यश संपादन करण्यासाठी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाची तयारी ठेवा :- डॉ.अजयदादा धोंडे

 यश संपादन करण्यासाठी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाची तयारी ठेवा :- डॉ.अजयदादा धोंडे 





आष्टी ( वार्ताहर):- विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी. कोणतेही काम करताना मनापासून करावे यश निश्चित मिळते असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य व युवा नेते अजयदादा धोंडे यांनी कडा येथे केले.

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आनंदराव धोंडे महाविद्यालयात झालेल्या पदवीप्रदान समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ अजयदादा धोंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, उपप्राचार्य डॉ. बापु खैरे, उपप्राचार्य डॉ. भास्कर चव्हाण, उपप्राचार्य डॉ. वाघुले, प्रा. पंडित औटे, प्रा. महेमुद पटेल, प्रा. बाळासाहेब धोंडे, प्रा. दत्तात्रय बोडखे, प्रा. गोपिनाथ बोडखे व इतरांची उपस्थिती होती.

   प्रारंभी स्व. बाबाजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

     पुढे बोलताना डॉ. अजयदादा धोंडे यांनी सांगितले की, भविष्यात चांगले करिअर करण्यासाठी विचारपूर्वक क्षेत्र निवडावे,नौकरी व व्यवसायांमध्ये अपयश आले तरी निराश होऊ नका, एक ना एक दिवस यश निश्चित मिळते. पदवी घेतल्यानंतर खरी जबाबदारी विद्यार्थ्यांवर पडते. पदवीनंतर नौकरी, व्यवसाय करा आई-वडिलांचे व महाविद्यालयाचे नावलौकिक करा‌. विद्यापिठातील पहिल्या महाविद्यालयामध्ये आपल्या संस्थेचे भगवान महाविद्यालय व आनंदराव धोंडे हि दोन महाविद्यालये आहेत ही कौतुकास्पद बाब आहे.



      कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांनी सांगितले की, हा महाविद्यालयाचा चौथा पदवीप्रदान समारंभ आहे. विद्यार्थ्यांनी कष्ट करुन मिळवलेली पदवी स्वीकारणे हा जिवनातील आनंदचा दिवस आहे. पदवी घेताना तीन वर्षांत  मिळालेल्या ज्ञानाचा भविष्यात चांगल्या कामासाठी उपयोग करावा.



 याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी सांगितले की, आपले विद्यापिठ सुरू झाले  त्यावेळी अंतर्गत फक्त नऊ महाविद्यालये होती आज साडेचारशे महाविद्यालये आहेत. पदवी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना खुप कष्ट सहन करावे लागतात. या पदवीचा सन्मान करावा. पदवी मिळविल्याचा आनंद वेगळाच असतो. पदवी मिळाली, आता येथून पुढे गरुड भरारी घेण्यासाठी तयार रहा. पदवी घेताना विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन पेहराव परिधान करायला पाहिजे. 

सुत्रसंचलन प्रा. शैलजा कुचेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ बापु खैरे यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.