समीक्षण गझल संग्रहाचे नाव:- सूर्य आहे पेरला( मराठी गझल संग्रह)

 समीक्षण
गझल संग्रहाचे नाव:- सूर्य आहे पेरला( मराठी गझल संग्रह)



गझलकार:- दिनेश भोसले( शिक्षक,लेखक,कवी,गझलकार,निवेदक, कादंबरीकार )

प्रथम आवृत्ती:- 26 डिसेंबर 2024

प्रकाशक:- गझलपुष्प,पिंपरी चिंचवड,पुणे.

मुख पृष्ठ:- श्री.प्रशांत पोरे,पुणे

अक्षर जुळवणी:- प्रतिमा मुद्रण,कोथरूड,पुणे

किंमत:- 220 रुपये

प्रस्तावना:- संजय गोरडे

शुभेच्छा:- संदीप जाधव


         गझल संग्रह हातात पडताच आपण शब्दांच्या प्रेमात पडतो.आकर्षक असे मुख पृष्ठ अन् मल पृष्ठ.गझल संग्रहाला दिलेले नाव ही सार्थक आहे,"*सूर्य आहे पेरला*." किती विचारपूर्वक गझल संग्रहाला नाव दिलेले असेल,म्हणजे आहे हो.व्यक्त झाल्याशिवाय समोरच्याला कसे समजणार आपल्या मनात चालले काय? प्रत्येक व्यक्तीने व्यक्त होणे गरजेचे असते.त्याची माध्यमे वेगवेगळी असतात...पण,व्यक्त होणे महत्त्वाचे असते.ज्यांनी यातना सहील्या त्यांच्या भावनांचा आविष्कार हा जबरदस्त असतो,तो काळजाला थेट भिडतो. यातनेतून म्हणा किंवा सुखातून या गझलांचा,काव्याचा अर्थात साहित्याचा जन्म होतो.त्यातील एक एक शेर...खऱ्या शेर( सिंहा) समान असतो.अचूक मारा करतो..शब्दांचा घाव इतर घावांपेक्षा अधिक खोलवर होतो.प्रत्येकाचे बालपण,शालेय जीवन,कॉलेज जीवन हे,मनावर खूप काही परिणाम करते.ज्या परिसरात,वातावरणात आपण वाढलो जातो त्याचा परिणाम अलगद आपल्यावर होत जातो.दिनेश सरांना बालपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती.त्यामुळे नाना प्रकारचे पुस्तके त्यांनी लहान पणापासून वाचलेली आहेत..त्यांची अक्षरश: पारायणे केलेली आहेत.

         बऱ्याच घटना आयुष्याला कलाटणी देतात.तसेच छोटे मोठे प्रसंग दिनेश सरांच्या जीवनात ही आले.सुरुवातीला 2003 साली

एक कादंबरी प्रसिद्ध झाली..त्यानंतर बरीच वर्षे,जवळजवळ 12 वर्षे ते लिखणापासून थोडे दुरावले गेले.पण,अंगभूत कला अशा कधीच आपल्याला सोडून जात नसतात.आपल्या बोलण्यातून,त्याचा प्रत्यय येतच असतो.सर,स्वतः पेशाने शिक्षक म्हणजे त्यांचे नेहमी सजीव विद्यार्थ्यांशी हितगुज होत असते.भाषण,व्याख्यान,बोलणे यातून ते झळकते तसेच सरांच्या बाबतीत घडले.मी ही पेशाने शिक्षिका..त्यामुळे हे शिक्षक विद्यार्थी नाते किती जिव्हाळ्याचे असते ते मला माहिती आहे.

        2015 साली सरांनी गझल कार्य शाळेत घेतलेला प्रवास त्यांना खूप काही देवून गेला.गझल लिखाणाची सुरुवात सुंदर झाली,त्यात कौतुकाची थाप..खूप काही देवून जाते..त्याची किंमत कोणत्याच बाजारात नाही.गाजलेली बरीच हिंदी मराठी गाणी म्हणजे गझला असतात..ते तेव्हा त्यांना समजले..म्हणून आपण चटकन ते गुणगुणत जातो.आपल्या गझलेले बारसे धरणे किती गरजेचे असते..कोणी तरी आपल्या गझलेवर चर्चा करणे गरजेचे असते.त्यातील बारकावे सांगणे,चुका सांगणे गरजेचे असते.सरांना अनेक मोठ्या मोठ्या गझलकरांचा सहवास लाभला त्यामुळे त्यांच्या गझला उच्च दर्जाच्या घडत गेल्या.आपली पत्नी प्रथम श्रोता ,जी आपल्याला आपल्या गझलेची उंची सांगते..ती प्रेरणा देते.त्यामुळे आणखी चांगले देण्याचा प्रयत्न केला जातो.



