शासनाचा अध्यादेश ; विद्यार्थी हित, शिक्षकांचे हित कुठाय?
आज शाळेत मुलांना आनंदी ठेवावं. ते जर दुःखी असतील तर तो त्यांचा अपमान असतो. असं शासनाचं म्हणणं आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची भीती ही नष्ट झालेली आहे. असं असतांना आजचे विद्यार्थी हे शाळेत सोडा आपल्या घरीही आपल्या पालकांनाही घाबरत नाहीत. अशी आजची अवस्था झालेली असून आजच्या विद्यार्थ्यांचा जसा अपमान होवू नये हे शासनाला अभिप्रेत आहे व त्यादृष्टीनं शासनानं पावले उचललेली आहेत. अध्यादेश बनवले आहेत. शिक्षकानं त्यानुसार विद्यार्थ्यांचा अपमान होवू नये म्हणून विद्यार्थ्यांना काही अपमानदर्शक शब्दप्रयोग करु नये. त्यांना मारु नये. यासाठी सरकारनं अध्यादेश काढून शिक्षकांना धारेवर धरले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचा शाळेत नेहमीच सन्मान होत असतो. त्याला मारले जात नाहीत. त्याला धाक दाखवला जात नाही व त्याला अपमानदर्शक शब्दही बोलले जात नाहीत. मात्र ज्या विद्यार्थ्यांचा तो सन्मान करतो, त्या शिक्षकांच्या होणाऱ्या अपमानावर कोणीच अभय देत नाही. कोणी बोलत नाहीत वा तशा स्वरुपाचे अध्यादेश काढत नाहीत. ही शोकांतिकाच आहे. आता शिक्षकांचा अपमान कोण करतो? असं कोणीही म्हणेलच अन् म्हणतातही. म्हणतात की काय शिकवतात शिक्षक. काहीच शिकवीत नाहीत. कोणी म्हणतात की शिक्षक वर्ग फुकटचे वेतन घेत असतो. कोणी म्हणतात की शिक्षकांना किती सुट्ट्या असतात. हे बोलणं म्हणजे शिक्षकांचा अपमान करणारेच असते. परंतु शिक्षक हा सहनशील असल्यामुळे तो सहसा या बाबींवर दुर्लक्ष करतो. उत्तर देण्याचं टाळतो. मात्र जावं त्याच्या वंशा, तेव्हा कळे याप्रमाणे शिक्षकांनाही भयंकर त्रास असतोच. तो कोणीही जाणत नाही वा समजू शकत नाही.शिक्षकांचा अपमान करणारे बरेच घटक आहेत. त्यात मुख्य घटक आहे शाळेचा मुख्याध्यापक, जो एकेरी शब्दात बोलतो. जो पैसे उकळण्यासाठी अपमान करणारे शब्द बोलतो. शिक्षकांचे काम चांगले असतांनाही जो घटक चांगले नाही असेच दाखवून वातावरण गढूळ करतो. शिक्षकांचा अपमान करणारा दुसरा घटक आहे, संस्थाचालक. हाही घटक शिक्षकांना एकेरी शब्दात बोलतो. हाही घटक पैसे उकळण्यासाठी मुख्याध्यापकामार्फत शिक्षकांना धारेवर धरतो. अपशब्दात बोलतो. कधीकधी शिक्षकांना मारतो देखील. यात शिक्षकांचा अपमान नसतो काय? परंतु त्यावर कोणीच बोलत नाहीत. त्यानंतरचा शिक्षकांचा अपमान करणारा घटक असतो पालक. पालक केव्हाही शिक्षकांची अक्कल काढत असतात. केव्हाही अपमान करीत असतात. शिक्षकांचा अपमान करणाऱ्या घटकात आणखी एक महत्वपूर्ण घटक असतो, तो म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थीही शिक्षकांचा अपमान करण्यासाठी मागेपुढे पाहात नाहीत. अलिकडील विद्यार्थी सरळ आपल्या शिक्षकास धमकीच देतात. जर आपण मला रागवाल वा माराल तर मी आपल्या आईवडीलांना शाळेत घेवून येईल. ही धमकीच असते शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून मिळालेली नव्हे तर हा अपमानच असतो विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा झालेला. यावर कोणीच बोलत नाहीत.
