मोदींची पिलावळ देशात पुन्हा फाळणीचे बीज रोवण्याचे काम करत आहेत - संजय राऊत
देशात हिंदू विरुद्ध मुस्लीम दंगली घडवण्याचा कट सुरू आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच मोदींची पिलावळ देशात पुन्हा फाळणीचे बीज रोवण्याचे काम करत आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
आज दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफखना प्रमुख कोण होता? महाराजांचे अंगरक्षक कोण होते? मी नावं घेत नाही. पण या बखरी चाळाव्यात वाचता येत असतील तर. इतिहास समजून घ्यावा मग त्यावर बोलावं. इतिहास बदलण्याची जी प्रक्रिया सुरु आहे, ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जी पहिली लढाई केली ती औरंगजेबाविरोधात नाही केली तर चंद्रराव मोरेंविरोधात केली होती, हा इतिहास आहे. या चंद्रराव मोऱ्यांचे वंशज मंत्रिमंडळात असतील, तर माननीय फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना इतिहासाचे धडे हे योग्य इतिहासतज्ज्ञांकडून द्यावे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत, छत्रपती संभाजी महाराजांसोबत सर्वधर्मीय लोक होते, म्हणून ते राज्य निर्माण करू शकले. छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू फक्त औरंगजेब नव्हता, आदिलशाहीबरोबर लढले, निजामशाहीबरोबर लढले, पोर्तुगीजांशी लढले, सर्वांशी लढून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. पण जे शाळेत गेले नाहीत, ज्यांचा वाचनसंस्कृतीशी संबंध आला नाही, ज्यांना इतिहास ज्ञात नाही, ज्यांना फक्त मटणाचीच दुकान दिसतात, ज्यांना या देशामध्ये दंगली घडवायच्या आहेत, ज्यांना देश पुन्हा एकदा फाळणीकडे ढकलायचा आहे, अशा लोकांची ही वक्त्यवं आहेत. पंतप्रधान मोदींना मी एक पत्र लिहिणार आहे, की या लोकांना आवरा. नाहीतर तुमच्यावर दुसऱ्या फाळणीचा ठपका येईल. जसा तुम्ही पहिल्या फाळणीचा ठपका नेहरु आणि काँग्रेसवर ठेवता. तो एक वेगळा काळ होता देशाच्या स्वातंत्र्याचा. पण आता सर्वकाही स्थिरस्थावर असताना या देशात पुन्हा फाळणीचे बीज रोवण्याचे काम ही मोदींची पिलावळ करत आहे आणि इतिहासात नरेंद्र मोदींवर तो ठपका येईल असे संजय राऊत म्हणाले.
stay connected