      मी ही शिक्षक व दिनेश सर ही शिक्षक,सतत शालेय कामकाजात व्यस्त असतो,पण त्यातून ही आपला छंद जोपासला की,मन भरारी घेते.विचारांचे चक्र सतत फिरत असते,काही ना काही सतत टिपत असते.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो हे प्राशन करेल ,तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही...हे सत्य आहे.शिक्षणाने विचार मिळतो,सतत धडपड असते..नव निर्माण ची ओढ असते.सरांचे अध्यापनाचे विषय मराठी,हिंदी .त्याचा उपयोग सरांना लिखाणात चांगला झाला..शब्द कोश बलवान झाला..भरपूर वाचन झाले..तितकेच अध्यापन झाले.माणूस जिवंत असण्याचे लक्षण असते.



        दिनेश सरांच्या या गझल संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास मी ही उपस्थित होते..हे माझे भाग्य.शानदार असा सोहळा झाला होता.उत्तम गझलकार,उत्तम सूत्र संचालक,निवेदक,कादंबरीकार,कवी,हाडाचे शिक्षक अन् सर्वात महत्त्वाचे माणुसकी जपणारा एक प्रेमळ माणूस.सरांची व माझी फारसी ओळख नाही,त्यांना 2-3 वेळा जास्तीत जास्त भेटले असेल..पण, कधी त्यांच्याशी संवाद साधता आला नाही.पण,त्यांचे नाव साहित्यिक परिवारातील प्रत्येकाच्या तोंडात ऐकलेले आहे.त्यांची 2 निवेदने ऐकली...एकदम जबरदस्त..मनाचा ठाव घेणारे एकसे बढकर एक शेर....त्यांचा आवाज ऐकावसा वाटतो.



       या गझल संग्रहातील प्रत्येक गझल बोलकी आहे..ती आपण गुणगुणू लागतो.त्यांच्या प्रत्येक गझलेले आपणास संदेश दिलेले जाणवतात.साहित्यिक हा सत्यवादी असावा,अन्यायाची त्याला चीड असावी ती आपल्या साहित्यातून त्याने व्यक्त करावी,नाना प्रश्नांना वाचा फोडावी,जेणे करून त्यावर विचार मंथन घडेल.माणुसकी पुजारी आहेत सर...जो माणूस माणुसकी दाखवतो तोच खरा माणूस म्हणून घेण्यास पात्र असतो.ज्याच्या भावना च जर बोथट झाल्या तर तो काय सांगणार किंवा समजून घेणार? 

      त्यांच्या गझलेतील मला आवडणारे शेर म्हणजे,जगा अन्  जगू द्या या माझ्या आवडत्या तत्त्वावर...त्यांचा सूर ही आशावादी आहे.त्यातील एक शेर अधिक भावला..अश्रू देणारे कित्येक असतात,पण त्यासाठी आपण हसले,जगले पाहिजे ना..

*थोडे जगून घेऊ,थोडे हसून घेऊ*

*आयुष्य पेलताना मिळतात कैक अश्रू*..

         आपल्याला या जगामध्ये जर बदल घडवायचा असेल तर,प्रथम आपल्यात तो बदल घडला पाहिजे,माणूस म्हणून आपण जगले पाहिजे की नाही,

*तुला जर वाटते व्हावा बदल दुनियेमध्ये या तर*

*खरा माणूस होवून तू जरासे वाग आयुष्या*

     आपल्या जीवनात नाना वार होतात,ते शब्दांचे असो,वागण्याचे असो,कृतीचे असो...

*खंजीरा ने केवढा अन्याय केला!*

*वार झाल्यावर पुन्हा मूर्तीत आलो*

     सर्व काही दुनियेत विकत घेता येते,पण एकदा आई बाप जीवनातून गेल्यावर ते पुन्हा मिळणे कदापी शक्य नाही.सरांच्या आई प्रमाणे माझी ही आई मला कायमची सोडून गेली..तिच्या बद्दलची भावना...किती मन हेलावते..आईची कुशी किती जीव की प्राण असते,तिचा भास आपणास सर्वत्र होत असतो,

*कुशीमध्ये दिनेशाला जरा घेईल का आता?*

*तुझी उबदार छाया मी कुठे शोधायची आई?*

    विरहाचे काव्य,सखिशी झालेली ताटातूट..ती काल्पनिक की खरी सांगू शकत नाही मी,पण बोलकी..

*सखे काळ लोटून गेला किती*?

*तरी आठवांचे तळे साचते*

       वेदनेतून खऱ्या काव्याचा,गझलेचा जन्म होत असतो....घाव सोसल्या शिवाय दगडाला देवपण येत नाही,तसेच काहीसे..

