प्रेम आठवडा: कालचं निस्सीम आणि आजचं बदलतं प्रेम
संस्कृती कोणतीही असो त्यातील प्रेम हा शब्द आणि त्यामागील भावना महत्त्वाची ठरते. भारतीय संस्कृतीतही प्रेमाला महत्त्व दिल्याचे दिसून येते. दरवर्शी ७ ते १४ फेब्रुवारी या ८ दिवसात तरुणवर्गामध्ये उत्साहाने साजरा केला जाणारा प्रेम आठवड्याचा उहापोह कशासाठी? हा आठवडा नेमका प्रेमाचा असतो कि स्वैराचाराचा? भारतीय संस्कृतीवर आघात करणारा आणि युवावर्गाचे नैतिक अध:पतन करणारा प्रेम आठवडा आपल्या संस्कृतीप्रधान देशात हवा तरी कशाला?
एखाद्याकडे चोरून पाहणे, हसणे किंवा लाजणे हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडते. असा कुणीही नाही जो या टप्प्यातून गेला नाही. आपल्या काही मित्रांनी या टप्प्यातून जाऊन त्यांचे प्रेम मिळवले असले तरी, असे काही असतील जे अजूनही त्यांच्या प्रियकराला किंवा प्रेयसीला त्यांच्या हृदयातील गोष्टी पोहचविण्याचा प्रयत्न करत असतील. जर तुमचे प्रेम देखील दाखवण्याच्या, लाजण्याच्या आणि हसण्याच्या टप्प्यातून जात असेल, तर तुम्ही थोडे धाडस करून तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसी समोर तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. हा तोच महिना आहे ज्यामध्ये हवामानात प्रेमाचा रंग मिसळतो आणि वातावरण आल्हाददायक बनते. या महिन्यात, संपूर्ण जगातील प्रत्येक व्यक्ती प्रेमाच्या रंगात रंगते. संपूर्ण जग फेब्रुवारी महिन्यात १४ फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रेम हा अविभाज्य घटक आहे. असं म्हटल्या जाते की, प्रेमाने जग जिंकता येतं. तर असेल कदाचित...पण प्रेम म्हणजे नेमकं काय असतं हो? मला सांगाल प्लिज...कारण मला याचा फारसा अनुभव नाही. प्रेमात काय, काय करावं लागतं? याची मला काहीच म्हणजे पुसटशीही कल्पना नाही. विशेष म्हणजे मी प्रेमास पात्र नाही आणि नसेलही कदाचित...हा! समजा अनवधानाने कुणी तरी कळत नकळत माझ्यावर प्रेम केलं असेल आणि करतही असेल तर तो भाग वेगळा...जर तसं असेल तर ते जिथे कुठे असतील तिथे सदैव हसत-खेळत आनंदात राहो. त्याचे सर्व दु:ख मला मिळो आणि माझं सुख त्याला...हिच माझी मनोमन ईश्वर चरणी प्रार्थना..! असं असलं तरीही आजूबाजूची परिस्थिती बघता मन सुन्न करणा-या घटना आणि कटूसत्य अनुभवास येते.
खरं तर माणसाला सर्वप्रथम कशाची गरज असेल तर ती प्रेमाची...प्रेम हेच जीवन आहे. जीवनाच्या या प्रवासात कितीही संकटे, अडथळे आली तरी आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते दूर करू शकतो. पण एखाद्या व्यक्तीच्या तिरस्काराने मात्र आपण पूर्णत: हतबल होतो. प्रेम ही जीवनाला परिपूर्ण करणारी भावना असून ती एक अलौकीक शक्ती आहे. म्हणून प्रत्येकाने आयुष्यभर मनमोकळे प्रेम करावे. एकदा का तुम्ही प्रेमाचे शिखर सर केले तर खरं प्रेम काय असतं ते तुम्हाला कळेल...प्रेम हे एक असं नातं आहे की, प्रत्येक व्यक्ती ते मनापासून निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. स्वेच्छेने एखाद्यास मानतो आणि दु:खाचे क्षण, अपयशाचे प्रसंग, सुखाच्या आठवणी हक्काने त्यांच्यासोबत वाटून घेतो. परस्परातील मतभेद असं सारं काही बाजूला ठेवून दोन ह्रदय एकमेकांच्या जवळ येतात. दोन व्यक्तीतील परस्पर ह्रदयाचा तो गारवा असतो.