शिक्षकांचा अपमान करणारे काही आणखी असामाजिक तत्वही असतात की जे सतत शिक्षकांचा पाहून घेवू असे म्हणत अपमानच करीत असतात. यावर कोणीच बोलत नाही. विशेष सांगायचं झाल्यास शिक्षकांचा पदोपदी अपमान होतो, तरीही शिक्षक नावाचा हा घटक त्यांच्याकडून होत असलेला अपमान हा नेहमीच सहन करीत असतो. त्यावर काहीच बोलत नाही. त्यांना फक्त विद्यार्थी शिकले पाहिजेत असंच सारखं वाटत असतं. जरी त्याच विद्यार्थ्यांकडून वा त्याच्या पालकांकडून त्यांचा अपमान होत असला तरी. तसेच मुख्याध्यापक वा संस्थाचालक यांच्याकडून जरी अपमान होत असला तरी. कारण ते विद्यार्थ्यांना आपलंच लेकरु, अशी भुमिका ठेवून शिकवीत असतात. बरेचदा त्यांच्या स्वतःच्या मुलांचा त्याच्या हातून विकास होत नाही. परंतु त्याच्या हातून शिकलेल्या विद्यार्थ्यांचा विकास होतो. हे त्याचं कार्य वाखाणण्याजोगेच असते. परंतु हे कार्य कोणीच विचारात घेत नाहीत.
अलिकडील काळात तर शिक्षकांचा शासनही अपमान करु लागले आहे. शासन जबरदस्तीनं शाळा अध्ययन निष्पत्तीची बाब समोर करुन पहिलीच्या विद्यार्थ्यांना अमूक अमूक बाब यायलाच हवी. तिसरीच्या सर्व विद्यार्थ्यांना अर्थपुर्ण वाचन यायलाच हवं असं बंधन घालत आहे. हा अपमानच आहे शिक्षकांचा. कारण सर्वच मुलांची बुद्धीमत्ता ही सारखी नसते व सर्वच मुलांना वाचन येईलच हे काही सांगता येत नाही. काही दोन चार मुलं तांदळात खडे असल्यासारखी विना वाचन करणारी व संख्याज्ञान नसणारीच असतात. हे सांगायला नको.
विद्यार्थ्यांना आनंदी ठेवता येतं. तसाच शिक्षक हा त्यांना आनंदीच ठेवतात. त्यासाठी प्रयत्न करतात. ते त्यासाठी तन मन धन अर्पण करतात. कधीकधी त्यात काही बंधनं येतात. याबाबतीतील एक प्रसंग सांगतो.
एक शाळा व त्या शाळेत शासनाच्या अध्यादेशानुसार विद्यार्थ्यांना आनंदीत करण्यासाठी वाढदिवस साजरा करण्याचे उपक्रम दैनंदिन चालायचे. त्यातच विद्यार्थ्यांनी ठरवलं. आपण आपल्याही शिक्षकांचा वाढदिवस साजरा करावा. मग काय विद्यार्थ्यांनीच पैसे गोळा करुन एक छोटेखानी केक आणला. शिक्षकांची इच्छा नसूनही त्यांना जबरदस्तीनं बसवलं व केक कापून ते आपला आनंद साजरा करु लागले. अशातच त्या शाळेतील संस्थाचालकानं फोटो काढले.
तो वाढदिवस, त्यातच शाळेत विद्यार्थ्यांनी साजरा केलेला वाढदिवस. त्या वाढदिवसाचे फोटो त्या शाळेतील संस्थाचालकांनं काढले होते व त्याची तक्रार वरच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. तेव्हा वरच्या अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणाची शहानिशा केली. तसं पाहिल्यास वाढदिवस साजरा करण्याला शासनानं मंजूरी प्रदान केली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल तर तो साजरा करावा असा अध्यादेश आहे. परंतु शिक्षकांचेही वाढदिवस साजरे करावे असा अध्यादेश नाही. त्यातच सरांचा विद्यार्थ्यांनी केलेला वाढदिवस शाळा संस्थाचालकाच्या मनात खुपला व तो तक्रारकर्ता झाला.
ती तक्रार. त्यावर शिक्षणाधिकारी साहेब बोलले,
"बाबा, आपली मुलं काय करतात?"
"इंजीनियर व डॉक्टर आहेत. "
"कुठे राहतात?"
"अमेरिकेत."
"आपल्या स्नुषा कुठे राहतात?"
"अमेरिकेत."
"नातवंड असतील ना घरी तुमच्याजवळ?"
"नाही."
"आपली मुलगी राहात असेल ना आपल्याजवळ?"
"नाही."
"ती कुठं राहते?"
"पतीकडे."
"मग आपण घरी एकटेच राहता का?"
"पत्नी आहे ना सोबत."
