प्रेम प्रकरणातून युवकाचा खुन : बीड जिल्हा पुन्हा हादरला
बीड : आष्टी तालुक्यात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती, की तरुणाचा तडफडून मृत्यू झाला आहे. मयत तरुणाचं मालकाच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. याच संशयातून तरुणाची अमानुष हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
विकास बनसोडे असं मयत तरुणाचं नाव आहे. तो मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील ट्रक मालक असलेल्या व्यक्तीकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होता. मालकाच्या अल्पवयीन मुलीशी विकासचे प्रेम संबंध सुरू आहेत, असा संशय मालकाला होता. घटनेच्या दिवशी मयत विकास मालकाच्या मुलीसोबत घरामागील शेतात आढळून आला होता. ही बाब मालकाने पाहिली. यानंतर आरोपीनं विकासला दोन दिवस डांबून ठेवत अमानुष मारहाण केली.मारहाण इतकी भयंकर होती की, यात विकासचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर आरोपी मालकाने स्वत: विकासच्या घरच्यांना फोन केला आणि तुमच्या मुलाला घेऊन जावा नाहीतर मी त्याला जीवे मारेन, असं फोन करून सांगितलं. यानंतर तरुणाचा थेट मृतदेह आढळला आहे. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आधीच बीडसह महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं असताना आणखी एक क्रूर घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी आरोपींना पकडून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे .
stay connected