*शिल्प साकारण्या घाव सोसे दगड*

*वेदनेतून खरोखर घडावी गझल*

      मनात चांगले विचार पेरले तर,त्याचा उपयोग चांगल्या कार्यासाठीच घडतो.पण,येथे प्रकाश म्हणजे चांगला विचार च कोणाला घ्यायचा नसतो...चांगल्या कार्यात बाधा आणायची...

*सूर्य आहे पेरला त्यांच्या जरी डोक्यात मी*

*ते प्रकाशाला तरीही अडवण्यातच गुंतले*

     दूध देतो असे त्यांनी म्हटल्यावर आपण हो म्हटले तर आपण खूप उत्तम,पण तेच आपण विरोध केला तर आपण खूप खराब,तेव्हा दुनियेचे खरे रूप कळते.. अशी दुनियेची निती...

*त्यांच्या हो ला हो म्हटले की मान मरातब भारी*

*विरोध त्यांना मी केल्यावर कळू लागली दुनिया*

   आपण जर खरे असेल,आपला विचार शुद्ध,पवित्र असतील तर,आपण जग बदलवू शकतो..असा एक मित्र सोबतीला हवा..

*दाट काळोखास जो पळवून लावी*

*तो भीमाचा सूर्य सच्चा शोधला मी*

     फुले,शाहू,डॉ.आंबेडकर जी यांच्या विचारांचा प्रभाव अधिक झालेला जाणवतो..

*नको बंदूक,तलवारी*

*फुले,शाहूस वाचू चल*

      कठीण दगडावर जर एखादे बीज रुजले तर,ते अस्तित्वाचा लढा नित्य लढणाराच ना.

*दगडावरती रुजले जर का बीज कधी तर*

*अस्तित्वाचा लढा निरंतर लढणारच की*

    कित्येक वर्षे उलटली,पण जन माणसात विषमता नांदतांना दिसते..अजून ही जातीवाद फोफाळला आहे..अजून ही जात आपल्याला चटके देतेच...

*जमाना बदलला म्हणे यार हो*!

*तरी जात येथे छळत राहिली*

     माणूस कधी कळतो,जेव्हा त्याचे आचार विचार आपणास समजतात..

*हसून जग सहज जरी असेच टाळते*

*दिनेश शायरीतला हवा कळायला*

    मानवता जर आपल्यात असेल तर सारे सुखकर होते..

*हृदयामध्ये मानवतेचे शुद्ध बियाणे पेरू*

*वाणीमधुनी तुकाराम अन् कबीर येण्यासाठी*

      अशी प्रत्येक गझलेतील शेर आपल्या मनाचा ठाव घेतात..एकदम बोलके असे शेर आहे..जणू त्या भावना आपल्याच वाटू लागतात,आपल्याशी बोलू लागतात.गझल वाचताना त्यात आपण पूर्ण बुडून जातो..

एक एक गझल अलगद आपल्याही मनात घर करते.

*तुझे न माझे सख्या नाते कोणते?*मनास जाळणारे ते घाव कोणते?*.     

दिनेश सर तुमच्या या गझल संग्रहाला माझ्या मनस्वी मोरपंखी शुभेच्छा! तुमचे मन नित्य आम्हाला वाचायला लाभावे ही माफक अपेक्षा.

*विचारांचा जागर हा झालाच पाहिजे*

*कर्तृत्वाचा सागर भरलाच पाहिजे.*

       विचारांचा सूर्य पेरला,आता आपले कर्तव्य आहे,आपण यातून काय काय चांगले घेता येईल किंवा देता येईल हे पहावे.चांगल्या विचारांची देवाणघेवाण झालीच पाहिजे.

*प्रखर सूर्य आहे पेरला*

*मानव विचारांनी घेरला*...

  तसेच,

*नको हाती तलवार,बंदूक*

*हवी विचारांची खोल संदुक*..

       मला गझल तयार करता येत नशी,पण समजते..महत्त्वाची आवडते.. वेड लावते,जीव लावते गझल,प्रेम शिकवते गझल,विचार देते गझल...मी ही तुमच्या प्रमाणे नक्कीच गझल लिखाणाचा प्रयत्न करेल.नित्य तुमच्या साहित्याच्या प्रतिक्षेत.आपले साहित्य मनाला भरपूर,मुबलक,संतुलित आहार देते..निकोप वाढ करण्यास हातभार लावते.

सौ.प्रतिमा अरुण काळे 
निगडी प्राधिकरण,पुणे 44
लेखिका,कवयित्री,शिक्षिका,निवेदिका,संपादिका.
मोबाईल नंबर:- 8830654661
व्हॉट्स अप नंबर:- 9405042938
ईमेल:- pratimakale29@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.