रमजानुलमुबारक -१ संयम व सदाचाराचा महिना - रमजान ✒️ सलीमखान पठाण 9226408082.

 रमजानुलमुबारक -१ 
*संयम व सदाचाराचा महिना - रमजान*
*✒️सलीमखान पठाण*
   *9226408082.*




सालाबाद प्रमाणे यावर्षीच्या रमजान महिन्याला आजपासून प्रारंभ होत आहे.या महिन्याची सर्व मुस्लीम बांधव आतुरतेने वाट पहात असतात.रमजान महिन्यासाठी सर्व मुस्लीम भाविक मानसिक व शारीरिक दृष्ट्या तयार झाले आहेत.जगभरातील सर्व मुस्लिम बांधव रमजानचे पालन करण्यासाठी सिद्ध झाले असून दररोज सुमारे साडे तेरा ते पंधरा तासांचा उपवास,त्याचबरोबर पाच वेळा नमाज व रात्रीची विशेष तरावीहची नमाज आदा करण्यासाठी तयार झाले आहेत.दिवसभरात वेळ मिळेल तसा आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून कुरआन पठण करून भक्तिभावाने या महिन्याचे पालन करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो.

 रमजान महिना म्हणजे उम्मते मोहम्मदीला मिळालेली एक ईश्वरीय देणगी आहे.या महिन्याचे पालन करीत असताना आपल्यातील सर्व अवगुण दूर करून सद्गुणांचा स्वीकार करण्यासाठी या महिन्याचे पालन सर्वार्थाने केले जाते.पाच वेळा नमाज पठण,रात्री तराविहची नमाज, दिवसभराचा रोजा हे सर्व पालन करताना चुकीच्या गोष्टी करायला कोणाला वेळच मिळत नाही.म्हणूनच रमजान महिना इबादतचा महिना म्हणून ओळखला जातो. याबाबत प्रेषित हजरत पैगंबरांनी म्हटले आहे की शाबान हा माझा महिना असून रमजान हा अल्लाहचा महिना आहे.या महिन्यातील सर्व पुण्य कार्याचे परिणाम अल्लाह देणार आहे.म्हणजेच आपण जे काही सत्कर्म करणार आहोत त्याचे पुण्य किती द्यायचे ते अल्लाहच्या मर्जीवर अवलंबून आहे. 

रमजान महिन्यांमध्ये प्रत्येकाच्या दिनचर्येमध्ये आमूलाग्र बदल झालेला असतो.दररोज सकाळी कधीही वेळेवर न उठणारा माणूस या महिन्यात पहाटे काळजीपूर्वक जागा होतो.नमाज अदा करतो व आपल्या दैनंदिन कामकाजासाठी तयार होतो.या महिन्यांमध्ये प्रत्येक पुण्य कार्याचे पुण्य सत्तरपट दिले जाते.दया,करुणा,भक्ती या सर्व गोष्टींचा महापूर या महिन्यांमध्ये आलेला दिसून येतो.जास्तीत जास्त सत्कर्म करून आपल्या खात्यामध्ये पुण्य जमा करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो.आपल्या वर्तनामध्ये आमुलाग्र बदल घडवीत असतो. परंतु हा बदल केवळ रमजान महिन्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण आयुष्यभर राहिला पाहिजे तरच रमजानचे सार्थक होईल. 

रमजान महिन्यामध्ये प्रत्येक कार्य अल्लाहच्या मर्जीसाठी केले जाते. तहान लागलेली असताना पाण्याला शिवण्याची सुद्धा इच्छा होत नाही.यामध्ये अल्लाहचा आदेश मोडेल ही भीती मनात असते. म्हणूनच आपण सर्वजण अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी सर्व सहन करतो.हे सर्व सहन करण्याची ताकद कुठून मिळते?तर मनाचा निश्चय आपल्याला मिळवून देतो.सूर्यास्ता नंतरच आपल्याला जेवायचे आहे किंवा पाणी प्यायचे आहे,ही श्रद्धा मनामध्ये निश्चय निर्माण करते आणि आपण करीत असलेल्या या वर्तनाने अल्लाह प्रसन्न होईल ही भावना त्यामागे असते.म्हणूनच अतिशय भक्तिभावाने आपण रमजानचे पालन करीत असतो. 

या वर्षी उन्हाळा तीव्र होत असल्याने निश्चित त्याचा परिणाम  होणार आहे.परंतु वृध्द माणसे, आजारी रुग्ण,लहान मुले आदींना या मध्ये सूट दिलेली आहे.खूपच जास्त उष्णता असल्यास रमजानचे रोजे तहकूब करता येतात. काही वर्षांपूर्वी कराची शहरांमध्ये तीव्र उष्णतेमुळे रोजे नंतर पूर्ण करण्याचे आदेश येथील उलेमांनी दिले होते.आपल्याकडे आज तशी परिस्थिती नसली तरी येत्या काही दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याने एकूण वातावरणाचा अंदाज घेऊन सर्वांनी रोजे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.अल्लाहतआला सर्वांना रमजान महिन्याचे पूर्ण पालन करण्याची शक्ती देवो.आमीन.( क्रमश:)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.