पुस्तक समीक्षण
पुस्तकाचे नाव:- मी अहिल्या आहे
(ऐतिहासिक कादंबरी)
लेखिका:- रंजना फतेपुरकर( मै अहिल्या हूं)अनुवादक:- डॉ.एन.जी.काळे( हिंदी भाषेतून मराठीत अनुवाद)
प्रकाशक:- श्री.सर्वोत्तम प्रकाशन,इंदोर
मूल्य::-२०० रुपये
एकूण पृष्ठ:- १०४
समीक्षक:- सौ.प्रतिमा अरुण काळे,निगडी प्राधिकरण,पुणे ४४
पुस्तक म्हणजे आत्मा असतो.त्यात ऐतिहासिक कादंबरी जीव की प्राण.त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित रंजना फतेपुरकर मॅडम यांनी लिहिलेली ही कादंबरी मूळ हिंदी भाषेतील आहे,मैं अहिल्या हूं.त्याचे अनुवादक डॉ.एन.जी.काळे सर आहेत.
या पुस्तकाला श्रीमंत यशवंतराव होळकर सर,डॉ.सुधीर तांबे सर,घनश्याम होळकर सरांच्या ही शुभेच्छा लाभलेल्या आहेत.तसेच या पुस्तकाची डॉ.देवेंद्र जोशी सरांनी समीक्षा केलेली आहे.रंजना मॅडम यांचे सुंदर असे मनोगत अन् आभार.तसेच रंजना मॅडम यांनी हे पुस्तक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी अर्पण केलेले आहे.
पुस्तकाची भाषा ओघवती आहे.सर्व सामान्य व्यक्तींना ही भाषा समजेल त्यामुळे समजून घेण्यास सोपे जाईल.सुरुवातीला व शेवटी काही रंगीत पाने पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन पटावर आधारित आहे.पुस्तक हाती पडताच एका बैठकीत पुस्तक वाचले जाते.कारण,पुढे काय? पुढे काय? याची आपल्याला उत्सुकता लागलेली असते.ज्यांना संपूर्ण माहिती आहे त्यांना ही व ज्यांना फारसी माहिती नाही त्यांना ही .
डॉ.एन.जी.काळे सरांनी मराठी भाषा अतिशय मार्मिक वापरलेली आहे.त्यांचे मनापासून धन्यवाद.ते भाव मनापर्यंत तंतोतंत पोहचवले जाण्यात दोघे ही यशस्वी झालेले आहेत.या पुस्तकावर आधारित मी एक दीर्घ रचना,एक १५ कडव्यांची रचना तयार केली हा माझ्यासाठी आशीर्वाद ठरला.
मातेच्या बालपणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतचा संपूर्ण इतिहास या कादंबरी मध्ये साकारला आहे.जणू अहील्याच या साऱ्या गोष्टी आपणास सांगत आहे,म्हणजे त्यांचे आत्मकथन त्या करत आहे.गावाकडचा गोडवा...मैत्रिणी मध्ये रमणे,भावंडांची छोटी छोटी भांडणे,चिडवणे,निसर्गाची आवड,आपल्या निर्मिलेल्या वस्तूची काळजी आपणच घेतली पाहिजे,तिचे संरक्षण करणे आपलीच जबाबदारी आहे.शिवभक्ती,आत्मविश्र्वास,अभ्यासू वृत्ती,शिकण्याची आवड,समंजसपणा,मोठ्या राज घराण्यात गेल्यावर तेथील कुळाचार शिकणे,सर्वांना मान देणे,त्यांची काळजी घेणे.आपली जबाबदारी ओळखणे,ती अचूक पार पडणे,समान न्यायदान करणे,सर्वधर्म समभाव ची शिकवण देते.निसर्गावर,पशू पक्ष्यांवर प्रेम करणे,त्यांची काळजी घेणे,आई समान संपूर्ण प्रजेची काळजी घेणे.कोणीच येथे लहान मोठा नाही.सारे समान आहे,एकमेकांना समजून घेणे,चुकीच्या मार्गावरून चांगल्या मार्गावर आणणे,त्या साठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे,प्रसंगी कडक नियम लादणे.हुंडा घेणाऱ्यांवर प्रतिबंध घालणे,विधवा महिलेस दत्तक पुत्र घेण्याची मंजुरी देणे,त्यासाठी कोणताही सरकारी कर न देणे ,तो संपूर्ण अधिकार त्या महिलेचा आहे,सती चाल बंद व्हावी यासाठी केलेले प्रयत्न,महिलांना त्या काळात प्रशिक्षण देवून त्यांची एक फौज उभी करणे इत्यादी सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य.तसेच नाना मंदिरांचा जीर्णोद्धार, घाट,रस्ते,तलाव, बारव,विहिरी,गो शाळा,विश्रामगृह,नदी काठी महिलांना सुरक्षित जागा निर्माण करणे,त्यांच्या मुलांची काळजी घेणे अशी विविध कामे.उत्तेरेपासून ते दक्षिण पर्यंतचा संपूर्ण परिसराचा कायापालट करणे.आपली इन्दौर येथील राजधानी महेश्वर येथे स्थापन करणे.महेश्वरचा विकास करणे.नाना उद्योगांना चालना,मजुरांना कामे,कारागीर,कलाकार यांना स्थान,महेश्वर ची साडी प्रसिद्ध,वस्त्रोद्योग मधील भरभराट.त्या काळात पित्यासमान सासऱ्यांनी घेतलेला अचूक निर्णय.सुनेला सून न समजता लेक समजून..तिला मुला प्रमाणे शस्त्र,शालेय शिक्षण देणे,जबाबदारी देणे.प्रजेची तू आई आहेस..तुला खूप काही करायचे आहे.होळकर शाही हाताच्या/ मनगटाच्या ताकदीने निर्माण केलेली आहे..तिची काळजी घेणे,कोणताही भेदभाव त्यांना मान्य नव्हता..त्या काळात आपल्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह करून दिला.शब्दाला जागणारी माता होती.संस्कारांनी परिपूर्ण..निर्मळ,प्रेमळ माता..त्यांना नाना उपाध्या दिल्या गेल्या.जवळ जवळ ३३ पदव्या/ नावे त्यांना त्यांच्या कार्या ने मिळाली.पुण्यश्लोक ही जनतेने दिलेली सर्वात मोठी उपाधी..जी भगवान श्रीकृष्णा नंतर फक्त अहिल्या मातेला मिळाली.
अशा नानाविविध प्रसंगांनी भरलेले मातेचे हे आत्मचरित्र आहे.अभ्यासपूर्ण , साध्या सोप्या भाषेतील आहे.प्रत्येकाच्या घरी हे पुस्तक असणे गरजेचे आहे.अशा थोर व्यक्तींचे विचार आपल्या मनावर पडणे गरजेचे आहे...नव्हे ही काळाची गरज आहे.
रंजना मॅडम ,डॉ.एन.जी. काळे सर यांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देते.आपल्या साहित्यिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा देते.या प्रमाणे आम्हाला आपले साहित्य वाचण्यास भेटावे अशी अपेक्षा व्यक्त करते.
धन्यवाद!!
stay connected