प्रेम ही मनुष्याला मिळालेली नैसर्गिक व अनमोल देणगी आहे. खरं प्रेम विना अपेक्षेने आपोआपच होवून जातं. दोन मन केव्हा, कशी व कोणत्या परिस्थितीत जुळतात हे उमजतच नाही. प्रेमामध्ये इतकी प्रचंड शक्ती असते की, माणूस असाध्य गोष्ट ही साध्य करू शकतो. त्यासाठी फक्त त्याला प्रेमाची साथ हवी असते. प्रेम ही परमेश्वराची अशी देण आहे जी अंत:करणातून निर्माण होवून आयुष्यातील क्षणांना सोनेरी करते. कारण माणूस एका यशोशिखरावर प्रगतीनं तेव्हाच झगमगू शकतो, जेव्हा त्याच्या पाठीशी एक प्रेरणात्मक शक्ती उभी असते. ती शक्ती म्हणजे आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती असते. केवळ माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत असतील. खूप मोठे व्हा आणि खूप नाव कमवा म्हटल्यानं कुणी मोठं होत नाही. प्रेमातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याग व विश्वास...कारण ज्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याचे सुख कशात आहे हे शोधून त्याच्या सुखासाठी आपल्या सुखाची होळी करावी लागते. प्रेम शेवटपर्यंत यशस्वी होतंच असं नाही. काहींना त्यात रडावंही लागतं. जसं...यासाठी प्रचंड विश्वासाची साथ व विचारांची जुळवणूक असावी लागते.
प्रेम हा शब्द प्रत्येकाच्या जीवनात प्रतिसाद घालतो. ते आई-वडिलांचे, भाऊ-बहिणीचे, मित्र-मैत्रीणीचे किंवा प्रियकर-प्रेयसीचे...आपण जीवनात पहिलं प्रेम हे आपल्या आई (वडील) वर करत असतो, हे तर सर्वश्रूतच आहे. पण याच्याही व्यतीरिक्त आपण एका अशा खास व्यक्तीवर प्रेम करतो, जी व्यक्ती आपल्या ह्रदयात विशिष्ट स्पंदने निर्माण करतो. ज्याची जागा नंतर कुणीही घेवू शकत नाही. प्रेमाला वयाचं बंधन नसते. ते कोणत्याही वयात, कोणत्याही क्षणी एक वेगळ्याच प्रतिक्रिया घेवून प्रत्येकाच्या जीवनात निर्माण होतात.
प्रेमाची नेमकी व्याख्या अजूनही कुणाला करता आली नाही आणि प्रेम करण्याची पद्धत पण थोडी वेगळी आहे. आजचा युवक असो की युवती फक्त बाह्यांग बघत असते. तो किंवा ती दिसायला किती सुंदर आहे? त्याची राहणीमान आधुनिक पद्धतीनुसार म्हणजे स्टायलीश असल्यास तर मग सांगायचं काही कामच नाही. म्हणजे एकुणच तो आपल्या गरजा पूर्ण करू शकतो का? याचा निकष लावला जातो. म्हणून अशा मुलांवर प्रेम केल्या जाते. याचा कधीच विचार केल्या जात नाही की, तो खरोखर प्रेम करतो की फक्त शारिरीक आकर्षणापुरता...एखाद्या सामान्य कुटूंबातील साधी राहणीमान असणारा मुलगा एखाद्या मुलीवर अंतर्मनातून प्रेम करतो. पण तो आजच्या स्टायलीश पद्धतीनुसार राहू शकत नाही. पण त्याचे तिच्यावरचे प्रेम हे त्याच्या ह्रदयात कायमचे घर केलेले असते, खरे असते, निस्सीम असते. पण ती मुलगी त्या मनापासून प्रेम करणा-याला कधीच स्वीकार करत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे तिने लावलेले निकष तो पूर्ण करू शकत नाही. आजच्या युगात या गोष्टींचा विचार केला जातो. पण त्याचे प्रेम किती निर्मळ, पवित्र, अपार आहेत ज्याला मर्यादा नाही हे कधीच बघितल्या जात नाही. या ख-या प्रेमाला आजच्या घडीला काहीही किंमत नाही. प्रेमाला स्विकारणे गरजेचे आहे. असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांना प्रेमाची भाषा कधी कळत नाही आणि असेही काही आहेत जे कळूनसुद्धा प्रेमाला स्वीकारू शकत नाही.
