मस्जिद परिसरात मागील चाळीस वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या इस्लामीया दारुल उलूम या मदरसा मध्ये सालाबादप्रमाणे यंदाही गुरुवार दि.13 रोजी सायंकाळी ७ वा. औरंगाबाद येथील सफ़ा बैतुल मालचे अध्यक्ष मुफ्ती प्रोफेसर अनीसुर रहमान यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहसंमेलन (जलसा) आयोजित करण्यात आला असून इस्लाम धर्मातील पवित्र कुराण पाठ करून शिक्षण पूर्ण केलेल्या तीन विद्यार्थ्यांना हाफिज ही पदवी देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
इस्लाम हा शांती, बंधुता आणि एकतेचे संदेश देणारा धर्म आहे. मदरश्यात या नैतिक मूल्यांचा अभ्यास त्याचबरोबर पवित्र कुराण या आस्मानी ग्रंथाचे पाठांतर करून हाफिज ही पदवी घेतली जाते. आष्टीतील इस्लामीया दारुल उलूम या मदरसा मध्ये आजतागायत हजारो विध्यार्थी हाफिज पदवी घेऊन समाजात धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. यावर्षी मदरश्यात पन्नास एवढी विद्यार्थी संख्या आहे. यापैकी अनवर निसार पठाण,रा.मेहकरी, जमील सलीम पठाण,रा.भाळवणी, मोहम्मद इम्रान सय्यद,रा.कडा या तीन विध्यार्थ्यांनी इस्लाम धर्मातील पवित्र कुराण या आस्मानी ग्रंथाचे पाठांतर यशस्वीपणे पूर्ण केले असुन यांना हाफिज ही पदवी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहे.
इस्लामीया दारुल उलूम या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणासोबत मराठी, गणित, इंग्रजी तसेच कॉम्प्युटरचे शिक्षण अगदी मोफत दिले जाते. यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली असून अत्याधुनिक अशी कॉम्प्युटर लॅब देखील मदरश्यात उभारण्यात आली आहे. याचप्रमाणे शासनाच्या नियमावली प्रमाणे मस्जिद आणि मदरसा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे ही बसवण्यात आले आहेत. इस्लामीया दारुल उलूम ही संस्था पूर्णपणे स्वयंअर्थ सहाय्यीत असून समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणगीतून सुरू आहे.
उर्दू ता.१५ शाबान १४४६ हि. गुरुवार दि.१३ रोजी सायं.७ वा. इस्लामीया दारुल उलूम, जामा मस्जिद आष्टी याठिकाणी होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनात (जलसा) जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजित समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
stay connected