"बाबा, बरोबर आहे. आपण एकटेच राहता ना घरी. मग आपल्याला आनंद कसा कळेल? हे बघा, या फोटोत सरांचा वाढदिवस साजरा होत आहे आणि त्याचा आनंद मुलं घेत आहेत. सर्वात महत्वपुर्ण आहे आनंद. तो कधीच कुणाला सहजासहजी मिळत नाही. आपण आनंद घ्या. इतरांनाही मिळू द्या. त्यातच सुख असतं. आपण काय घेवून जाणार आहोत. ही संपत्ती, ह्या गाड्या घोड्या. यापैकी काहीच घेवून जाणार नाही. घेवून जाणार आहोत आनंद. जो आपण इतरांना देवू शकू. इतर लोकं आपलं नाव घेतील की अमूक व्यक्ती हा चांगला होता. जर चांगलं कर्म कराल तर..... नाहीतर आपल्यानंतरही लोकं म्हणतील की अमूक अमूक व्यक्ती हा खराबच होता. बाबा, चांगले कर्म करा. कर्मच परत येत असतात."
वरच्या अधिकाऱ्यानं शिक्षकाची बाजू उचलून धरली. परंतु संस्थाचालक चूप बसेल तेव्हा ना. त्यानं पत्र दिलं शिक्षकाला. त्यावर मात करण्यासाठी सरांना एक जळजळीत उत्तर लिहावं लागलं.
आनंद..... आनंद हा शोधूनही मिळत नाही. तो सापडतच नाही. काही लोकांना दुसऱ्यांना त्रास देण्यातच आनंद मिळतो. त्याला असुरी आनंद म्हणतात. संस्थाचालकांना शिक्षकांकडून देण म्हणून पैसे हवे असतात. त्यासाठी ते विद्यार्थी व शिक्षकांचा आनंद पाहात नाहीत. ते लहानश्या मुलागत वागतात. जशी लहान मुलं. काही मुलं नक्कीच चांगली असतात. ती मुक्या प्राण्यांच्या वाट्याला जात नाहीत. मात्र काही वात्रटही असतात. ती खेळ म्हणून फुलपाखरांना पकडतात. त्याच्या शेपटांना धागे बांधतात. काही चिमण्यांना पकडतात. त्यांच्या पायाला धागा बांधून त्यांना उडवतात. काही सरड्यांना पकडून त्याला तंबाखू चारुन त्याची गंमत पाहतात. काही पाण्यातील बेडकांना विनाकारण दगडं मारतात तर काही शांतपणे बसलेल्या वा झोपलेल्या कुत्र्याला दगडं मारुन त्रास देतात. काही मुलं लहान लहान झाडं तोडतात तर काही काजव्यांना एका पांढऱ्या काचेच्या बाटलीत बंद करतात. मुलं अशी कृत्य करतात. त्यात त्यांना आनंद वाटतो. परंतु त्यात मुक्या प्राण्यांना त्रास होतो, त्यांचा जीव जातो. याचं त्यांना साधं देणंघेणं नसतं.
विशेष सांगायचं झाल्यास ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचा अपमान होवू नये म्हणून शिक्षकांवर बंधनं आहेत. त्याच शाळेत शिक्षकांचा अपमान होवू नये यावर बंधनं नसावीत काय? जो राष्ट्र घडवतो. त्या शिक्षकांचा अपमान होवू द्यावा काय? शिक्षकांचा मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक, विद्यार्थी, समाजमाध्यमं याद्वारे नित्य होणारा अपमान टाळता येवू शकत नाही काय? यावर खरंच विचार करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षकांचा अपमान होणार नाही. तो खऱ्या अर्थानं सुखी होईल, तेव्हाच शिक्षक सुखी होईल. अन् जेव्हा शिक्षकांचा अशा विविध माध्यमाद्वारे अपमान होणार नाही. तेव्हाच विद्यार्थीही सुखी होईल. त्याचबरोबर राज्य आणि देशही सुखी होईल यात शंका नाही. म्हणूनच ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा अपमान होणार नाही. साध्या बोलण्यानंही नाही. याकडे जसं शासनानं लक्ष घातलं. तसंच लक्ष शिक्षकांचाही अपमान होणार नाही याकडे घालण्याची गरज आहे. त्यासाठी वेगळ्या स्वरुपाचा मजबूत असा अध्यादेश तयार करण्याची गरज आहे. तो अध्यादेश शासनानं तयार करावा व शिक्षकांचाही अशा विविध माध्यमाद्वारे अपमान होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. कारण शिक्षक हा एकमेव घटक असा आहे की जो विद्यार्थीच नाही तर देशाला सुसंस्कारीत करु शकतो आणि राष्ट्रही घडवू शकतो. हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
x
stay connected