अंतरंग तर चुकूनही कुणी बघत नाही. समजा बाह्यांगावरून चांगली आढळणारी गोष्ट अंतरंगातूनही चांगली असतील याची काय शाश्वती? असो! एकदा अंतरंग बघा! म्हणजे त्याचे मन किती पवित्र आहे? त्याचे विचार किती श्रेष्ठ आहे? एकुणच आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे? इत्यादी गोष्टींचा सारासार विचार करायला पाहिजे. ठिक आहे! आपल्या घरालगतच्या पुढील जागेला आपण अंगण म्हणत असतो. वरून ते आपल्याला अंगण वाटत असलं तरी काय माहित अंतरंगात सोन्याची खाणही असू शकते. याचा कुणीही विचार केला आहे का?
प्रेम हे कसं असावं? कृष्ण-राधासारखं निस्सीम, निर्मळ, हिर-राजासारखं अजरामर नि शहाजहानने बांधलेल्या ताजमहालच्या प्रतिकासारखं...या सर्वांच्या प्रेमकथा अजरामर आहे आणि इतिहास याला साक्ष आहे. आजचं चित्र खुपच विचित्र आहे. प्रेमाला सुरुवात झाली न झाली पहिली डिमांड असते मोबाईलची...त्यानंतरची वस्तुस्थिती तुम्हाला माहितच आहे. काही तर फक्त नि फक्त प्रेमाचा दिखावा करत असते आणि आपल्या गरजानुसार त्याचा वापर करत असते. प्रेमाच्या वाटेत सुखरुपी फुले आणि दु:खरुपी काटे असते. यासाठी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक व जपून टाकावं लागते. आपले पाऊल काट्यावर पडले तरी चालेल. कारण यामुळे फक्त आपल्याला वेदना होतील. परंतु जर आपले पाऊल त्या फुलावर पडले तर त्या फुलाचे सौंदर्य, जीवनच नष्ट होईल. म्हणून आपल्या मनाच्या कोप-यात एखाद्याला जागा द्यायची असल्सास ती आयुष्यभरासाठी द्यावी. अन्यथा त्या गोष्टीचा विचारच मनात आणू नये. पण वास्तविक जीवनाचं स्वरूप थोडं वेगळं आहे. कुणी तरी आपल्या जीवनात डोकावतं, आपल्या भावनांशी खेळतं. हा खेळ सुरू असताना आपण उज्ज्वल संसाराचे स्वप्न रंगवीत असतो. पण ते आपल्याला स्वप्नांच्या सोनेरी क्षितीजावर स्वप्न दाखवून, दुराव्याच्या खाडीत ढकलून जीवनाच्या अर्ध्या वाटेवरच सोडून जातात. प्रत्येकालाच प्रेम करणारं कुणीतरी आपलं हवं असतं. जीवन जगायला नव्हे तर फुलवायला. तारुण्यात तर असं विश्वासाचं, जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं, नकळत जुळून येणारं नातं प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हवहवसं वाटतं.
प्रेमातील सर्वात महत्त्वाची अडसर म्हणजे जात...ब-याच प्रेमींचं ब्रेकअप हे जातीमुळेच होत असते. मला एक सांगता का हो! आदिमानवाच्या काळात किती जाती होत्या? या जातीची उत्पत्ती कुठून झाली आहे? याचा आजचा समाज का बरं विचार करत नाही. का बरं आपला समाज प्रेम भावना समजून घेण्याइतपत अजून सक्षम झालेला नाही. ही एक प्रेमाविषयीची शोकांतिका आहे. प्रेमाला समजून न घेतल्यास अशी कित्येकांचे प्रेम मनातच दडपल्या जातात. त्यांच्यात जातरुपी अंतरपाट वियोगाची भिंत बांधल्या जाते. तसं बघता जाती दोनच स्त्री आणि पुरुष...बरं ठिक आहे! मी पण तुमच्या विचारांशी सहमत आहे. मला दाखवता का असा व्यक्ती ज्यांचं रक्त सप्तरंगापैकी एक आहे. मग का बरं इतकी चुकीची विचारधारणा...
मला एक कळत नाही की, जेव्हा एखाद्याचं लग्न जुळतं, तेव्हा ते तोडावं नाही पण जोडावं असं म्हटल्या जाते. मग प्रेम करणा-यांना का बरं तोडल्या जाते. तेव्हा त्यांची संस्कृती, संस्कार कुठे गहाण पडलेली असते. खरं तर लग्नातील जोडपं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत अनभिज्ञ असते. पण प्रेमात तर एकमेकांच्या सर्वच गोष्टी जाणून असते. ते देहाने जरी अलग असले तरी पण मनाने, ह्रदयाने मात्र एकच असते.
आमच्या काही लेखक लेखिकांचे
थाटामाटात प्रेमविवाह उरकले आहे
यशस्वी संसाराच्या गाड्याची चाके
सामाजिक गालबोटाने डगमगले नाही
stay connected