या भावनांना मी एकटीच जबाबदार कशी?
प्रिय सर,
कसे आहात? मजेत असाल ही आशा...खरंतर तुम्हाला भेटून किंवा फोन करूनसुद्धा मला तुमच्याशी बोलता आले असते, पण तुम्हाला सध्यातरी काही दिवस भेटायचे नाही हा माझा निर्णय होता आणि आहेसुद्धा...आणि माझा निर्णय तुम्हाला मान्यदेखील आहे. पण काही दिवस म्हणजे नेमके किती दिवस? या प्रश्नाचे उत्तर नाही सर माझ्याकडे...असा निर्णय मी का घेतला? याचे स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही. पण तुमच्यासोबत बोलल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात तुमच्याशी ओळख झाल्यापासून कधी झालीच नाही...त्यामुळे तुमच्याशी बोलल्याशिवाय नाही करमत मला. हे तुम्हालाही खूप चांगले माहिती आहे...पण पुढचे काही अनर्थ टाळण्यासाठी मनावर खूप मोठा दगड ठेवून मला तुमच्याशी बोलणे बंद करावे लागले...मनाला आवर घालणे फारच कठीण गोष्ट...बोलणे बंद केले तरी मन तुमच्याच आठवणीभोवती घिरट्या घालत आहे, तुमच्याशी खूप बोलावेसे वाटत आहे, पण मागचेच दिवस पुन्हा समोर नको म्हणून मी मनाला आवर घालत आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप कठीण आहे सर...तुम्ही समजूही नाही शकाल एवढी कठीण आहे. तुम्ही नेहमी म्हणत होते की, मला सर्व शक्य आहे. कदाचित असेलही तसे...म्हणून मी तसा प्रयत्न तरी करत आहे.
मी आयुष्यभर तुमच्यासोबत असली पाहिजे, सर्वात आधी हे स्वप्न तुम्ही बघितले सर...मी तर या सर्व गोष्टीपासून अनभिज्ञ होते. कारण तुम्ही केलेल्या विचाराप्रमाणे मी कधी विचारच केला नव्हता. तुम्ही फक्त स्वप्नच बघितले नाही तर बघितलेल्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पहिले पाऊलदेखिल टाकले. पण नियतीच्या मनात वेगळीच खेळी सुरू होती. तुमचे पाऊल योग्य दिशेने पडलेच नाही. त्यामुळे तुमच्याकडून खूप मोठी चूक झाली, हे ओझे मनात घेऊन तुम्ही वावरत होता, हे जेव्हा मला समजले तेव्हा मी तुमच्याशी स्वत:हून बोललीदेखील...तेव्हा तुम्ही मला म्हणाले देखील की, माझ्या मनावरील भार हलका झाला म्हणून...बस, मला तेवढे बोलून हा विषय कायमचा संपवायचा होता. तुमच्याशी मला पुढे बोलायचेदेखील नव्हते सर...पण नियती इथे देखील खेळी खेळलीच...माझ्या मनात तुमच्याबद्दल साधा मैत्रीही करण्याचा भाव नव्हता सर...कारण पुढे मला तुमच्याशी बोलले पाहिजे असे कधी वाटलेच नाही तेव्हा...पण काही कारणांमुळे का होईना आपण बोलायला लागलो. माझ्याबद्दल तुम्हाला बरीचशी माहिती होती, माझ्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंची तुम्हाला जाणीव होती. पण मी तर तुमच्याबद्दल, तुमच्याशी संबंधित सर्व गोष्टींबद्दल अनभिज्ञ होती सर...आपण बोलत गेलो, एकमेकांचे विचार समजले. वैचारिक पातळी समजली...आणि एक गोष्ट आपल्या दोघांच्याही लक्षात आली की, आपला स्वभाव, आवडीनिवडी, दुस-यासाठी धावपळ करण्याची वृत्ती, जीवनातील पुढचे ध्येय, एवढेच काय तर शाॅपिंगमध्ये सर्वात जास्त आवडणा-या वस्तूही सारख्याच होत्या. तुम्ही म्हणालेदेखील होते की आपण मागच्या जन्मात कुंभच्या मेळ्यात हरविलेले बहीणभाऊ असेल, पण एक सांगू सर...बहीणभाऊदेखील इतके स्वभावाच्या बाबतीत सारखे नसतात जितके आपण आहेत. त्यामुळे असेल कदाचित आपण खूप बोलत गेलो, इतके बोलत गेलो की, तुम्हाला प्रत्यक्षात एकदाही न भेटता मी नुसत्या बोलण्यानेच तुमच्या प्रेमात पडली. ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती सर...कारण नुसत्या अप्रत्यक्ष बोलण्यातून कुणी कुणाच्या प्रेमात पडू शकते, या गोष्टीवर माझा कधी विश्वासच नव्हता...हे तुम्हाला देखील चांगले माहिती आहे. पण माझा हा विश्वास साफ खोटा ठरला सर...
माझा स्वभाव मुळातच स्पष्टवक्ता...मी माझ्या मनातील सर्व भावना बोलून दाखविल्या तुम्हाला...तुम्ही तुमचेही स्पष्टीकरण दिले ते मला पटलेदेखील...पण मला एक विचारायचे आहे सर, माझ्या मनात या भावना निर्माण होण्यासाठी मी एकटीच जबाबदार आहे?
तुम्ही खूप साधेपणाने मला सांगून गेले की, हे विसरून जा...पण एवढं सोप्पं असतं का हो सर, क्षणात सर्व विसरणे...तेही माझ्यासारख्या मुलीला...तुम्ही तुमचे सर्व स्पष्टीकरण दिले मला...पण खरं सांगू मला तुमच्याकडून कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही...कारण माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर...तुम्ही नियती समजून सर्वमान्य केले आणि परिस्थिती जशी आहे तशी सहज स्वीकारली. पण माहिती आहे सर...हरण्यासाठीसुद्धा नवा डाव मांडावा लागतो...पण मला खंत आहे तुम्ही मला डाव मांडायची संधीच नाही दिली...
मी खूप आनंदात जीवन जगत होती. माझे मार्ग अगदी स्पष्ट होते. तुम्ही एखाद्या स्वप्नाप्रमाणे माझ्या आयुष्यात आलात...कमी काळात का होईना खूप आठवणी दिल्यात...अगदी प्रत्येक शब्दाशब्दात तुमच्या आठवणी आहेत...ज्या विसरता येणे कधीही शक्य नाही...तुम्ही माझ्या आयुष्यात नसाल याच भावनेने खूप बेचैन होते मी. तुम्ही मला म्हणायचे की, मी जादूगार आहे; पण खरे जादूगार तुम्ही आहात सर...
माहिती आहे सर, नाकारण्यासाठी हजार कारणे असली तरी होकार देण्यासाठी एक कारण पुरेसे असते; पण माझ्याबद्दल मला एवढे ओळखूनही एक कारण नाही पटवून देऊ शकले तुम्ही घरी...ही माझ्यासाठी सर्वात दुर्दैवी बाब आहे...
आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर आपल्या दोघांनाही अतिशय महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे...आपल्या दोघांचेही मार्ग वेगळे आहेत...तुमच्या मताप्रमाणे ही नियतीची खेळी आहे...तर असेल कदाचित तसे...
आता नाही तर आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेट होईलच...माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत असतील...खूप मोठे व्हा आणि खूप नाव कमवा...
तुमचीच
अनामिका,अमरावती
stay connected