रानडुकराच्या हल्ल्यात तीन महिला जखमी
--------------------------
हरेवाडी, मराठवाडी शिवारात रानडुकरांची दहशत
-------------------------
कडा / वार्ताहर
---------------------
शेतात कांदा काढणीचे काम करणा-या महिलांवर रानडुकरांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्याची घटना हरेवाडी शिवारात औटे वस्तीच्या परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.
आष्टी तालुक्यातील हरेवाडी, मराठवाडी व पिंपळगाव परिसरात रानडुकरांनी मोठी दहशत निर्माण केली असून, गुरुवार दि.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान हरेवाडी शिवारात काही महिला शेतात कांदा काढणीचे काम करीत होत्या. त्यावेळी अचानक त्या महिलांवर रानडुकरानी हल्ला केला. या हल्ल्यात मंदाबाई दत्तू मराठे, विमलबाई जाधव व सुमनबाई मराठे या तीन महिला जखमी झाल्या. मंदाबाई मराठे यांच्या गालावर शरीरावर दुखापत झाल्याने नगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत वनविभागाला माहिती मिळाल्यावर वन कर्मचा-यांकडून घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा करण्यात आला. या परिसरात रानडुकरांनी दहशत निर्माण केल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. त्यामुळे रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी मोहन मराठे, जेबी औटे, दादा मराठे, दत्तु मराठे, बाळू मराठे इत्यादी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
--------%%---------
stay connected